भारत मंडपम, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘जी२०’ राष्ट्रप्रमुखांचे दिल्ली येथील राजघाटावर अनवाणी पायांनी गांधीवंदन केले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पचक्र अर्पण केले.
देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित ‘जी२०’ शिखर परिषदेचा समारोप झाला. त्यापूर्वी रविवारी सकाळी राजघाटावर महात्मा गांधी यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सकाळी ७ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सर्व ‘जी२०’ राष्ट्रांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख आणि निमंत्रित राष्ट्रांचे प्रमुख राजघाटावर दाखल झाले.
भारतीय संस्कृतीनुसार पंतप्रधान मोदी हे अनवाणीच राजघाटावर आले. त्यांच्यासह सर्व ‘जी२०’ राष्ट्रप्रमुखांनीही पंतप्रधान मोदी यांचे अनुकरण करून अनवाणी पायांनीच महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीचे उपरणे घालून सर्व राष्ट्रप्रमुखांचा सन्मान केला.