एक अत्यंत साधा, निगर्वी आणि कलाध्यापनाशी नाळ जुडलेला व्यासंगी दृश्यकलाकार, ज्यांचं शारीरिक वय मोठे असलं तरी उत्साही मन हे विशीतल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असंच. के. के. वाघच्या ‘एम. व्ही. एम’ या अभ्यासक्रमाला समर्थपणे चालविणारे अधिष्ठाता अशा विविध भूमिका वठवणारे प्रा. बाळ नगरकर सर हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनाचित्र शैलीमुळे अधिक ओळखले जातात. त्यांच्या कलाशैलीचा परिचय करुन देणारा हा लेख...
आजचा स्तंभलेख एक नवा दृश्यकलाकार, नवी चित्रशैली आणि नवं तंत्रकौशल्य लाभलेल्या, एका ज्येष्ठ दृश्यकलाकाराची ओळख घेऊन आला आहे. मागच्याच पंधरवाड्यात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, जे अनुभवी काष्ठ शिल्पकारही आहेत, त्यांच्या शुभहस्ते, आपल्या निवडक १०० स्तंभलेखांच्या ’रंगसभा’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा दि. १९ ऑगस्टला संपन्न झाला. महाराष्ट्रातील अनेक कलाकार या सोहळ्यास डोळ्यात आणि स्मरणात साठविण्यासाठी विशेषत: आपल्यातीलच दृश्यकलाकारांवरील स्तंभलेखांच्या ४०० पृष्ठांच्या ’रंगसभा’ या ग्रंथाचा सन्मान करण्याचा आदर उरी बाळगून उपस्थित राहिले होते.
मला सदर ग्रंथनिर्मितीप्रीत्यर्थ संगमनेर येथे मित्रवर्य आणि ज्येष्ठ पत्रकार, संपादक युवावार्ताचे किसन हासे सर यांनी सत्कारांस आणि कौतुक करण्यास बोलाविले होते. ‘गृह-सन्मान’ अर्थात घरचा सन्मान हा अनेक ऊर्जा निर्माण करतो. म्हणून तो अनुभवला. नाशिक मुक्कामी, ज्येष्ठ चित्रकार प्रा. दीपक वर्मा सर आणि कमी वेळेत ज्या ज्येष्ठ कलाकार मंडळींना भेटता येईल, अशा काही व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली. त्यापैकीच एका ज्येष्ठ दृश्यकलाकाराच्या प्रदीर्घ कला-प्रवासाचा मागोवा घेणारा आजचा स्तंभ...
नाशिकमध्ये के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने चित्रकला आणि शिल्पकला या विषयांचे अभ्यासक्रम या संस्थेत सुरू करण्यात आले. त्या संस्थेच्या या शाखेचे प्राचार्य ते अधिष्ठाता म्हणून २००८ पासून कार्यरत असलेले ज्येष्ठ चित्रकार बाळ नगरकर!
एक अत्यंत साधा, निगर्वी आणि कलाध्यापनाशी नाळ जुडलेला व्यासंगी दृश्यकलाकार, ज्यांचं शारीरिक वय मोठे असलं तरी उत्साही मन हे विशीतल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असंच. के. के. वाघच्या ‘एम. व्ही. एम’ या अभ्यासक्रमाला समर्थपणे चालविणारे अधिष्ठाता अशा विविध भूमिका वठवणारे प्रा. नगरकर सर हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनाचित्र शैलीमुळे अधिक ओळखले जातात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत असलेल्या नाशिकच्या के. के. वाघ महाविद्यालयात अभ्यासक्रमात असलेला ‘शिल्पकला’ हा पदवी अभ्यासक्रम केवळ येथेच आहे आणि विश्वविख्यात म्हणून नाव घेतल्या जाणार्या मुंबईतील सर जे.जे.स्कूलच्या शिल्पकला विभागात केवळ १५ विद्यार्थ्यांची क्षमता आहे, ‘इंटेक’ आहे. मात्र, के. के. वाघ महाविद्यालयाच्या या शिल्पकला विभागात विद्यापीठाची अधिकृत मान्यता असलेल्या ३० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी स्थायी तत्वावरील कलाध्यापक विद्यार्थ्यांना कलाध्यापन करतात.
प्राचार्य, अधिष्ठाता, ज्येष्ठ कलाकार या सार्या विशेषणांना धारण करणारे प्रा. बाळ नगरकर हे त्यांच्या नावाप्रमाणेच भासतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात, वागण्यात कुठेही बढेजाव आढळत नाही. विद्यार्थ्यांशी चित्र व रंगसंवाद साधणारा हा हाडाचा कलाध्यापक म्हणूनच नाशिकच्या कलाविश्वात स्वतंत्र ओळखनिर्माण करवून, टिकून आहे. नाशिकमधील दृश्यकला क्षेत्राचे अध्वर्यु गुरुवर्य वा. गो. कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रकार शिवाजीतुपे, प्रा. रोकडे सर, कलासंचालक म्हणून ज्यांची भूमिका स्मरणात राहील, असे प्रा. मु. ना. नांगरे, शिल्पकार डी. एस. खटावकर, जतिन दास, के. के. हेब्बर अशा कलाधुरीणांची रंग-रेषांची तालीम प्रा. बाळ नगरकर यांना मिळाली त्यातूनच त्यांनी चित्र व शिल्प कलेला सामाजिक-धार्मिक आणि ऐतिहासिक घटनाक्रमांशी जोडून एका वेगळ्या पद्धतीने कला विद्यार्थ्यांना शिक्षण-प्रशिक्षण-प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक स्तरावर घडविले आहे.
संगीत, नाट्य, नृत्य यांचा चित्रकलेशी समन्वय साधून कला विद्यार्थ्यांना, प्रत्यक्ष चित्रकला शिक्षण देण्याचा अनोखा प्रयोग, प्रा. नगरकर यांनी यशस्वी केला आहे. मग गणेशोत्सवातील सद्यःस्थितीवरील देखाव्यांची मांडणी असो की नवीन पिढीला प्रेरणादायी ठरणारी ऐतिहासिक-धार्मिक प्रसंग चित्रे असो, ‘नगरकरी छाप’ ही दिसतेच दिसते.
पुण्याच्या ‘अभिनव’मध्ये कलेचे शिक्षण घेतल्यानंतर महाराष्ट्रातून जी. डी. आर्ट पेंटिगला प्रथम श्रेणीत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर ‘आर्ट मास्टर’, ‘सी.टी.सी. इंटेरियर’ पुढे बेसिक फोटोग्राफीचा सरकारी डिप्लोमा उत्तीर्ण करून, या सार्या ज्ञानाचा, कला विद्यार्थ्यांना कलाध्यापन करण्यासाठी कल्पकतेने उपयोग करणारा प्राध्यापक अशी त्यांनी ‘ओळख’ निर्माण केली. १९७१ ते २०२३ अशी तब्बल ५२ वर्षे कलाध्यापन करणारे प्रा. बाळ नगरकर, कदाचित कला क्षेत्रातील एकमेवच असावेत. त्यांची एकल आणि समूह प्रदर्शने, कलारसिकप्रिय ठरलेली आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक येथे त्यांनी त्यांच्या ‘आधुनिक रचनाचित्रांची प्रदर्शने’ भरविली आहेत.
२०१३ साली त्यांनी, रोम, ग्रीक, फ्रान्स, इटली या कलावैभव असणार्या देशांच्या शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी ‘शैक्षणिक दौरा’ केला. आज कलाक्षेत्रात, जी. डी. आर्ट, एटीडी, ए. एम. अशा सुमारेे ७०-७५ वर्षांहून अधिक कलांपासून सुरू असणार्या कला अभ्यासक्रमांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक जी.डी.आर्ट, ए.एम हे अभ्यासक्रम सध्याच्या ‘बी.एफ.ए’, ‘एम. एफ.ए’च्या अनेक वर्षे अगोदरपासून सुरू आहेत. त्यांच्या अधिकृत-अनधिकृततेवर संभ्रम निर्माण केला जातो आहे. कशाच्या आधारावर? याबाबत ठोस काहीही नसताना असे संभ्रम, आभासी प्रतिमा उभ्या करतात.
परंतु, आभासी प्रतिमा फार काळ टिकत नाहीत. आधुनिक शिक्षण घेऊन ‘आर्टिफिशयल इंटेलिजन्स‘मध्ये तज्ज्ञ झालेला ‘पाल्य’ हा आपल्या जुन्या शिक्षण घेतलेल्या अनुभवी पालकांना नाकारू शकेल का? आणि अगदीच त्याने नाकारण्याचा प्रयत्न केला, तर आपली कायदेसंस्था, न्यायसंस्था आणि प्रगल्भ परंपरा या पालकांना नाकारू देणार नाही. म्हणून जुने कला अभ्यासक्रम हे कथित अनधिकृत नाहीत. त्यांच्यात आधुनिक काळाप्रमाणे सुधारणा करावी, केलीजावी. पण, ते अनधिकृतच आहेत, असा टाहो हास्यास्पद वाटतो. या अभ्यासक्रमांची मूर्तिमंत उत्तरे म्हणजे वर उल्लेखिलेली आणि आज कलाजगतात साठी पार केलेली अनेक प्रतिष्ठित, सन्माननीय नावे आहेत.
जी. डी. आर्ट शिक्षण घेतलेले प्रा. बाळ नगरकर हे के. के. वाघ शिक्षण संस्थेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ‘एम.व्ही.ए’ (मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट) अधिष्ठाता आहेत. हे एक उत्तम प्रातिनिधिक उदाहरण आहे. वरील परिच्छेदाचे.
२०२१ साली त्यांनी ‘फोर्स ऑफ पॉवर’ या विषयावर रंगसंगती रचनामांडणी यांच्या सुरेख संगमातून ५१ रचनाचित्रांचे प्रदर्शन साकारले होते, जे पाहणार्यांच्या स्मरणात आजही आहे. कला शिक्षणातून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहावा, हाच विचार त्यांनी आपल्या अध्यापनातून आणि स्व-कृतीतून मांडला.आपले विद्यार्थी कलाक्षेत्रात मोठे झाले, तरच आपण मोठे होतो, हे तत्व आणि हा विचार त्यांनी आचरणात आणला. त्यांच्या या प्रदीर्घ कलाध्यापन प्रवासासह त्यांच्या रचनात्मक कलासादरीकरणाला आणखी सुदृढ आकार प्राप्त होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
प्रा. डॉ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३