जीवनासाठीच कला आणि कलेसाठीच जीवन’ असे मानत कलेतून जीवन जगणार्या आणि जीवनातूनच कला फुलवणार्या रसिकाची जीवनगाथा म्हणजे ना. धों. महानोरांची गाथा म्हटली पाहिजे. दि. १६ सप्टेंबर १९४२ साली औरंगाबादच्या पळसखेड्यात जन्मलेल्या महानोरांना पावसाचं आणि त्या पावसाने फुलणार्या आणि कणाकणाने उमलणार्या निसर्गाचं आत्यंतिक वेड. पण, ते वेड केवळ त्या निसर्गाभोवतीच, रानाभोवतीच रमले नाही, तर ते वेड, त्या कवी संवेदना निसर्गावर अवलंबून असलेल्या मानव आणि पशुपक्ष्यांच्या बाबतीतही बोलत्या झाल्या.
महानोरांच्या ’प्रार्थना दयाघना’ आणि ’गंगा वाहू दे निर्मळ’ ही दीर्घकाव्य वाचताना ते पदोपदी जाणवतं. निसर्गचक्रावर आयुष्यच बेतलेल्या शेतकरीराजाचा हुंदका नाधोंच्या अंतरंगाला पेटवून जात होता. पाऊस नाही, पीक नाही आणि पीक नाही, म्हणून जगरहाटीची देवघेव न करता येणारा शेतकरी. त्यातून त्याने काढलेलं कर्ज आणि त्या कर्जातून त्याची होणारी पिळवणूक, त्याची होणारी तगमग आणि केव्हातरी असाहाय्य होत त्याने केलेली आत्महत्या... शेतकर्याच्या आत्महत्येने अस्वस्थ झालेले महानोर त्यांच्या कवितेत त्या मृत शेतकर्याच्या पत्नीचा विलाप मांडतात की,
एकदा एक मोटारगाडी
वसुलीसाठी आली
व्याजासह लाखाचं वारंट लाऊन गेली
कोर्टामधील पैशाचा दावा दाखल झाला
तसा देव माणूस माझा
राती गोळ्या खाऊन मेला...
आपला धनी कसा देवमाणूस होता. मात्र, कर्जवसुली आणि वारंट, कोर्टकचेरीचे जंजाळ यातून होणारी बेईज्जती वाचवण्यासाठी, त्याने कशी आत्महत्या केली, असे सांगणारी ती पत्नी! मात्र, त्यांच्या कवितेतली स्त्री ही नुसतीच विलाप करणारी नाही, तर मृत शेतकर्याची पत्नी पुढे म्हणते की,
पोरी शपथ सांगते दादा
सोडणार नाही त्याला
ज्यानं माझ्या कुंकवाचा
सत्यानाश केला...
ज्याचं जळतं त्यालाच कळतं. कर्जापायी आत्महत्या केलेला आणि भरलं घर वार्यावर सोडून जाणार्या शेतकर्याच्या पत्नीचे हे दुःख, हा आक्रोश नाधोंनी समर्थपणे मांडला आहेच. पण, त्याचबरोबर तिच्या मनातले न्याय्य जाणिवेसाठीचे पडसादही त्यांनी सार्थपणे मांडले आहेत.
दुसरीकडे बलात्कार झालेल्या स्त्रीच्या वेदना मांडताना नाधोंचे शब्दही वेदनामयी होतात. त्या निष्पाप स्त्रीवर किती अत्याचार झाला असेल, हे सूचक आणि मनात संताप उत्पन्न करणार्या शब्दात नाधो लिहितात की,
मांडीपासून उभाच न
राहणारा तिचा पाय
तिला तिचा पाय कोण देणार?
याहीपेक्षा साहेब
आत्महत्येच्या वाटेत
निघालेल्या तिच्या
आयुष्याच काय?
तिला तिचा पाय कोण देणार?
हे शब्द त्या स्त्रीच्या सर्वार्थाने कोलमडून गेलेल्या जाणिवा आणि अस्तित्व व्यक्त करते. ती वेदना कोणत्याही संवेदनशील माणसाच काळीज चिरल्याशिवाय राहत नाही, याच परिक्षेपात पाहिले तर जाणवते की, नाधोंनी कवितेमध्ये बलात्कार झालेल्या स्त्रीची व्यथा मांडतानाच तिच्यावर झालेल्या अन्यायाचा जाब विचारणारीही स्त्री उभी केली. नाधोंच्या कवितेली स्त्री ही समर्थ आणि न्याय्य नीतीसाठी आवाज उठवणारी आहे. बलात्काराची घटना दडपून टाकणार्या जुलमी व्यवस्थेला, ती स्त्री म्हणते की,
तुम्हाला आई असणार
आणखी बायकोसुद्धा
त्यांना हिच्या अंगावरच्या
जखमा मोजायला लावीन
या सगळ्याचा जाब मी
ठाण्यातच विचारणार हाय!
नाधो आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या कुटुंबात, बलात्कार झालेल्या दुर्देवी स्त्रीच्या दुःखाबाबत कवितेतून व्यक्त होतात. त्याचवेळी त्या दुःखावर, त्या अन्यायावर घाला घालण्यासाठी स्त्रीशक्तीचीही ताकद मांडतात. बाईपणापेक्षा आईपण आणि त्या आईपणाच्या मातृत्व आणि सर्जनशील शक्तीवर नाधोंचा प्रचंड विश्वास होता, हे नक्कीच. आईबद्दलची त्यांची कविता हे सारे नकळत सांगून जाते.
शेतीभातीत रमणार्या नाधोंच्या साहित्यविश्वात गावगाडा, समाजरचनेचे अभिन्न भाग असलेल्या अलुतेदार आणि बलुतेदारांचे अस्तित्वही सहजपणे जाणवते. ‘गांधारी’ कांदबरी असू दे की, इतर कथा असू देत, त्यात गावातल्या समाजाचे जीवंत चित्रण रेखाटले आहे. जातीव्यवस्थेच्या चक्रात फिरणारी समाजव्यवस्था त्यांनीही मांडली आहे. त्यात न्याय-अन्याय आणि विषमता याबाबतही सूचकपणे भाष्य केले. मात्र, ते भाष्य ‘याला जाळा आणि त्याला मारा,’ असे म्हणत समाजविध्वसंक नाही. त्यांच्या साहित्यातील आणि कवितेतली समाजपुरूष संयत आहे. त्याला आपल्यावरच्या अन्यायाची जाणीव आहे. मात्र, ती जाणीव विखारी नाही. उदाहरणार्थ, इंग्रज आणि त्यापूर्वीही मुस्लिमांच्या आक्रमणापूर्वीपासून शूरवीर लढवय्या समाजाच्या वीरतेला आणि धर्माभिमानाला, निष्ठेला घाबरून इंग्रजांनी या समाजाचा ‘गुन्हेगारी जमात’ म्हणून शिक्का मारण्याचे पाप केले. देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले, संविधानाने समाजाला पुन्हा सगळे हक्क प्रदान केले. मात्र, आजही गाव खेड्यात भटकेविमुक्त समाजाची परिस्थिती बदलली आहे का? गावशीव नसलेल्या समाजाला गावोगाव भटकंती करावी लागते. गावात कोण अनोळखी आले म्हणत, गावाला नाहक त्यांच्यावर संशय येतो, त्यातून पुढचे सगळे दुष्टचक्र सुरू होते. भटके-विमुक्त समाजाचे नेमके दुःख नाधो मांडतात की,
आमचं भटक्याच जिणं
हे वणवण भटकणं
थांबावलच नाही कोणी
पुष्कळ आधार घेऊन पहिला सर्वत्र
चोर समजून आम्हा
जवळ घेत नाही कोणी
आम्ही अडाणी माणसं
आपलं म्हणून आमच्यावर
विश्वासच ठेवत नाही कोणी...
असो. नाधोंच्या जीवनाचा मागोवा घेतला, तर जाणवते की, ते केवळ शब्दातच रमले नाहीत, तर तेच शब्द कृतीत जगण्याचाही त्यांना छंद होता. निसर्गाची ओढ होती. ती ओढ केवळ शब्दात न राहता जीवनात जीवंत राहावी, म्हणून वयाच्या १८व्या वर्षांपासूनच, त्यांनी शेती करायला सुरुवात केली.
शेती हेच त्यांचे पहिले प्रेम, असे ते म्हणायचे. बळीराजाने निसर्गचक्रासोबतच नवनवे प्रयोग करायला हवेत, असे त्यांना वाटायचे. हे वाटणे त्यांनी सत्यात उतरवले आणि सुमारे ४० वर्षांपूर्वी त्यांनी पळसखेड्याला २६ सिमेंट बंधारे, २६ दगडी बंधारे, तीन तलाव बांधून घेतले. इतकेच काय तर १९८४ मध्ये शासनाने केलेली ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही घोषणा पहिल्यांदा शब्दरुपात उभी केली, ती ना. धों. महानोरांनीच. ‘शेती आत्मनाश‘ व ‘नवसंजीवन’ ही त्यांची पुस्तके, तर शेतकर्यांना आर्थिक नियोजनासाठीची दिशादर्शक पुस्तकेच! ‘शेतीसाठी पाणी’, ‘जलसंधारण’, ‘फलोत्पादन’, ‘ठिबक सिंचन’ही शेतीविषयक पुस्तके त्यांनी लिहिली. ही सगळी पुस्तके केवळ शब्दांची जंत्री नव्हती, तर त्या सगळ्यातला अनुभव आणि प्रत्यक्ष शेतीमय जगण्याची जोड होती. शेतकर्यांचे मार्गदर्शक असणार्या ना. धों. महानोरांना त्यामुळेच की काय, महाराष्ट्र शासनाचा ‘कृषिभूषण पुरस्कार’ तसेच पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘वनश्री पुरस्कार‘ आणि शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीद्दल कृषिरत्न सुवणपदकही प्राप्त झाले. पुढे त्यांना शेतीविषयक कार्याबद्दल ‘डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले.
तसेच, आमदार म्हणून जबाबदारी घेतल्यावरही ना. धों. महानोरांनी समाजजीवनाचे प्रश्न सातत्याने मांडले. शेतकरी आणि सामान्य माणूस कसा जगेल, कसा उभा राहील, यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले; नाही नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर त्यावरच्या उपाययोजनाही सांगितल्या. त्यातूनच ते म्हणाले होते की, ”शेतकर्यांची कर्जमाफी होते. पण, शेतकर्याला कर्जमाफीपेक्षा उभे राहण्याचं बळ हवे. ठिबकचे अनुदान वेळेत हवे. शेतात छोटा बोअर करण्यासाठी हेक्टरनुसार आर्थिक मदत द्या. स्वाभिमानी शेतकर्याला संपूर्ण कर्जमाफी नकोच आहे, तर त्याला केवळ व्याज माफ करा. कर्ज तो टप्प्याटप्प्यांत फेडेल. त्यासाठी वसुली त्रैवार्षिक करा. फळबागांसाठी अनुदान द्या. त्यामुळे शेतकर्याचा आत्मसन्मान कायम राहील आणि तो उभाही राहील.” याच परिक्षेपात नाधोंच्या समाजशीलतेसोबतच त्यांच्या आशादायी मानवातावादावरची श्रद्धाही मनाला भिडते. निसर्गाला साकडं घालताना, ते कवितेत म्हणतात की,
भरभरून पावसातून
उभा राहू दे हा देश
ही माणसं, चिडीपाखरं
घरट्यातून जगू दे सुखा समाधानान
अंधारातून पुन्हा प्रकाशाकडे जाण्याचा
तुझा चिरंतन आशीर्वाद दे
कोट्यवधी प्राणाच्या प्रार्थना दयाघना
भरभक्कम ये, घनगर्द ये
चांगल्या युगाचा आरंभ घेऊन
माणूस म्हणून उभं राहण्याचा
आशीर्वाद दे...
खरेच, ना. धों. महानोरांनी निसर्गाकडे, त्या परमशक्तीकडे माणसासाठी आणि पशुपक्ष्यांसाठीही मागितलेला हा आशीर्वाद अत्यंत मंगल आणि पवित्र आहे. माणसाला माणूस म्हणून उभे करण्यासाठी चांगल्या युगाचा आरंभ मागणारे नाधो म्हणूनच केवळ रानकवी नाही, तर समाजकवी आहेत!
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.