‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील दिग्गज नेते राजधानी नवी दिल्लीत दाखल होत असताना, काँग्रेसी राहुल गांधी युरोपवारीला गेले. नेहमीप्रमाणेच भारतविरोधी भूमिका त्यांनी तेथे मांडली. देशद्रोही शक्तींना बळ देण्याचेच काम त्यांनी तेथे केले. यापूर्वीही त्यांनी असे कृत्य वारंवार केले आहे. देशद्रोह हाच काँग्रेसी स्वभाव असल्याने, त्याचे आश्चर्य वाटत नाही.
जगभरातले दिग्गज नेते ‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे दाखल झाले असतानाच, काँग्रेसी राहुल गांधी युरोपच्या दौर्यावर गेले आहेत. युरोप दौर्याचा एक भाग म्हणून त्यांनी पॅरिसमधील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित केले. या दरम्यानच त्यांनी क्रिस्टोफ जाफ्रेलॉट याच्या बरोबरीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जाफ्रेलॉट हा हिंदू तसेच त्याच्या भारतद्वेषासाठी ओळखला जातो. जाफ्रेलॉट हा स्तंभलेखक म्हणून त्या भागात परिचित आहे. संघ परिवाराविरोधात अतिशय हिणकस भावना जाफ्रेलॉटच्या लेखातून दिसून येते. हिंदूंवर भारताच्या शेजारील इस्लामी राष्ट्रात केवळ ते अल्पसंख्यांक असल्याने अन्यायाला सामोरे जावे लागते, याकडे जाफ्रेलॉट हेतूतः दुर्लक्ष करतो.
भारतामध्ये हिंदू बहुसंख्य असल्याने येथील मुस्लीम असुरक्षित असल्याचे मत तो व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१४ तसेच २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवत, बहुमताचे स्थिर सरकार केंद्रात स्थापन केले. ही वस्तुस्थिती नजरेआड करीत, त्यांचा विजय हा निराश करणारा असल्याचे मत जाफ्रेलॉट नोंदवतो. विकासाचे आश्वासन देत मतांचे ध्रुवीकरण करण्यात आले, असा आरोप हा स्तंभलेखक करतो. तथापि, भारताने गेल्या नऊ वर्षांत सर्वच क्षेत्रांत जी नेत्रदीपक कामगिरी केली, त्याकडे तो दुर्लक्ष करतो. ‘डिजिटल इंडिया’, ‘जन धन’, ‘आयुष्मान भारत’, ‘गरीब कल्याण अन्न योजना’ आणि अन्य योजनांच्या माध्यमातून कोटी भारतीयांच्या विशेषतः समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला, हे वास्तव तो दडवून ठेवतो.
अर्थात, राहुल यांच्या राजकीय धोरणांचा भागच, अशा भारतविरोधी शक्तींना भेटण्याचा आहे. जॉर्ज सोरोस सारख्या भारतातील देशद्रोही शक्तींना बळ देणार्या उद्योगपतीशी म्हणूनच राहुल यांचे संबंध असतात. राहुल गांधी यांनी ‘युरोपीय महासंघा’च्या काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी तसेच तेथील अनिवासी भारतीय यांच्याशी भेटीगाठी घेतल्या आहेत. इथे दिग्गज नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत भेटी घेत आहेत, नवीन करार होत आहेत, या पार्श्वभूमीवर राहुल हे युरोपमध्ये जात भारतातील मानवी हक्क, कसे धोक्यात आले आहेत, याबाबत माध्यमांशी बोलत आहेत. पुन्हा एकदा मणिपूरचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. भारत सरकार यंत्रणांचा दुरूपयोग करीत असून, अर्थव्यवस्था हाताळण्यात ते अपयशी ठरले आहे, असा हास्यास्पद दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे. भारताने गेल्या सहा वर्षांत जे आर्थिक समायोजन केले, ते साध्य करायला ४७ वर्षे लागली असती, असे गौरवोद्गार ‘जागतिक बँके’ने काढले आहेत.
तथापि, राहुल यांच्या मते केंद्र सरकारची आर्थिक धोरणे, ही अत्यंत चुकीची आहेत. त्यामुळेच भारतासमोरची आव्हाने कठीण झाली आहेत. देशद्रोही शक्तींनी पाठबळ दिलेला शेतकरी आंदोलनाचा मुद्दाही त्यांनी पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. पाश्चात्य माध्यमांना त्यांची मळमळ व्यक्त करण्यासाठीची आयती संधी राहुल यांनी उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वीही राहुल यांनी देशाविरोधी वक्तव्ये केली आहे. काँग्रेसच्या अपरिपक्व राजकारणाचा भाग म्हणून राहुल यांच्या युरोपवारीकडे पाहावे लागेल. मात्र, राहुल यांनी देशाची प्रतिमा मलीन करण्याचा जी अश्लाघ्य मोहीम हाती घेतली आहे, त्याकडे दुर्लक्ष करिता येणार नाही. आरोप तेच-तेच असले, तरी पाश्चात्य माध्यमांना बळ मिळेल, असे त्याचे स्वरूप आहे. केंद्रीय यंत्रणांचा सरकार दुरुपयोग करते, येथपासून भारतातील न्यायसंस्थांच्या अधिकारातही केंद्र सरकार हस्तक्षेप करीत आहे, हा राहुल यांचा आरोप गंभीर असाच. भारतातील भेदभावाच्या घटनांमध्ये तसेच हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे राहुल जेव्हा वारंवार माध्यमांसमोर सांगतात, तेव्हा एकच खोटी गोष्ट १०० वेळा सांगितली की, ती खरी वाटू लागते, याची प्रचिती येते.
त्याचवेळी ‘इंडिया’ आघाडीच्या सहभागी पक्षांनी हिंदू धर्माविरोधात जी संतापजनक वक्तव्ये केली आहेत, त्याबद्दल राहुल अवाक्षरही उच्चारत नाहीत. द्रमुकबरोबरीने काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे, माजी मंत्री पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती पी. चिदंबरम, तामिळनाडू काँग्रेस प्रवक्ते लक्ष्मी रामचंद्रन हेही हिंदूविरोधी भूमिका घेण्यात मागे नाहीत. त्यांच्या हिंदूद्वेषी मानसिकेतवर राहुल प्रहार करतील, अशी अपेक्षाच नाही. भारतात आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असा कांगावा याच राहुल यांनी लंडनमध्ये बोलताना केला होता. त्याचेही इत्यंभूत वृत्त भारतीय माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. भारतीय संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही, असे धादांत खोटे राहुल गांधीच बोलू शकतात. ज्या भारतात त्यांनी ‘भारत जोडो’च्या नावाखाली प्रत्यक्षात देश तोडण्याचेच हे कारस्थान होते.
‘जी २०’ शिखर परिषद कमालीची यशस्वी झाली. भारताला युरोपशी जोडणारा भव्य प्रकल्पही जाहीर झाला आहे. ऐतिहासिक असा दिल्ली जाहीरनामा प्रसिद्ध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जागतिक मोहरच उमटली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडन आणि इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या बरोबरीने जागतिक नेते भारतीय पंतप्रधानांच्या भेटीसाठी उत्सुक होते. प्रत्येकालाच भारताबरोबरचे संबंध वृद्धिंगत करून व्यापाराला चालना द्यायची आहे, तरीही राहुल यांनी विदेशात जात भारताविरोधी भूमिका घेणे, हे त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या स्वभावाला साजेसे असेच. ‘जी २०’ शिखर परिषद यशस्वी झाली. भारताने पाहुण्यांच्या सरबराईत कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. काही पाश्चात्य माध्यमांना भारताविरोधी मोहीम चालवायची आहे आणि राहुल गांधी यांच्यासारखे नेते देशविरोधी शक्तींना बळ देत, त्यांच्या मोहिमेला हातभार लावतात. हाच काँग्रेसचा स्वभाव आहे. इतकेच.