जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथल्या गोंडगावात ९ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून ठेवला. तीन दिवसांनी मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेने संपूर्ण जळगाव हादरलेलं असताना, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या पिडीत कुटुंबास भेट दिली. गोंडगावात ९ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची निघृण घटना अक्षरशः मनाला चटका लावणारी आहे. असं वाघ यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, "पोलिसांनी काही तासात त्या नराधमाच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली असून त्वरित गुन्हा दाखल केला. त्या हरामखोराला कठोर शिक्षा होईलच शिवाय चांगल्यात चांगले वकील सरकारकडून ही केस ही लढतील. परीवाराची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. मुलीचे वडील चणे फुटाणे विकत परीवाराची गुजराण करतात ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परीवाराला पक्षाकडून आर्थिक मदत केली. जी आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते परीवाराला सुपुर्द केली."
"ही घटना आमदार मंगेश चव्हाण यांच्या शेजारील विधानसभेत घडली पण मानवतेच्या दृष्टीनं त्यांनी देखील वेगळी आर्थिक मदत या कुटुंबाला दिली. आर्थिक मदतीने ती चिमुकली परत येणार नसली तरी कुटुंबियांना आर्थिक हातभार देत त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे. महिला मुलींच्या संरक्षणासाठी सक्षम सरकार आहे पोलिस आहेत ते त्यांच काम करताहेत पण, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ही सामाजिक विकृती ठेचून काढण्यासाठी समाज म्हणून आपण सगळ्यांनी एक होण्याची गरज आहे हे निश्चीत." असं चित्राताई वाघ यांनी म्हटलं आहे.