दिल्ली : राजधानी दिल्ली इथे जी-20 परिषद सुरु असून अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेकरिता उपस्थित झाले आहेत. दरम्यान, आज परिषदेच्या दुसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशी भारत आणि फ्रान्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात ही चर्चा पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. याविषयी सांगताना मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले की, 'दुपारच्या जेवणाच्या वेळी राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत महत्तवपूर्ण बैठक झाली. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली आणि भारत-फ्रान्स संबंध प्रगतीच्या नवीन उंचीवर पोहोचतील याबद्दलची खात्री करण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत.'
जी-20 परिषदेनंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, इथे घालवलेल्या अप्रतिम वेळेबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि जनतेचे मनापासून आभार मानतो. तसेच जी-20 परिषदेने एकतेचा संदेश दिला, असेही ते म्हणाले.
पुढे मॅक्रॉन म्हणाले की, जी-20 देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेची तत्त्वे राखण्याबद्दल बोलले गेले. आम्ही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सखोल सुधारणांना समर्थन देतो जेणेकरून ते जगाचे वर्तमान वास्तव प्रतिबिंबित करतील, असेही त्यांनी सांगितले.