भगवंतावरील प्रेम

    09-Aug-2023   
Total Views |
Article On devotion On God And Spirituality

रामाच्या साहचर्याबरोबर त्याच्या गुणांच्या कथा, आदर्शाच्या कथा करून स्तुतिस्तोमे गायिली, ऐकली अथवा त्यांचे कीर्तन, विवरण केले, तर रामाच्या गुणांचा आदर्शाचा प्रभाव आपल्या मनावर होऊन त्यापैकी थोडेफार का होईना गुण, आदर्श आत्मसात करावेसे वाटू लागतात. त्यातून रामाला आवडेल तसे वागण्याची प्रेरणा निर्माण होते. येथे अर्थातच प्रेमाची प्रीतीची दुसरी अट साध्य होते.

परमार्थमार्गात भक्ताच्या ठिकाणी स्वाभाविकपणे अतिलीनता येणे हे देहबुद्धी कमी झाल्याचे लक्षण आहे, हे आपण मागील श्लोकाच्या विवरणात पाहिले. देहबुद्धी कमी व्हावी म्हणून समाजात वावरताना सत्कार्यासाठी आपला देह झिजवावा. भगवंताच्या सगुण मूर्ती उत्सवात पडेल ते काम करून देह कारणी लावावा. असे केल्याने भक्त साक्षेपी होतो, त्याचा त्याला परमार्थात व प्रपंचात फायदा होतो. देवाच्या उत्सव प्रसंगी अनेक सज्जन एकत्र आलेले असतात. त्यांची धारणा असते की, भगवंत हा सर्वश्रेष्ठ असल्याने माणसाची स्तुती करण्यापेक्षा देवाचे गुणगान करावे, देवाचे उत्सव साजरे करावे, अर्थात सगुण भगवंताच्या मूर्तीचे भजनपूजन करताना ते भगवंताविषयी अत्यंत आदर बाळगून केले पाहिजे.

आदर नसता केवळ बाह्योपचार सांभाळण्यासाठी अथवा आपली प्रतिष्ठा मानमरातब वाढावा म्हणून केलेल्या पूजाअर्चेला फारसा अर्थ नसतो. अत्यंत आदरपूर्वक, श्रद्धापूर्वक केलेल्या पूजनामुळे अथवा उत्सवामुळे आपले अंतःकरण शुद्ध होऊ लागते, प्रसन्न होऊ लागते आणि भगवंताचे थोडे तरी गुणसामर्थ्य ग्रहण करण्यासाठी मन तयार होऊ लागते. भगवंताचे गुण भक्ताच्या मनात उतरणे व भक्ताला प्रसन्नतेचा अनुभव येणे हा सगुण भक्तीचा मोठा फायदा असतो. त्यामुळे निर्गुणपरब्रह्माची अनुभूती घेतलेली असूनही संत, भगवंताच्या सगुण भजनपूजनाला महत्त्व देतात आणि सगुण मूर्तीच्या भजनाचा आग्रह धरतात. भगवंताच्या, रामाच्या सगुण साकार स्वरूपाविषयी प्रेम कसे वाढीस लागेल व त्याचबरोबर निर्गुण निराकार बलाचे आकलन कसे करून घेता येईल हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत-

हरीकीर्तने प्रीति रामी धरावी।
देहेबुधि नीरूपणीं वीसरावी।
परद्रव्य आणीक कांता परावी।
येदर्थी मना सांडि जीवी करावी ॥१०३॥
परमात्म स्वरूप निर्गुण निराकार आहे की सगुण साकार आहे, याच्या भानगडीत न पडता भक्ताने भगवंताच्या ठिकाणी प्रेम कसे उत्पन्न होईल व ते कसे वाढीस लागेल, याचा अभ्यास केला पाहिजे. प्रेम हा एक दैवी गुण आहे, प्रेमाची निर्मिती ही अंत:करणातून होत असते. बाहेरून कुठूनही आणून ते मिळवता येत नाही. हा नियम प्रपंचातील प्रेमालाही लावता येतो, प्रपंचातील प्रेमाची म्हणजेच प्रीतीची भावना माणसाला आनंदाच्या उर्मी व ऊर्जा देऊन जाते.

तथापि, प्रपंचातील प्रेमभावना काही तरी अपेक्षा बाळगून केलेली असते. भगवंताच्या प्रेमात समर्पणाची भावना असते. अंत:करण शुद्ध झाल्याशिवाय त्यात समर्पणाची भावना निर्माण होत नाही. समर्पणातून अंतःकरण सूक्ष्म संवेदनांसाठी सक्षम होते. प्रेम वाढीस लागण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रेमासाठी सहवास असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्याच्यावर प्रेम करायचे तेथे आपली आवड असली पाहिजे आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आवडीनिवडीनुसार आपले वागणे असेल पाहिजे. प्रपंचातील प्रेमात या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तसेच परमार्थात म्हणजे भगवंताच्या भक्तीतही या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. भक्तिमार्गात सगुण मूर्तीत प्रत्यक्ष भगवंत श्रीराम गुणस्वरुपाने तेथे विराजमान आहेत, अशी दृढ भावना करावे लागते. विश्वचालक परमात्मतत्व आपल्या समोर असलेल्या भगवंताच्या मूर्तीत आहे, अशी कल्पना केल्याने रामाच्या सहवासात राहता येते. हीच दृष्टी मानसपूजेत ठेवल्यास तेथे रामाच्या सान्निध्याचा अनुभव घेता येईल, ही अनुभूती अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यासाठी आपले अंत:करण शुद्ध करून सूक्ष्म संवेदना अनुभवण्यासाठी ते कसे सक्षम करता येईल, याचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी भगवंताचे कीर्तन अथवा हरिचे गुणगान उपयोगी पडते. यासाठी समर्थ या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगतात की, ‘हरिकीर्तने प्रीति रामी धरावी.’
 
वस्तूला आकार असल्याशिवाय आपण ती पाहू शकत नाही किंवा त्याची कल्पना करू शकत नाही. कारण, मनाला तशी सवय आलेली असते. यासाठी रामाला सगुण साकार रूपात पाहिले, तर त्याचा सहवास घडतो. त्यातून प्रेमाची पहिली अट साध्य होते. रामाच्या साहचर्याबरोबर त्याच्या गुणांच्या कथा, आदर्शाच्या कथा करून स्तुतिस्तोमेगायिली, ऐकली अथवा त्यांचे कीर्तन, विवरण केले, तर रामाच्या गुणांचा आदर्शाचा प्रभाव आपल्या मनावर होऊन त्यापैकी थोडेफार का होईना गुण, आदर्श आत्मसात करावेसे वाटू लागतात. त्यातून रामाला आवडेल तसे वागण्याची प्रेरणा निर्माण होते. येथे अर्थातच प्रेमाची प्रीतीची दुसरी अट साध्य होते. हरिकीर्तनात भगवंताचे गुण गायल्याने अथवा ही स्तुती ऐकल्याने आपले रामावर प्रेम जडेल आणि रामाच्या प्रेमाची अनुभूती येऊन मन प्रसन्न होऊ लागेल. भगवंताच्या सगुण साकार मूर्तीवर प्रेमाचा वर्षाव करून सर्व साधेल असे नाही. देहबुद्धीकडे लक्ष देणेही तितकेचे महत्त्वाचे असते.

हा देह म्हणजेच मी असे मानल्याने भगवंतावर प्रेम करणारा, त्याचे गुणगान गाणारा असा हा मी इतरांपेक्षा वेगळा असून माझा दर्जा इतर सामान्यांपेक्षा वरचा आहे,असा भ्रम निर्माण होतो. आपल्या भक्तिप्रेमाची जो माणूस स्वतः प्रशंसा करतो, त्याची देहबुद्धी वाढली आहे, असे समजायला हरकत नाही. हे टाळायचे असेल, तर हरिकीर्तनाबरोबर निर्गुण परत्म्याचे निरुपण करावे- त्या निरुपणात मीपणाला विसरून भगवंताच्या निराकार रूपाचे विवरण झाल्याने देहबुद्धीचा विसर पडतो. देहबुद्धी विराम पावल्यावर गर्व, ताठा, मीपणाच्या श्रेष्ठत्वाची भ्रांती सारे अंतर्धान पावते आणि निखळ परब्रह्मस्थिती अनुभवता येते. भक्त वेगळेपणाने न राहता भगवंताच्या गुणात लिप्त होऊन जातो. ही अंतिम अवस्था अतिसूक्ष्म असते. ती प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रापंचिक व्यवहारात जपून वागावे लागते. देहबुद्धीकडे खेचणार्‍या दोन गोष्टी म्हणजे पैसा आणि लिया, यासाठी साधकाने परद्रव्य आणि दुसर्‍याची बायको यांपासून सावध राहिले पाहिजे.

परद्रव्य आणि परक्याची कांता यासंबंधी विचारही न करण्याची सवय आपल्या मनाला लावावी. समर्थविचारात चारित्र्याला अत्यंत महत्त्व आहे. दासबोधातही समर्थांनी ’द्रव्य दारा पाहों नये। आळकेपणे।’ असा उपदेश केला आहे. रामावर प्रेम करून निराकाराचे निरूपण केल्याने आणि दुसर्‍याचा पैसा व स्त्रिया यासंबंधी जागरूक राहून चारित्र्यसंपन्न जीवन जगल्यानेच राम आपल्यावर कृपा करतो, हे स्वामींना सांगायचे आहे. हे सर्व सांगायला, कल्पना करायला सोपे आहे, पण आचरणात आणायला कठीण आहे. हा विषय समर्थांनी यापुढील श्लोकासाठी घेतला आहे. (क्रमश:)

७७३८७७८३२२

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..