जी-२० च्या माध्यमातून जगाला भारताचे सामर्थ्य कळेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी
27-Aug-2023
Total Views | 24
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बातच्या १०४ व्या भागात देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी जी-२० शिखर परिषदेच्या यजमानपदाचाही उल्लेख केला. मन की बात कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, भारत जी-२० शिखर परिषदेचे यजमानपदासाठी पूर्णपणे तयार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सप्टेंबर महिना भारताच्या क्षमतेचा साक्षीदार असणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जी-२० लीडर्स समिटसाठी भारत पूर्णपणे तयार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ४० देशांचे प्रमुख आणि अनेक जागतिक संस्था राजधानी दिल्लीत येत आहेत. जी-२० शिखर परिषदेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल.
भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भारताने जी-२० ला अधिक समावेशक व्यासपीठ बनवले आहे. भारताच्या निमंत्रणावरूनच आफ्रिकन संघ जी-२० मध्ये सामील झाला आणि आफ्रिकेतील लोकांचा आवाज जगाच्या या महत्त्वाच्या व्यासपीठावर पोहोचला.
पंतप्रधानांनी मन की बात दरम्यान सांगितले की, गेल्या वर्षी बाली येथे भारताने जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हापासून खूप काही घडले आहे. दिल्लीतील मोठ्या कार्यक्रमांच्या परंपरेपासून दूर जात आम्ही ते देशातील विविध शहरांमध्ये नेले. देशातील ६० शहरांमध्ये यासंबंधी सुमारे २०० बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. जी-२० चे प्रतिनिधी जेथे गेले तेथे लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.