संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणार्या ‘युपीआय’ प्रणालीचा वापर आता भारत-न्यूझीलंडदरम्यान केला जाणार आहे. उभय देशातील व्यापारी संबंध वृद्धिंगत होण्यास त्याची मदत होईल. अर्थतज्ज्ञ पी. चिदंबरम यांनी ही प्रणाली यशस्वी होणार नाही, असे भाकित केले होते. तथापि, ती केवळ भारतातच यशस्वी झाली, असे नव्हे तर जगभरातून तिला वाढती मागणी आहे. अनेक देशांना भारताशी या प्रणालीचा वापर करून व्यवहार करायचे आहेत, हेच ‘डिजिटल इंडिया’चे यश!
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान व्यवसाय, व्यापार तसेच पर्यटन सुलभ करण्यासाठी न्यूझीलंडमध्ये ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’ (युपीआय) सक्रिय करण्यात येत आहे. हे द्विपक्षीय व्यापार संबंध सुमारे २.२ अब्ज डॉलर किमतीचे आहेत. २०२१ मध्ये न्यूझीलंडने भारताला ४८७ दशलक्ष डॉलर किमतीच्या वस्तू आणि सेवांची निर्यात केली. न्यूझीलंडची निर्यात दरवर्षी ६.२४ टक्क्यांनी वाढली आहे. १९९५ मध्ये ती १०१ दशलक्ष डॉलर इतक्या मूल्याची होती. २०२१ मध्ये भारताने ६४८ दशलक्ष किमतीची निर्यात केली. भारत करीत असलेली निर्यात ही दरवर्षी ८.२८ टक्के दराने वाढली आहे. १९९५ मध्ये ती ८२ दशलक्ष डॉलर इतकी होती. उभय देशांतील वाढत असलेला व्यापार आता ‘युपीआय’ प्रणालीमुळे स्थानिक चलनात होण्यास मदत होणार आहे. व्यापार आणि पर्यटनाला यामुळे चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय)द्वारे विकसित केलेली ‘युपीआय’ ही रिअल-टाईम पेमेंट प्रणाली आहे, जी वापरकर्त्यांना मोबाईलचा वापर करून बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देते.
भूतान, नेपाळ, सिंगापूर, ओमान, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्ड्स, लक्झेंमबर्ग, स्वित्झर्लंड, श्रीलंका आणि संयुक्त अरब आमिरातीसह अनेक देशांनी तिचा स्वीकार केला. काँग्रेसी नेते पी. चिदंबरम यांनी जेव्हा ही प्रणाली सादर केली गेली, तेव्हा त्यावर टीका केली होती. भारतात ती यशस्वी होईल, असे आपणास वाटत नाही. भारतीयांसाठी ती वापरणे, हे खूप अवघड आहे, अशा शब्दांत त्यांनी योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे तंत्रज्ञान भारतीयांसाठी सर्वस्वी अपरिचित असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तथापि, या अर्थतज्ज्ञाचे म्हणणे भारतीयांनी खोडून काढले. ‘युपीआय’ला भापरतात प्रचंड यश मिळाले. आज ही देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट प्रणाली बनली आहे. दरवर्षी यामार्फत होणार्या व्यवहारांच्या संख्येत विक्रमी वाढ होते आहे. २०१६ मध्ये ती व्यवहारात आणल्यापासून तब्बल १०० ट्रिलियन किमतीचे १०० अब्ज व्यवहार नोंद झाले आहेत. भारतातील २०० दशलक्षहून अधिक सक्रिय वापरकर्ते तसेच १०० दशलक्ष व्यापारी याचा वापर करत आहेत. थेट व्यवहारांसाठीची ती सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. या प्रणालीला मिळालेले यशच न्यूझीलंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
जगभरातील ‘डिजिटल पेमेंट’च्या वाढीमध्ये ‘युपीआय’ची मोठी भूमिका अपेक्षित आहे. यातील सर्व व्यवहार ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’द्वारे नियंत्रित केले जातात. तसेच, मोबाईलचा वापर करून दोन बँक खात्यांमधील निधी त्वरित हस्तांतरित केले जातात, हेच या प्रणालीच्या यशाचे गमक. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५९.३ ट्रिलियन किमतीचे विक्रमी ६.४ अब्ज व्यवहार केले गेले. म्हणजेच देशातील ७५ टक्के व्यवहार ‘युपीआय’चाच वापर करून केले गेले.ही प्रणाली का यशस्वी ठरली, याची प्रमुख कारणे म्हणजे पेमेंट करण्याचा हा अतिशय सोयीचा मार्ग आहे. वापरकर्ते फक्त मोबाईल क्रमाकांचा वापर करून अथवा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस आणि पाठवू इच्छित रक्कम प्रविष्ट करून व्यवहार पूर्ण करू शकतात. निधी हस्तांतरण त्वरित होते, हे महत्त्वाचे. तसेच, हा अतिशय सुरक्षित मार्ग मानला जातो. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ची सुरक्षा वैशिष्ट्याद्वारे ती संरक्षित आहे. म्हणूनच वापरकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत झाली. या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. व्यापारी वर्गासाठी अतिशय कमी शुल्क आकारले जाते. म्हणूनच ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठी तो आकर्षक पर्याय बनला आहे.
रोख रकमेचा वापर कमी होण्यास त्याची मदत झाली असून, आर्थिक समावेशन सुधारण्यास मदत झाली आहे. व्यवहारांसाठी देयके गोळा करणे, हेही सोपे झाले आहे. आर्थिक क्रियाकलाप वाढवण्यासही त्याची मदत झाली आहे. ‘युपीआय’मार्फत व्यवहार करणे सोपे आणि स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे खर्च करण्यास प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळण्यास मदत झाली. आर्थिक व्यवस्थेची कार्यक्षमता सुधारण्यास मदत केली आहे. कागदावर आधारित व्यवहारांची गरज कमी करून वेळ तसेच पैसे वाचला आहे. आर्थिक व्यवस्था कार्यक्षम होण्याबरोबरच फसवणूक कमी होण्यास त्याची मदत झाली आहे. म्हणूनच इतर देशांचे लक्ष याकडे वेधले गेले. न्यूझीलंडच्या मध्यवर्ती बँकेने ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’सोबत ‘युपीआय’ आधारित पेमेंट प्रणाली कार्यान्वित केली गेली आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये ‘युपीआय’ प्रणाली कार्यान्वित होणे, ही डिजिटल पेमेंटची यशस्विता मानली जाते. नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी कार्यान्वित केली गेलेली, ही प्रणाली आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग बनली आहे.
‘डिजिटल पेमेंट’चे हे यश जगाच्या नकाशावर भारताचे स्थान अधोरेखित करणारे ठरले. मोबाईल आधारित ही प्रणाली वापरकर्त्याला केलेल्या व्यवहारांचा इतिहास तपासण्यापासून खात्यातील शिल्लक रक्कम किती आहे, हे क्षणात सांगते. तसेच, व्यवहार पूर्ण करताना वापरकर्त्याला आपल्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागत नाही. २४ तास ही प्रणाली वापरता येते. ‘एनपीसीआय’च्या माहितीनुसार, ‘युपीआय’ व्यवहारांचे प्रमाण डिसेंबर २०१६ मधील दोन दशलक्षवरून डिसेंबर २०२२ मध्ये ७.८ अब्ज इतके झाले आहे. याच कालावधीच व्यवहार मूल्य सात अब्ज रुपयांवरून १२.८ ट्रिलियनपर्यंत वाढले आहे.काँग्रेससह सर्व विरोधक ‘युपीआय’च्या विरोधात होते. तथापि, भारतीयांनी ही प्रणाली वापरली, ती यशस्वी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ला मोठे बळ देणारी ही प्रणाली संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. हेच या प्रणालीचे मोठे यश म्हणता येईल.