नवी दिल्ली : नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणा सरकारकडून कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून यासंदर्भात नवनवे खुलासे करण्यात येत आहेत. नुह येथील हिंसाचारात स्थानिक दंगलखोरांना चिथविण्याकरिता राजस्थानातील हल्लेखोरांनी पाठबळ दिल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून सरपंच संघटनेचे प्रमुख रफिक यांनी सांगितले आहे. दरम्यान, या हिंसाचारानंतर हिंदू समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता सरपंच संघटनेच्या प्रमुखांच्या व्हिडीओतून त्यांच्या गावातील लोक लुटालूट तसेच हिंदूंवर हल्ले करण्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.
तसेच, या व्हिडीओत उल्लेख केलेले सर्व हल्लेखोर हे २० ते २५ वर्ष वयोगटातले असून ते या घटनेनंतर फरार असल्याचे सरपंच प्रमुखांनी व्हिडीओत नमूद केले आहे. सरपंच प्रमुख रफीक म्हणाले, यात जवळपास ७ तरुण सहभागी असून त्यांच्या योग्य कारवाई व्हावी यासाठी त्यांना पकडून पोलीसांच्या स्वाधीन करणार असेही त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. एकंदरीत, नूहच्या सरपंच संघटनेच्या प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले की हिंसाचारात सहभागी असलेले लोक त्यांच्या गावातील आहेत.
दरम्यान, नूह हिंसाचारात कट्टरपंथी घटक अजूनही सहभागी असल्याचे उघड झाले आहे. तसेच, या हिंसाचारात ६ जण ठार झाले असून डझनभर जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी ९३ एफआयआर नोंदवून १७६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारामुळे हजारो लोक विस्थापित झाले असून हे सर्व हिंदू समाजाच्या मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यानंतर हे सर्व घडत आहे. यासंदर्भातील तपासात असे समोर आले आहे की, विशेषत: हल्लेखोर बाहेरून आले होते.