दहशतवादी हल्ले होण्याआधीच ते थांबवणे, हे खरं तर सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान. दहशतवादी हल्ले काही वेळा विशिष्ट दिनाच्या निमित्तानेसुद्धा घडवले जातात. त्यातून दहशतवादी संघटनेला त्या राष्ट्राला पराभूत केल्याचा एक प्रतीकात्मक असुरी आनंद घ्यायचा असतो. पण, सजगता राखल्यास असे हल्ले टाळता येणे शक्य होते. साधी वाटणारी कर्तव्याची वाट जरी सामान्य नागरिकांनी प्रामाणिकपणे चालली, तरी उत्तम सुरक्षा राखली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, आगामी १५ ऑगस्ट आणि त्या पार्श्वभूमीवर ‘इसिस’चे समोर आलेले ‘पुणे मोड्युल’ हे गांभीर्याने घेतले पाहिजे.
ही घटना आहे दि. २२ डिसेंबर २००१ची...
पॅरिसहून मियामीला निघालेल्या ‘फ्लाईट-६३’ मध्ये जेवण झाल्यानंतर एका प्रवाशाला काही तरी जळाल्याचा वास येऊ लागला. त्याने ‘केबीन क्रू’कडे तक्रार केली. मग हर्मिस मौटार डीअर नावाची फ्लाईट अटेंडंट नेमके काय जळतेय, याचा शोध घेत एका प्रवाशाच्या जवळ आली. तो टक्क माचीस पेटवायच्या प्रयत्नात होता. तिने त्याला विमानात सिगारेट पिण्यास सक्त मनाई असल्याचे सांगितले. मग त्याने नियम पाळण्याचे वचनही दिले. काही मिनिटांतच पुन्हा त्याने वाकून काही तरी पेटवण्याचा प्रयत्न केला. मग मात्र हर्मिस त्याच्या जवळ गेली. त्याने तिला पकडले आणि तरीही माचीस पेटवण्याचा प्रयत्न केला. हा माणूस होता-रिचर्ड कोलविन रेड. त्याने चक्क त्याच्या बुटात स्फोटके लपवलेली होती आणि त्या स्फोटकांना उडवण्याच्या तो प्रयत्नात होता. मग विमानातील प्रवाशांनी रिचर्डला धरले. सिटबेल्ट, हेडफोनच्या वायरी, असे जे मिळेल त्याने त्याला पकडून ठेवले. मग प्रवाशांपैकी एका डॉक्टरने विमानाच्या ‘इमर्जन्सी कीट’ मधील इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध केले. विमान त्वरित बोस्टनला उतरवण्यात आले. रेडच्या बुटातील स्फोटकांचा ‘फ्युज’ ओलसर वातावरणामुळे त्वरित कार्यान्वित होऊ शकला नव्हता. नंतर माहिती कळली की, रेड हा इस्लामिक दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्यामुळे आत्मघातकी दहशतवादी बनला होता. त्याला नंतर शिक्षाही झाली. पण, सुदैवाने एका प्रवाशाच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टाळला होता.
दुसरी घटना आहे पुण्याची. ‘इंडियन मुजाहिद्दीन’ने (आयएम) पुण्याला जर्मन बेकरी येथे दि. १३ फेब्रुवारी २०१० मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. त्याचवेळी त्याच दिवशी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातसुद्धा बॉम्बस्फोट घडवण्याची तयारी करण्यात आली होती. ‘आयएम’चा मुहम्मद कातील सिद्दिकी याला जेव्हा पोलिसांनी अटक केली; तेव्हा त्याने ही कबुली दिली. सिद्दिकी आणि यासीन भटकळ याने, त्यादिवशी दोन ठिकाणी बॉम्ब पेरण्याची तयारी केली होती. भटकळने जर्मन बेकरीत एक बॉम्ब पेरला, तर सिद्दिकी दगडूशेठ मंदिर येथे गेला. त्याने एका फुल विक्रेत्याच्या जवळ बॉम्बची बॅग ठेवली आणि तो निघाला. पण, फुल विक्रेत्याने बॅग ठेवू दिली नाही. त्यांचा वादसुद्धा झाला. शेवटी संशय येऊ नये, म्हणून सिद्दिकी बॅग घेऊन फरार झाला. पुण्यात दोन्ही बॉम्ब हे एकाच वेळी संध्याकाळी ७.१५ वाजता व्हावेत, म्हणून ‘टायमर सेट’ केलेले होते. पण, दगडूशेठ गणपती मंदिराजवळ बॉम्बस्फोट होऊ शकला नाही. ही मोठी हानी एका फुल विक्रेत्याच्या सजगपणामुळे टळली. नंतर मग सिद्दिकीने हा बॉम्ब निष्प्रभ केला आणि तो मुंबईला आला. या दोन्ही उदाहरणात सामान्य नागरिकांच्या सजगतेमुळे मोठी जीवितहानी टळली, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
नुकतेच पुण्याला दोन जणांना दुचाकी चोरताना पोलिसांनी अटक केली आणि घातपाताचा मोठा कट उधळून लावला. गाडी चोरणारे काही साधे चोर नव्हते, तर ते ‘इसिस’चे मोठ्या मोड्युल भाग होते. त्यांच्याकडे ड्रोनचे साहित्य, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी पावडर यांसारख्या आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’ (एनआयए) ज्यांचा शोध घेत होती, तेच हे दहशतवादी होते. दहशतवादविरोधी पथकाने त्यांना आश्रय देणार्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाणला अटक केली. या दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणीसुद्धा केल्याचे तपासाअंती समोर आले. ‘एनआयए’ने डॉ. अदनान अली सरकार या भूलतज्ज्ञाला ‘इस्लामिक स्टेट’चे काम करत असल्याच्या संशयावरून अटक केली. ही सगळी कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे भेटीच्या केवळ काही दिवस आधी झालेली आहे. त्यामुळे त्यांचा हा कट किती मोठा घातक ठरू शकणार होता, याची कल्पना येते. एकूणच काय तर सामान्य नागरिकांची आणि सुरक्षा यंत्रणांची सतर्कता मोठी हानी टाळू शकतात, हेच यावरुन सिद्ध होते.
दि. १५ ऑगस्ट जवळ येत आहे. देशाची सुरक्षा जपणे, ही केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी नाही, तर सामान्य नागरिक म्हणून आपलेसुद्धा कर्तव्य आहे. संशयास्पद हालचाली जाणवल्या, तर सुरक्षा यंत्रणांना माहिती द्यावी-
संशयास्पद हालचाली पुढील प्रमाणे असू शकतात.
- विनाकारण एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ रेंगाळणारी व्यक्ती.
- एखाद्या ठिकाणचे आवाज रेकॉर्ड करणे, व्हिडिओ काढणे, फोटोग्राफी, स्केचेस काढणे. विशेषतः अशा जागांचे फोटो घेणारी व्यक्ती की, ज्यांना काहीही ’टुरिस्ट व्हॅल्यू’ नाही.
- एखादी व्यक्ती की, जी सतत कुणाशी तरी संवाद साधत आहे. एकटा माणूस, ज्याला घाम फुटला आहे. जो स्वतःचे हात लपवत आहे किंवा हाताला खिशामध्ये दडवून सतत वावरत आहे.
- सुरक्षा यंत्रणांशी बोलताना जो खूप अडखळतो. सुरक्षा रक्षकांच्या खूप जवळ जाण्याचे टाळतो.
- जाड कपड्यांच्या खाली काही तरी दडवणारा माणूस. जे कपडे त्या ऋतूलाही फारसे उपयोगाचे नसतात, असे कपडे घातलेला.
- त्याचप्रमाणे कपड्याखाली लपवलेल्या वस्तू तिथे आहेत की नाही, याची वारंवार पडताळणी करणारा.
- ज्या ठिकाणी फारसे कुणी जात नाही. उदा. इलेक्ट्रिकचे केबिन, आणीबाणीच्या काळी वापरण्याच्या पायर्या, व्हेंटिलेशनच्या खिडक्या, काही पूल इ. ठिकाणी विनाकारण रेंगाळणारा. ही व्यक्ती स्वतः आत्मघातकी दहशतवादी नसली, तरीही ती त्यासाठी साहाय्यक असू शकते.
- व्यक्ती गर्दीत बेमालूमपणे मिसळून जाणारी असते. याउलट क्वचित ही व्यक्ती गणवेशात सुद्धा असू शकते. त्या ऋतूला शोभणारे कपडे घातलेले नसू शकतात. शस्त्रे दडवता येतील, असा पेहराव केलेली असू शकते.
काही वेळा अशी व्यक्ती एखाद्या स्थानिक व्यक्तीकडे अनेक चौकशा करत असते. उदाहरणार्थ- इथे खूप गर्दी असते का? इथे पोलीस नेहमीच असतात का? बिल्डिंगच्या सुरक्षेसाठी काय सोय आहे? लिफ्ट बंद झाली, तर पायर्या कुठून आहेत? विशेषतः जेव्हा दहशतवादी हल्ला चढवतात, त्याआधी ते त्या स्थळाची रेकी करतात. त्यावेळी त्या ठिकाणाचे निरीक्षण, चित्रीकरण, सुरक्षा व्यवस्था यांचा अंदाज घेत असतात. एका संदर्भानुसार २६/११ला मुंबईवर हल्ला करण्याआधी डेव्हिड कोलमन हेडली याने सखोल रेकी केली होती. त्याने मुंबईला सिद्धिविनायक देवस्थानाची आणि महालक्ष्मी मंदिराचीसुद्धा रेकी केलेली होती. त्याने एका ठिकाणी एका पोलिसाच्या हातातली रायफल पाहून त्याला विचारले होते, ’ये चलती हैं क्या?’ एखादी व्यक्ती सहजपणे चौकशी करावी, तशी माहिती गोळा करत असते. त्यावेळी नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे.
- रसायनांची मागणी मागणी केली, तर दुकानदाराने सावध व्हावे. कारण, स्फोटकांची तीव्रता त्याद्वारे वाढवली जाते.
- हॉटेलमध्ये खूप वेळ राहणारी; पण फारसे सामान नसणारी व्यक्ती, ही संशयाच्या परिघात घेतली जाते.
- बिले कॅशने देणारी व्यक्ती.
- एका बाजूचे विमानाचे तिकीट काढणारी व्यक्ती, ही संशयाच्या भोवर्यात असते.
- सोशल मीडियावर अचानक तीव्र धार्मिक पोस्ट टाकणारी व्यक्ती, प्रचंड प्रमाणात धार्मिकतेवरून वाद घालणारी किंवा अचानक धार्मिक चिन्हे वापरू लागणारी व्यक्ती यावर लक्ष ठेवावे. प्रसंगी सुरक्षा यंत्रणांना कळवावे.
विशेषतः गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचार्यांना खूप सावधपणा बाळगावा लागतो. त्यांच्यावर ताण येत असतो. प्रसिद्ध स्थळांच्या बाहेरच्या हातगाडीवाले, फेरीवाले, लहान-मोठे दुकानदार या सर्वांनाच सजग राहावे लागते. हॉटेल, दवाखाने, मॉल, शाळा, चित्रपटगृहे हे सर्व ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात. जेव्हा आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असतो किंवा मोठ्या हॉटेलमध्ये असतो, तेव्हा आपण ‘सॉफ्ट टार्गेट’ बनून गेलेले असतो. आपण सगळेच जण नागरिक म्हणून देशाचे काही देणे लागतो. सतर्कता ही सर्वच नागरिकांनी जोपासली पाहिजे. आपल्या आजूबाजूला, शेजारी कोण वावरते, कोण नवीन राहायला आले आहे? याची माहिती असणे गरजेचे आहे.
दहशतवादी हल्ले स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय घडून येणे कठीण असतात. आधी नियोजन आणि मग कृती असते. म्हणूनच या दोन्हींच्यामध्ये कुठे तरी संभाव्य हल्ले थांबवता येऊ शकतात!
रुपाली कुळकर्णी-भुसारी
rupalibhusari@gmail.com