जयपूर : राजस्थानमधील भिलवाडा येथे एका १४ वर्षीय मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात सामुहिक बलात्कारानंतर खून झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी घडली.
हे प्रकरण भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री पोलिस स्टेशन हद्दीतील नरसिंहपुरा गावाशी संबंधित आहे. मृत पीडित मुलगी दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी तिच्या आईसोबत शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन गेली होती. त्यानंतर दुपारी आई शेळी घेऊन घरी परतली. मात्र मुलगी घरी पोहोचली नाही. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. गावातील शेतापासून ते आजूबाजूच्या नातेवाईकांच्या घरापर्यंत शोध घेऊनही मुलीचा काहीही पत्ता लागला नाही.
दरम्यान एका माध्यम संस्थेने मृत अल्पवयीन मुलीच्या भावाचा हवाला देऊन सांगितले की, “रात्री १० वाजण्याच्या सुमारास गावाबाहेर काळबेलीच्या छावणीजवळ कोळशाची भट्टी जळताना दिसली. पावसाळ्याच्या दिवसात भट्टी पेटवली जात नाही. त्यामुळे लोकांना संशय आला. भट्टीजवळ गेल्यावर मुलीच्या चप्पला दिसल्या. यासोबतच मुलीच्या हातात घातलेले चांदीचे ब्रेसलेट आणि हाडाचे तुकडे भट्टीत सापडले. यानंतर ग्रामस्थांनी कालबेलीस पकडून चौकशी केली. त्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार करून भट्टीत मुलीला जाळल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच ४ पोलीसांसह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रात्रीच फॉरेन्सिक टीमला बोलावून तपास करण्यात आला.
या घटनेबाबत राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.पी जोशी यांनी ट्विट केले आहे की, “शाहपुरा, भिलवाडा येथे एक हद्य पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला कोळशाच्या भट्टीत जाळले. प्रशासनाचे अपयश पहा, पोलिसांचे सहकार्य नाही. कुटुंबीयांनी स्वतः तपासणी केली असता मृत मुलगी सापडली.
आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांवर इतर राज्यांना कोसणाऱ्या काँग्रेस सरकारला लाज वाटयला हवी. तसेच कॉग्रेस सरकारचे राज्याच्या गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण नाही. विरोधकांच्या वारंवार इशाऱ्यांनंतरही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पर्वा नाही, ते त्यांच्या घोषणाबाजी करण्यात व्यस्त आहेत.