माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना जन्मठेपेची शिक्षा; दुहेरी हत्याकांडावर न्यायालयाचा निकाल!

    01-Sep-2023
Total Views |
Prabhunath Singh Verdict

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना १९९५ मध्ये मशरख, छपरा येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.प्रभुनाथ सिंह यांच्यावर आरोप आहे की, २८ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार मतदान न केल्यामुळे पुलिंग बूथजवळ दोन लोकांना गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप आहे. यानंतर मृताच्या भावाने न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला.

कायद्यानुसार, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायमूर्ती कौल यांनी बचाव पक्षाच्या वकिलांना विचारले की, प्रभुनाथ सिंह यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा यापैकी कोणता पर्याय निवडायचा आहे. तसेच न्यायालयाने प्रभुनाथ सिंह यांचे वय विचारले.याला उत्तर देताना, प्रभुनाथ सिंह यांच्यावतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, त्यांचे अशिला ७० वर्षांचे आहेत. तेव्हा न्यायमूर्ती कौल म्हणाले, “तब तो भगवान ही मालिक है।” न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले की, मी पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला आहे. यानंतर न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात पटना न्यायालयाने २००८ मध्ये प्रभुनाथ सिंह यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर २०१२ साली पाटणा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली होती. मात्र, मृतांच्या कुटुंबीयांनी आपला लढा सुरूच ठेवत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी १८ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली.

अखेर १ सप्टेंबर २०२३ रोजी न्यायालयाने प्रभुनाथ सिंह यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अभिषेक मनु सिंघवी यांनीही या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी युक्तिवाद केला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने नंतर चेंबरमध्ये पाहण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बिहारचे गृह सचिव आणि डीजीपी यांना १ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

काय आहे प्रकरण? 

हे प्रकरण १९९५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहे. एप्रिलमध्ये १८ वर्षीय राजेंद्र राय आणि ४७ वर्षीय दरोगा राय यांची मशरख, छप्रा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मतदान केंद्राजवळ ही हत्या करण्यात आली. तेव्हा बिहार पीपल्स पार्टीकडून निवडणूक लढवणाऱ्या प्रभुनाथ सिंह यांच्यावर खुनाचा आरोप लावण्यात आला होता. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

या निवडणुकीत प्रभुनाथ सिंह यांचा अशोक सिंह यांच्याकडून पराभव झाला होता. जनता दलाचे विजयी आमदार अशोक सिंह यांनाही प्रभुनाथ सिंह यांनी ९० दिवसांत जीवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर ९० दिवसांनंतर ३ जुलै १९९५ रोजी अशोक सिंह यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

आमदार अशोक सिंह हत्या प्रकरणात प्रभुनाथ सिंह यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेनंतर ते २०१७ पासून हजारीबाग मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र, राजेंद्र आणि दरोगा राय खून प्रकरणात पाटणाच्या कनिष्ठ न्यायालयाने आणि पाटणा उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाला मृत राजेंद्र राय यांचे भाऊ हरेंद्र राय यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.