तैलश्रीमंती नको, हवी हरितश्रीमंती

    28-Aug-2023   
Total Views |
Ecuadorians Vote to Stop Oil Drilling in the Amazon Rainforest

दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशाने सार्वमताने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील संरक्षित क्षेत्रामध्ये भविष्यातील सर्व खनिज तेलासाठीचे ‘ड्रिलिंग’ थांबवण्याचा निर्णय नुकताच घेतला. इक्वेडोरच्या पूर्वेकडील अ‍ॅमेझॉनमधील यासुनी नॅशनल पार्कमधील ठरावीक जागेवर कच्च्या तेलाचे उत्खनन करावे का करू नये, हे ठरवण्यासाठी लाखो लोकांची देशव्यापी जनमत चाचणीत घेण्यात आली.

गेल्या आठवड्यात मोजणी पूर्ण झाली आणि या सार्वमताला जवळपास ७० टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला. देशभरातील ५२ लाखांहून अधिक नागरिकांनी या प्रक्रियेत मतदान केले आणि इशपिंगो-तांबोकोचा-टिपुटिनी (आयटीटी) ऑईल ब्लॉक बंद करण्याचा निर्णय झाला. आता अधिकार्‍यांना ‘आयटीटी’मधून माघार घेण्यासाठी एक वर्षाचा कालावधी आहे. जर त्यांनी वेळेत पाऊले उचलली नाहीत, तर संबंधित अधिकारी बडतर्फदेखील होऊ शकतात.

यावेळी क्विटो बाहेरील ‘चोको एंडिनो डी पिचिंचा’ नावाच्या ‘बायोस्फीअर रिझर्व्ह’ येथे तांबे, सोने आणि चांदीच्या उत्खननाचे काम थांबवण्याबाबतदेखील सार्वमत घेण्यात आले. देशाच्या ‘नॅशनल इलेक्टोरल कौन्सिल’ने याविषयी सार्वमत घेण्याची घोषणा २०२२ मध्ये केली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनात्मक न्यायालयात गेले. त्यानंतर यावर सार्वमत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील काही स्थानिक आणि पर्यावरणवाद्यांचा विरोध असूनही २०१६ पासून इथे उत्खनन सुरू होते. या परिसरात सध्या १२ ऑईल प्लॅटफॉर्म आणि २३० विहिरी आहेत. इथे दररोज सुमारे ५७ हजार बॅरल तेलाचे उत्पादन करण्याची क्षमता आहे.

देशाच्या आर्थिक वाढीसाठी या क्षेत्रातील तेल उत्खनन आणि उत्पादन महत्त्वाचे आहे. वर्षानुवर्षे इक्वेडोर दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक खनिज तेल उत्पादकांपैकी एक आहे. देशाच्या एकूण निर्यातींपैकी जवळपास ३० टक्के वाटा कच्च्या तेलाच्या उत्पादनाचा आहे. गेल्या वर्षी सुमारे देशात आठ अब्ज बॅरल उत्पादन झाले होते. तेल उत्खनन बंद असल्यामुळे होणार्‍या नुकसानाची भरपाई आंतरराष्ट्रीय समुदायाने द्यावी. या अटीवर २००७ मध्ये ‘आयटीटी यासुनी’ या नावाने एक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु, २०१३ पर्यंत कोणतीही भरपाई न मिळाल्याने आणि स्थानिक पेट्रोकेम कंपन्यांच्या सरकारवरील दबावामुळे या भागात तेल उत्खनन सुरू करण्यात आले होते. २०१८ साली तेल उत्खननासाठी समर्पित केलेले एकूण क्षेत्र १ हजार, ३० हेक्टरवरून ३०० हेक्टर इतके कमी करण्यात आले होते.

उत्खनन होणार्‍या परिसरातील तेल गळती आणि तेलाच्या वाहतुकीसाठी रस्त्याच्या बांधकामामुळे येथील स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामध्ये तगेरी, तारोमेनने आणि दुकागेरी समुदाय तसेच वाओरानी, किचवास आणि शुआरसारख्या इतर स्थानिक समुदायांना धोका निर्माण झाला होता. यासुनी नॅशनल पार्क हे ९ लाख, ८२ हजार हेक्टरचे संरक्षित क्षेत्र आहे. या भागात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये १ हजार,१३० प्रजातींची झाडे, वटवाघुळांच्या ८१ प्रजाती तर पक्ष्यांच्या ५९३ प्रजाती आहेत. त्यांना बोलता येत नसले, तरी या परिसंस्थेत राहणारे विविध जीव या निर्णयामुळे खुश झाले असतील, असे स्थानिकांचे म्हणणे. परंतु, या प्रदेशातील सर्व स्थानिकांचेही एकमत नाही. यासुनीमध्ये किंवा जवळ राहणार्‍या अनेक स्थानिक समुदायांनी तेल उद्योगाला पाठिंबा दर्शविला आहे.

राष्ट्रीय उद्यान आणि आसपास राहणार्‍या १६ आदिवासी समुदायांनी सार्वमताच्या विरोधात मतदान केले आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, तेल उद्योगाने या क्षेत्राचा विकास केला आहे आणि त्यांना स्थिर उपजीविका प्रदान केली आहे. या निकालाचा देशावर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक आर्थिक परिणाम होईल, असे तेल कंपनी ‘पेट्रोइक्वाडोर’ने म्हटले आहे. सुमारे १.२ अब्ज डॉलर उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल. तसेच, सरकरी अनुदानावरदेखील याचा परिणाम दिसून येईल.

पुढील २० वर्षांमध्ये सुमारे १४ अब्ज डॉलर नुकसान होणे अपेक्षित आहे. तसे पाहायला गेले, तर यासुनी नॅशनल पार्क हे अनेक दशकांपासून पर्यावरणीय आणि मानवाधिकार वादाच्या केंद्रस्थानी आहे आणि आता तेथील लोक विकास आणि पर्यावरण यामध्ये योग्य संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. उर्वरित जगासमोर उदाहरण ठेवण्यासाठी सरकार आणि स्थानिक समुदाय एकत्र येऊन काम करणार असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.