जैवविविधता की आर्थिक प्रगती?

    07-Aug-2023   
Total Views | 81
Oil drilling threatens the Okavango River Basin

आफ्रिका खंड हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध असलेला जगातील खंड. प्राणी, पक्षी, वनस्पती, मासे अशा जगभरातील परिचित प्रजातींपैकी दहा टक्के प्रजाती केवळ आफ्रिकेत आढळतात. शिकारी आणि वृक्षतोड यांबरोबरच इथल्या जैवविविधतेला अनेक धोके सध्या निर्माण झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक मूल्यवान असलेल्या तेलाच्या उत्खनन प्रक्रियेत जैवविविधतेचा मात्र विचार होतोच असे नाही.

दक्षिण आफ्रिकेतील एक जागतिक वारसा स्थळ तसेच गोड्या पाण्यातील सर्वांत मोठा आर्द्र प्रदेश असलेले ओकावांगो या नदीचं खोरंही सध्या असेच अडचणीत सापडले आहे. आफ्रिकेतील नामिबिया आणि बोत्सवाना देशांमधील असलेलं ओकावांगो नदीचं खोरे अतिप्रमाणात झालेल्या तेल उत्खननामुळे धोक्यात आल्याचे वृत्त आहे.

एकूण सात लाख चौ.किमीचे क्षेत्र व्यापणारे ओकावांगो नदीचे हे खोरं अंगोला, नामिबिया आणि बोत्सवाना या देशांमधून जाते. एक हजारांहून अधिक वनस्पती प्रजाती, ४८० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती, १३०हून अधिक सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि मासे अशी समृद्ध जैवविविधता असलेले हे ओकावांगोचं खोरं आता तेल आणि वायू उत्खननाच्या गर्तेत सापडले आहे. या खोर्‍यातील समृद्ध जैवविविधतेमुळे या खोर्‍यावर पाच लाखांहून अधिक लोकांचे जनजीवन अवलंबून आहे. शेती, पशुपालन, मासेमारी आणि पर्यटन, असे प्राथमिक व्यवसायच इथल्या लोकांची प्रमुख उपजीविकेची साधने. उत्खननामुळे धोक्यात आलेल्या या जलस्रोतांना आणि येथील नागरिकांना त्याचा धक्का पोहोचणार आहे, हे स्पष्ट आहेच. ते कसे ते पाहूया.

दक्षिण आफ्रिकेतीलच क्युबँगो ओकावांगो असे ओळखले जाणार्‍या या नदीच्या खोर्‍यात तेल उत्खननासाठी ‘रेकॉन आफ्रिका’ या कॅनेडियन कंपनीला परवानगी देण्यात आली. क्युबँगो ओकावांगो नदीचं खोरं ३४ हजार चौ. किमी क्षेत्रात पसरलेले आहे. या नदी खोर्‍यात तेल उत्खननासाठी परवाने दिल्यामुळे याचे प्रमाण वाढले असून, ही बाब चिंताजनक होत चालली आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, हे परवाने तेल आणि वायू उत्खननासाठी प्रोत्साहित करणारे असेच आहेत. नामिबियातील ओमाटाको या नदीजवळ उत्खनन केल्यामुळे येथील भूजल पातळी धोक्यात आली आहे. स्थानिक जनजीवन मोठ्या प्रमाणात भूजलावर अवलंबून असल्यामुळे पाणी पातळी कमी झाल्यावर किंवा उथळ असताना, ते सहज दूषित होऊ शकते आणि त्याचे परिणाम जनजीवनावर जाणवतात. तसेच, उत्खननामुळे येथील परिसंस्थेवर झालेले परिणाम जैवविविधतेचे नुकसान तर करतीलच; पण स्थानिकांची ही उपजीविका अवलंबून असल्यामुळे, ते ही विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.
 
‘रेकॉन आफ्रिका’ या परवाना दिलेल्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, या भागात मोठ्या प्रमाणात तेल आणि वायू संसाधने आहेत. पण, हे तेलसाठे पुनर्प्राप्त करणे, आर्थिकदृष्ट्या परवडणारे असेल की, नाही, याबाबत ही कंपनी स्वतः साशंक आहे. दुसरीकडे भूगर्भशास्त्रज्ञांनी मात्र हे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, असे सांगितले आहे.

असं असतानादेखील ‘रेकॉन आफ्रिका’ या कंपनीने केलेल्या पर्यावरणीय मूल्यांकनामध्ये उत्खननामुळे होणार्‍या कोणत्याही गंभीर धोक्यांचा उल्लेखच आढळत नाही. या मूल्यांकनाच्या आधारे नामिबियातील सरकारने कंपनीला पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र दिले असले, तरी कोणत्याही निश्चित परिणामांची माहिती उपलब्ध नसताना केलेल्या या मूल्यांकनावर अवलंबून न राहता भूजल स्रोत, त्याचे मार्ग यांची योग्य माहिती आणि समज येईपर्यंत येथील उत्खनन तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी एका संशोधन संकेतस्थळाद्वारे करण्यात आली आहे.

खनिज तेल असलं म्हणजे आपण श्रीमंत होऊ या परिस्थितीत असताना एखाद्या देशाकडून आणखी काय अपेक्षा करणार; पण श्रीमंत आणि विकासाच्या हव्यासापोटी ज्या पृथ्वीग्रहावर आपण राहतो, तिचाच यथायोग्य वापर करत आहोत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. खनिज तेल मिळेल किंवा न मिळेल, याबद्दल साशंक असतानाही सर्रास केलेलं उत्खनन आणि सरकारचे कंपन्यांना दिलेले अविचारी परवाने म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी,’ असेच म्हणावे लागेल!

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा
ॲग्रीस्टॅक योजनेत 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ॲग्रीस्टॅक योजनेत 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरित्या पोहचाव्यात यासाठी ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. यात डिजीटल सेवांचा अंतर्भाव असल्याने शेतकऱ्यांना तेवढ्याच पारदर्शकपणे योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असलेल्या या योजनेंतर्गत येत्या 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी. या कामात टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीयस्तरावरील जबाबदार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121