मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये 'डीएनबी' अभ्यासक्रमाकरिता शिक्षक पदांची भरती
पालिकेच्या ६ उपनगरीय रूग्णालयांमध्ये "डीएनबी" या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची सुविधा
07-Aug-2023
Total Views | 113
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सहा उपनगरीय रूग्णालयांमध्ये 'डीएनबी' (डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम ) अभ्यासक्रमाकरिता शिक्षक पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली असून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे. महानगरपालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अर्ज उपलब्ध आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
'या' रूग्णालयांमध्ये होणार भरती
या भरतीअंतर्गत वैद्यकीय शिक्षकांची ३४ आणि इतर ८ अशी एकूण ४२ पदे भरण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरातील कुर्ला (पश्चिम) परिसरातील खान बहादूर भाभा सर्वोपचार रूग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात १, जनरल मेडिसिन विभागात ३ पदे, यानुसार ४ पदे भरण्यात येणार आहेत.
घाटकोपर परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनाजी अमीदास व्होरा सर्वोपचार रूग्णालय राजावाडी येथे रेडिऑलॉजी विभागात २, कान, नाक आणि घसा विभागात १, अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात १, जनरल सर्जरी विभागात १, अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.
पश्चिम उपनगरातील कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रूग्णालयातील पेडीअॅट्रीक विभागात १, स्कीन अॅंड व्ही. डी. विभागात २ आणि अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.
वांद्रे (पश्चिम) येथील खुरशादजी बेहरामजी भाभा सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात २, पेडीअॅट्रीक विभागात २, अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात २, रेडिऑलॉजी विभागात २, पॅथॉलॉजी विभागात १ आणि कान, नाक, घसा विभागात १ अशी एकूण १२ पदे भरण्यात येणार आहेत.
गोवंडी परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी सर्वोपचार रूग्णालयात जनरल मेडिसिन १, अॅनॅस्थेसिओलॉजी आणि रेडिओलॉजी विभागात २, अशी एकूण ३ पदे भरली जाणार आहेत.
सांताक्रुझ परिसरातील विष्णूप्रसाद नंदराय देसाई सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात १ तर रेडिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच याच रूग्णालयांमध्ये शिक्षकांशिवाय इतर ८ पदे देखील भरण्यात येणार आहेत.