आजोबांना लागली शाळेची ओढ; ७८व्या वर्षी घेतला ९वीत प्रवेश! तीन किमी प्रवास
03-Aug-2023
Total Views | 43
मिझोराम : शिक्षण्याची जिद्द असेल तर माणूस कितीही त्रास सहन करायला तयार होतो. शिक्षणासाठी झटणारे अनेक लोक आपण बघितले आहेत. पण 78 वर्षांच्या वयात तब्बल 3 किलोमीटर पायी चालत शाळेत जाणाऱ्या आजोबांची गोष्ट नुकतीच पुढे आली आहे. मिझोराममधील एक 78 वर्षांचा व्यक्ती स्थानिक शाळेत नववीच्या वर्गात शिकण्यासाठी दररोज 3 किमी चालतो. 1945 मध्ये मिझोराम-म्यानमार सीमेवरील चंफई जिल्ह्यातील खुआंगलेंग गावात जन्मलेले लालरिंगथारा असे या व्यक्तीचे नाव आहे.
लहान वयातच लालरिंगथारा यांनी आपले वडील गमावल्याने उपजीविकेसाठी त्यांना त्यांच्या आईला शेतात मदत करणे भाग पाडले. गरीबी आणि हलाखीचे जीवन जगत असताना त्यांच्या शिक्षणात अनेक अडचणी आल्या. परंतू, धीर न सोडता त्यांनी सर्व परिस्थिती योग्य झाल्यावर शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
"वय माझ्या ज्ञानाच्या शोधात अडथळा आणणार नाही," असे ते ठामपणे सांगतात. ते दररोज कच्च्या रस्त्यावरून शाळेला जातात. खुआंगलेंग येथे लालरिंगथारा यांचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. तिथे त्यांनी इयत्ता दुसरीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर 1995 मध्ये त्यांची आई न्यू ह्रुआकॉन गावात स्थलांतरित झाली आणि त्यांच्या शिक्षणात ब्रेक आला. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांना पाचवीत प्रवेश मिळाला.
मात्र, लालरिंगथारा यांची सतत शिकण्याची ओढ कायम होती. त्यानंतर शिक्षणाला कमी महत्त्व देणार्या दूरच्या नातेवाईकांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले. तिथे त्यांनी उदरनिर्वाहासाठी भातशेतीत कष्ट केले. एवढे अडथळे आल्यानंतरही त्यांनी मिझो भाषेत शिक्षण पूर्ण केले आणि सध्या ते चर्च चौकीदार म्हणून काम करत आहेत.
इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतरन लालरिंगथारा यांनी या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिलमध्ये ह्रुआकॉन येथील स्थानिक राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला आश्चर्यचकित झालेल्या शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नवव्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. शिवाय, त्यांनी लालरिंगथारा यांना पुस्तके आणि गणवेशही दिला.
लालरिंगथारा यांच्या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याच्या तळमळीने त्यांना त्यांच्या वाढत्या वयातही शाळेत परत येण्यास प्रवृत्त केले. फक्त इंग्रजीमध्ये अर्ज लिहीणे आणि दूरदर्शनवरील बातम्यांचे प्रसारण समजून घेणे एवढीच त्यांची इच्छा आहे. त्यांचे कष्ट आणि समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे अधिकारी सांगतात.