मुंबईत घातपाताचा कट उधळला; संशयित दहशतवाद्यांकडून माहिती
06-Aug-2023
Total Views | 266
मुंबई : दहशतवादी कट कारस्थानात सहभागी असल्याच्या आरोपाखाली गेल्या काही दिवसांत सहा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने ताब्यात घेतले आहे. हे दहशतवादी मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली आहे. वेळीच त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे घातपाताचा डाव उधळण्यात आला आहे.
दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि ‘एनआयए’ने अनेक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले, असून दि. ५ ऑगस्ट रोजी ‘आयसिस’च्या महाराष्ट्र मोड्यूलशी संबंधित सहावी अटक करण्यात आली. या संशयितांकडून महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. ‘एनआयए’च्या पथकाने आकिफ नाचनला भिवंडीमधील पडघ्यातून अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून घातपाताच्या हल्ल्यासंदर्भात धक्कादायक माहिती मिळाली आहे.
आकिफला ‘एनआयए’ने न्यायालयात हजर केले असता, युक्तिवाद करताना ‘एनआयए’च्या वकिलांनी दावा केला की, या सर्व दहशतवाद्याचा मुंबईमध्ये दहशतवादी कारवाई करण्याचा हेतू होता. मात्र, त्यांनी हे कारस्थान करण्याआधीचं त्या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे आणि अजूनही लोक यात सामील असू शकतात, अशी शक्यता ‘एनआय’ने वर्तवली आहे. नाचन आणि इतरांना परदेशी दहशतवादी संघटनांनी प्रशिक्षण दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या संशयित दहशतवाद्यांची चौकशी केली असता, हे लोक एकमेकांशी संपर्क करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान यंत्रणेचा वापर करत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आकिफने इतर आरोपींच्या राहण्याची सोय केली होती. तसेच, तो स्फोटके बनवून त्याच्या परिक्षणात सहभागी होता, असा दावाही ‘एनआयए’ने केलेल्या आरोपातआहे.
आकिफ इतर आरोपींच्या मदतीने मुंबईत घातपात करण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणि बनावट कागदपत्रे सापडली आहेत. याआधी महाराष्ट्राच्या विविध भागातूनसंशयित दहशतवाद्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. यातील दोघांना पुण्यातील कोथरुडमधून, एकाला रत्नागिरीमधून अटक करण्यात आली होती.