नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर आणि राज्याच्या पुनर्रचनेनंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशातील कारगिलमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या या निवडणुकीत कारगिल हिल कौन्सिलच्या २६ जागांसाठी १० सप्टेंबरला मतदान होणार आहे.
हिल कौन्सिलच्या २६ जागांसाठी ८८ उमेदवार रिंगणार आहेत. भाजप, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये तिरंगी लढत होत आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्याचवेळी दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही चार जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. कारगिलच्या ३० सदस्यीय परिषदेच्या २६ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक २१ तर भाजपने १७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. उर्वरित चार जागांसाठी सदस्य नामनिर्देशनातून निवडले जातात. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरीदेखील जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हिल कौन्सिलची सत्ता राखण्यासाठी १६ जागांवर विजय मिळविणे आवश्यक आहे. यापूर्वी २०१८ साली झालेल्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स १० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसने आठ, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) दोन आणि भाजपने एक जागा जिंकली होती तर पाच जागांवर अपक्ष उमेदवारांना यश आले होते. कारगिल हिल कौन्सिलच्या या निवडणुका अनेक अर्थांनी महत्त्वाच्या आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर आणि लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.
कारगिल को किसने लुटा – भाजप खासदाराचा सवाल
कारगिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचे भाजप खासदार जम्यांग सेरिंग नामग्याल यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीवर टिका केली आहे. ते म्हणाले, कारगिल निवडणुकीत त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. हे लोक विकासावर बोलू शकत नाहीत, त्यामुळे ते लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत कारगिलच्या लोकांनी या दोन पक्षांना संधी दिली आहे. त्यामुळे आता कारगिलची लूट कोणी केली, या प्रश्नाचे उत्तर जनता मागणार असल्याचेही नामग्याल यांनी म्हटले आहे.