डोंबिवलीचा कृतिशील ‘रोटरियन’

    06-Aug-2023   
Total Views | 111
Article On Rotarian Nilesh Gokhale

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’च्या माध्यमातून निलेश गोखले यांनी कालच्या रविवारीच रानभाज्या, कडधान्य आणि मिलेट्स महोत्सव भरविला होता. त्यानिमित्ताने त्यांच्या एकूणच समाजकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

निलेश गोखले यांचे शालेय शिक्षण डोंबिवली येथील टिळक नगर हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मॉडेल महाविद्यालयामधून पूर्ण करून ‘बीकॉम’ ही पदवी संपादन केली. बारावीत शिक्षण सुरू असतानाच ‘आयआरडीए’ची परीक्षा देऊन त्यांनी ‘एलआयसी’ची एजन्सी घेतली आणि एजंट म्हणून ते काम करू लागले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत, त्यांचा व्यवसायात थोडा जम बसू लागला. हाडाचे व्यावसायिक असल्याने त्यांना या कामातून आनंद मिळू लागला. निलेश यांचे वडील ‘एलआयसी’ योगक्षेम ऑफिसमध्ये कार्यरत होते.

निलेश यांना तीन भावंडे आहेत. त्यात निलेश शेंडेफळ असल्याने सगळ्यांचे लाडके. त्यांच्या आईचा प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय होता. आईने मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसाय उभारला होता. आईला ही भावंड प्रेसच्या कामात मदत करीत असत. आईच्या हाताखाली काम करताना व्यवसायातील बारकावे ते शिकू लागले. त्यांच्या आईला ‘महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिज,’ मुंबई यांचा ‘यशस्वी महिला उद्योजिका’ म्हणून पुरस्कारही मिळाला. निलेश यांना लहानपणापासूनच व्यवसायाचे बाळकडू मिळाले. त्यांचे आईवडील दोघेही आज या जगात नाहीत. पण, आईने आखून दिलेल्या मार्गावरून चालत यशाचा एक एक टप्पा पार करत इथवरचा प्रवास त्यांनी केला.

पॉलिसीधारकांच्या विश्वासामुळे आज, ते या व्यवसायात घट्ट पाय रोवून उभे आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी म्हणून त्यांनी आरोग्य विम्याचे काम करणेदेखील सुरू केले. आता ‘एलआयसी’ सोबतच ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’, ‘स्टार हेल्थ’ , ‘श्रीराम फायन्नास’, ‘केअर हेल्थ’ आदी कंपन्यांचे काम ते करतात. त्याच सोबत ते म्युच्युल फंडचेदेखील काम करतात. निलेश यांची डोंबिवलीच जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याने डोंबिवलीकरिता काही, तरी चांगले काम करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. जुलै २००५ मध्ये ’रोटेरियन’ श्रीधर गोडसे यांनी निलेश यांना ’रोटरी संस्थे’विषयी सांगितले आणि त्यांच्यामुळे या संस्थेशी ते जोडले गेले. रोटरी’तील कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी त्यांनी ‘रोटरी’तील वेगवेगळ्या पदांवरील जबाबदार्‍यांचेही निर्वहन केले आहे.

दि. १ जुलै ते ३० जून असे ‘रोटरी’च्या कार्याचे वर्ष असते. या वर्षी दि. १ जुलै रोजी निलेश यांनी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या क्लबची स्थापना २०१९ मध्ये झाली. क्लब नवीन आणि लहान असला, तरी मागील सगळ्या वर्षांत क्लबने उल्लेखनीय कामे केली आहे. छोट्या छोट्या कृतीतून उत्कृष्ट काम करत समाजात आशा निर्माण करण्याचे स्वप्न निलेश सगळ्या सदस्यांच्या साथीने पाहत आहेत. ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून त्यांनी नुकतेच डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरांतर्गत ५१ पेक्षा अधिक पिशव्या रक्त जमा करण्यात आले. ’डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने डोंबिवली पश्चिम येथील शास्त्री नगर रूग्णालय येथे १८ डॉक्टरांचा तसेच क्लबमधील सहा डॉक्टरांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

‘चार्टर्ड अकाऊंटंट डे’च्या निमित्ताने ‘सीए’चे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ‘रोटरी अन्नपूर्णा दिवसा’चे औचित्य साधून शास्त्री नगर हॉस्पिटल येथील ३४ नवजात शिशूंच्या मातांना पौष्टिक लाडू देण्यात आले. तसेच, डोंबिवली पूर्व येथील ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये २० वृद्धांनाही लाडू वाटप करण्यात आले. दधिची देहदान मंडळास देहदानाचे तीन फॉर्म सुपुर्द करण्यात आले. अशारितीने तीन जणांनी देहदान, नेत्रदान आणि त्वचादान करण्याचा संकल्प केला. यावर्षी क्लबद्वारे ‘देहदान’ हा प्रकल्प वर्षभर राबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देहदानाविषयी जास्तीत जास्त नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून भविष्यात नागरिक देहदानासाठी पुढे येतील, असा त्यांचा मानस आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक, ठाणे शहर आणि गुन्हे शाखा विभाग तसेच अमली पदार्थ शोधक ठाणे शहर या शाखांमधील कार्यरत असलेल्या श्वानांना पदक आणि त्यांच्या प्रशिक्षकांना पारितोषिक (ट्रॉफी) देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

गुरू-शिष्याचे नाते अधोरेखित करणारा सण म्हणजे ‘गुरुपौर्णिमा.’ ही गुरुपौर्णिमा ‘रोटरी क्लब’तर्फे साजरी करण्यात आली. संवाद प्रबोधिनी कर्णबधीर शाळा, डोंबिवली पश्चिम येथील विद्यार्थ्यांना वह्या तसेच इतर शालोपयोगी वस्तू देण्यात आल्या. बीज संकलन करून विविध देशी झाडांच्या बिया ‘हरियाली एनजीओ’ ठाणे यांच्या डोंबिवलीतील शाखेला देण्यात आली. वर्तमानपत्र वाटणार्‍या मुलांना रेनकोट तसेच गरजू भाजी विक्रेत्यांना मोठ्या आकाराच्या छत्र्या दिल्या. क्लबतर्फे डोंबिवलीतील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरवदेखील करण्यात आला, अशा तर्‍हेने ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून ते यंदा काम करीत आहेत.

दि. ६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कृषी विभागासोबत त्यांनी डोंबिवलीतील आगरी समाज हॉलमध्ये रानभाज्या आणि मिलेट्स महोत्सवाचे देखील आयोजन केले होते. या महोत्सवात भाज्या आणि मिलेट्सची खरेदी करता येईल, याचा थेट नफा वनवासी शेतकर्‍यांना मिळणार आहे. या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून येत्या वर्षभरात महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच समाजातील तळागाळातील नागरिकांकरिता अनेक समाजोपयोगी कामे करण्याचा त्यांचा मानस आहे . त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!


अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

"पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये"; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे...

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121