भारतीय भिक्खू संघ आणि ‘देव देश प्रतिष्ठान’च्या संयुक्त माध्यमातून रविवार, दि. २७ ऑगस्ट रोजी भारतीय भिक्खू निवास, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे ‘मन की बात’ आणि बौद्ध धम्मगुरूंकरिता मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबीर आयोजित करण्या आले होते. या सेवाभावी उपक्रमाचा अनुभव या लेखात व्यक्त केला आहे.
१९६६ पासून रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व बौद्ध धम्मगुरुंचे श्रामणेर-भिक्खू प्रशिक्षण केंद्र, विपश्यना केंद्र, तसेच बौद्ध भिक्खूंचे वास्तव्य आहे. तथागतांच्या मार्गावर चालणार्या आणि मनावर तसेच इंद्रियांवर विजय मिळवलेल्या बौद्ध भिक्षु आणि धम्मगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचा समारोह हा मणिकांचन योग होता. ‘मन की बात’ मध्ये ‘मिशन चांद्रयान- ३’, ‘जी २० समिट’ , खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन, शिलालेखशास्त्र (Epigraphy) आणि गुफाशास्त्र (Speleology) या सर्व बाबींचा मोदी उल्लेख करत असताना धम्मगुरुंच्या मनातून नक्कीच साधुवाद आसमंतात गुंजत होता. भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष ‘मन की बात’ वरील अभिप्राय व्यक्त करताना सांगतात की, ”प्राचीन शिलालेख आणि गुफाशास्त्राची सखोल अभ्यास केल्यास दिसून येईल की बौद्ध धम्माची पाळेमुळे ही ना केवळ भारतात तर अखंड जंबुद्वीपात दिसून येतील.
मोदींना त्यांनी विनंतीवजा निवेदन केले होते की, ‘मन की बात’ मधून उल्लेखित या विषयाला त्यांनी जरूर चालना द्यावी.” बौद्ध धम्मात वर्षावासाला खूप महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वर्षावास सुरू होतो आणि तो अश्विनी पौर्णिमेला संपतो. वर्षावासात बौद्ध भिक्खूंना उपासकांद्वारे अष्टपरिष्कर दान केले जाते. अष्टपरिष्कर दानामध्ये चीवर, अन्य दररोज उपयोगी वस्तू भोजन, आर्थिक दान करत असतो. ‘देव देश प्रतिष्ठान’ अनेक वर्षांपासून बौद्ध धम्मगुरूंच्या आरोग्याचे दायित्व सांभाळत आहे आणि या अष्टपरिष्कर दानाच्या धर्तीवर, वर्षावासाच्या पावन काळामध्ये १०० हून अधिक बौद्ध धम्मगुरूंचे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर पार पडले. तद्नंतर भोजनदान आणि संघ दान केले गेले.
तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपलाअष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला ६१ अर्हत भिक्षूंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ धम्माची अशी सिंहगर्जना केली. त्याच मार्गावर हा ‘मन की बात’ आणि अष्टपरिष्कर दानाचा मंगलमय आणि धम्ममय सोहळासुद्धा ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ अशी मंगल मैत्री भावनेचा, सामाजिक बांधिलकी सुगंध दश दिशांमध्ये पसरवत होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंगलप्रभात लोढा पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा, ईशान्य मुंबईचे खा. मनोज कोटक आणि घाटकोपर पूर्वचे आ. पराग शहा उपस्थित होते. या कार्यक्रमात बौद्ध धम्मगुरू आणि उपासक - उपासिका यांची तपासणी डॉ. दीपक हडवळे (नेत्ररोगतज्ज्ञ) यांच्याद्वारे करण्यात आली. या कार्यक्रमाचे सफल आयोजन डॉ. वैभव र. देवगिरकर (अध्यक्ष- देव देश प्रतिष्ठान), डॉ. रवींद्र कांबळे आणि भिक्खू विरत्न महाथेरो कार्याध्यक्ष- भारतीय भिक्खू संघ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने केले.
डॉ. वैभव र. देवगिरकर
९८६९६९७९५८