मुंबई : महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये दररोज असंख्य रुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक येतात. रुग्णालयातील विविध विभाग माहित नसल्यामुळे त्यांची तारांबळ होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सेवार्थ एक मदतकक्ष असावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुचवले होते.
यानुसार महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये 'रुग्णमित्र हेल्प डेस्क' ची सुरुवात करण्यात येणार आहे. या हेल्प डेस्कसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. प्रमुख रुग्णालयात सकाळी तीन, दुपारी दोन आणि रात्री एक; तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी दोन आणि दुपारी दोन याप्रमाणे कर्मचाऱ्यांची निवड होणार आहे.
रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना नम्रपणे मदत करण्यासाठी सॉफ्ट स्किलस् असलेले कर्मचारीच नियुक्त करण्यात येतील. या कर्मचाऱ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांचे तसेच संगणक हाताळण्याचे सुद्धा त्यांना संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. या हेल्प डेस्कमुळे रुग्णालयातील लोकांना निश्चितच योग्य सेवा मिळेल. त्याचप्रमाणे एक रोजगार संधीदेखील उपलब्ध झाली आहे.