आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात दहशतवादी संघटनांनीही दहशतवादाच्या विषपेरणीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात केलेले दिसते. सोशल मीडियाचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर हा त्यापैकीच एक चिंताजनक प्रकार. अलीकडच्या दहशतवादविरोधी कारवायांतून यासंबंधीचे ठोस पुरावे समोेर आले आहेत. त्यानिमित्ताने कशाप्रकारे दहशतवादी कृत्यांसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो आणि नेटकर्यांनी यासंदर्भात काय खबरदारी घ्यायला हवी, त्याचा आढावा घेणारा हा लेख...
नुकतेच ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने अटक केलेला दहशतवादी कासिफ खान याने भोपाळमध्ये बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचे मान्य केले आहे. ‘इसिस’चे जबलपूर मोड्यूल मे महिन्यात ‘एनआयए’ने उद्ध्वस्त केले होते. मोहम्मद आदील खान, सय्यद ममूर अली आणि मोहम्मद शाहीद यांना जबलपूरमधून अटक केली गेली होती. त्यानंतर कासिफ खान याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. भोपाळचे राणी कमलापती रेल्वे स्थानक आणि इतर गर्दीची ठिकाणे उडवून देण्याचा त्याचा कट होता. भोपाळजवळच्या देलाबारी जंगलात घातक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण त्याने दिल्याचे मान्य केले आहे. त्यासाठी ‘इसिस’चे मोठे नेटवर्क तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यासाठी त्याने सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर केल्याची कबुली दिली आहे.
दहशतवादी संघटना सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करतात. सामान्य नागरिकांवर प्रभाव टाकून त्यांना आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी वापरून घेतले जाते. काही वेळा तर दहशतवादी विशेषतः आत्मघातकी दहशतवादी व्यक्तीला हिंसा करणे वाईट आहे, हे पटतच नसते. कारण, त्याचे ब्रेनवॉश केलेले असते. सोशल मीडिया म्हणजे दहशतवादी संघटनांसाठी सदस्य मिळवण्याची संधी असते. ते गळ लावून बसलेले असतात. कोणता मासा गळाला लागतो, याचीच ते वाट पाहत असतात.
सोशल मीडियाचा वापर दहशतवाद्यांकडून का केला जातो?
सोशल मीडियाचा गैरवापर दहशतवादी संघटना त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करतात. कारण-
१) सोशल मीडिया आज सर्व वर्गांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, सर्व देशांमध्ये वापरला जातो. त्याचा प्रभाव घराघरात पोहोचतो.
२) सोशल मीडिया हे तुलनेने स्वस्त माध्यम आहे.
३) सोशल मीडिया वापरायला सुलभ आहे.
४) मोठ्या लोकांपर्यंत त्वरित संदेशवहनाची क्षमता सोशल मीडियामध्ये आहे.
५) आभासी एकत्रीकरण, त्यावर विविध गटबांधणी आणि दबाव गट निर्मिती सोशल मीडियामुळे सहज शक्य होते.
सामान्य माणसांना आपल्या संघटनेत भरती करून घेण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर अनेक दहशतवादी संघटना करतात.
सोशल मीडियाचा गैरवापर
‘अल कायदा’नेसुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा गैरवापर करून आपली सदस्य संख्या, समर्थक वाढवले होते. ‘अल कायदा’ने तर लहान मुलांना भरती करण्यासाठी तसेच त्यांच्यात आपली जहाल विचारसरणी पेरण्यासाठी ‘स्पेशल मीडिया प्लॅन’ तयार केलेला होता. लहान मुलांपासून किशोरावस्थेतील मुलांपर्यंत जिहादी साहित्य तसेच गेम्स, कार्टून, गाणी इत्यादी इंटरनेटवर उपलब्ध केले जाते.
दहशतवादी मुलांना ‘कब ऑफ खलिफत’ यांसारखी संबोधने देऊन बाकीच्या मुलांनाही तसे बनण्यासाठी आग्रह केला जातो. ‘बर्ड ऑफ पॅरेडाईज’ नावाचे एक प्रोडक्शन हाऊस आहे. यातून जिहाद विषयक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. इस्लाममध्ये अशी मान्यता आहे की, जी मुले वयात येण्यापूर्वी स्वर्गवासी होतात, ती थेट स्वर्गात जातात. त्यांचे रुपांतर पक्ष्यात होते. ते अमरत्त्वाची गाणी गातात. या संस्थेच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, मुलांचे रुपांतर हे शत्रूच्या मारेकर्यांमध्ये होते. मुले या गोष्टींचे अनुकरण करतात. ‘बर्ड ऑफ पॅरेडाईज’चे साहित्य अरब राष्ट्रे, कॅनडा तसेच ग्रेट ब्रिटन तेथे उपलब्ध आहे. तसेच, युट्यूबवरही अनेक लहान मुलांचे दहशतवादी हल्ल्यांचे व्हिडिओ दहशतवादी संघटना अपलोड करतात आणि यामुळे त्यांना अल्लाकडून पारितोषिक मिळणार, असे संदेश दिले जातात.
सध्या ‘इसिस’ ही सगळ्यात भयंकर दहशतवादी संघटना असून, अनेक ओलिसांच्या शिरच्छेद करतानाचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले होते. ‘इसिस’ने अमेरिकेचा आर्मी रेंजर पीटर कासीज, जेम्स फोलेय (अमेरिका), डेव्हिड हैनेस (ब्रिटन), एलन हेनिंग (ब्रिटन) आणि स्टीव्हन सोटलोफ (अमेरिकन -इस्रायली) यांना वेगवेगळ्या वेळी ओलिस धरून त्यांना ठार करतानाचे व्हिडिओ अपलोड केले होते.
यातून-
१) दहशत निर्माण करणे, दहशतवादी विचारधारा पसरवणे.
२) आपल्या विरोधात जाणार्या व्यक्तींचे काय होते हे जगाला दाखवणे, परिणाम सिद्ध करणे.
३) आपल्याला जगातील कोणतीही सुरक्षा यंत्रणा अडवू शकत नाही, हे सप्रमाण सिद्ध करणे.
४) आपल्या संघटनेचा दरारा वाढवणे.
५) सामान्यांनी बिनविरोध पाठिंबा देणे, शरण येणे, यासाठी दबाव वाढवणे.
अशा गोष्टी साध्य करायच्या असतात. शिवाय, ‘इसिस’ने आपली प्रतिमा चांगली ठसवण्यासाठी काही सामाजिक कार्य करतानाचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत. ‘दाबीक’सारखे स्वतःचे मासिकसुद्धा चालवलेले आहे. ‘अमाक न्यूज एजन्सी’ हे ‘इसिस’चे अधिकृत ‘न्यूज आऊटलेट’ आहे.
१) तालिबानचे ट्विटर अकाऊंटसुद्धा आहे. काही नावे बदलत राहतात. आलेमाराह वेब हे एक होते. त्यावर आता बंदी घातलेली आहे. २) सोमालियाच्या ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेचे ‘एचएसएम प्रेस’ हे ट्विटर अकाऊंट आहे. त्याचे दहा हजारांहून अधिक फॉलोअरसुद्धा आहेत. ३) नायजेरियाच्या ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेचे युट्यूब चॅनल आणि ट्विटर दोन्ही आहे.
सोशल मीडियावरील चोरवाटा
वास्तविक, सोशल मीडियावर प्रत्येक देशाच्या सरकारचे नियंत्रण असते. तरी देखील दहशतवादी संघटना याचा गैरवापर कसा करू शकतात, असा एक स्वाभाविक प्रश्न पडतो. सोशल मीडीयावर कितीही नियंत्रण असले, तरी त्यातील चोरवाटा शोधल्या जातात. युट्यूबने आता हिंसक व्हिडिओसाठी तसा शेरा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. एखादा आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओ अपलोड केल्यावर, त्या अकाऊंटला बंद करण्याची कारवाई केली जाते. पण, तोपर्यंत या दहशतवादी संघटनेचे सदस्य अनेक खोटे (फेक) अकाऊंट्स उघडून तो मजकूर व्हायरल करु शकतात. दुसर्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ते मजकूर पाठवून दिलेले असतात. बंदीची कृती होण्याआधी त्या पोस्टचा ‘रीच’ हजारोपर्यंत गेलेला असू शकतो.
अनेक दहशतवादी संघटनांचे सोशल मीडिया हे एकतर्फी नाहीत, तर ते संवाद साधणारे, चर्चात्मक, वैचारिक, खंडन-मंडन करणारे, प्रश्नोत्तरे स्वरुपात असणारे आहेत. त्यात आपण मांडलेल्या कल्पनांना प्रतिसाद मिळतो. शंकांचे समाधान केले जाते. काही वेळा ‘मजहब’चा वापर केला जातो. हिंसा करणे हे पाप नसून कर्तव्य आहे, हे ठसवले जाते. शिवाय कथा, कविता, नाट्य, कार्टून यांचा वापर करून आपली विचारधारा पोहोचवली जाते.
काही व्हिडिओ गेम्ससुद्धा आहेत. त्याद्वारेसुद्धा दहशतवादी संघटना आपले संदेश पोहोचवितात. ‘इसिस’च्या प्रचारार्थ/समर्थनार्थ असणार्या एका व्हिडिओ गेममध्ये खेळ खेळणारे जे असतात, त्यांना ‘दहशतवादी’ म्हटले जाते. यामध्ये त्यांना पाश्चात्य टार्गेट निवडून त्यावर हल्ले करायचे असतात. शिवाय विमान अपहरण टार्गेट आणि ‘कॉल ऑन ड्युटी’सारखी शीर्षके दिलेली असतात.
नागरिकांची सजगता महत्त्वाची
सोशल मीडिया पूर्णपणे सोडणे किंवा त्यावर बंदी घालणे शक्य नाही. भारतासारख्या लोकशाही देशात स्वातंत्र्य महत्त्वाचे आहेच. म्हणून नागरिकांनी जबाबदारपणे वागले पाहिजे, ही अपेक्षा आहे.
१) समूह त्यात करणार्या सोशल मीडियावर जपून राहाणे
२) टेलिग्रामवर चॅनल निवडताना जपणे.
३) स्थानिक भाषांचा वापर दहशतवादी करतात, त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर वाटल्यास सायबर सेलची मदत घेणे.
४) मुलांना सोशल मीडिया वापरू देण्याआधी त्याचे फायदे-तोटे नीट समजावून सांगणे.
५) आपली मुले, कुटुंबातील सदस्य कुणाला फॉलो करतात, त्यावर लक्ष ठेवणे.
६) खोट्या प्रोफाईल, नको त्या चॅटपासून लांब राहणे.
७) सोशल मीडियावर येणार्या कोणत्याही लिंकवर माहिती नसताना क्लिक करू नये.
८) मैत्री करणार्या व्यक्तीला पारखून घेणे.
९) ‘मजहब’ सांगणार्या सोशल मीडिया साईट्सपासून सांभाळून राहाणे.
१०) सोशल मीडियाच्या वापराविषयी स्वयंशिस्त जोपासणे. सोशल मीडिया किती वेळ, कोणत्या दिवशी, कशासाठी वापरायचा याविषयी स्वतः विचार करावा.
एकूणच ‘पीएफआय’वर भारतात बंदी आल्यानंतर ‘इसिस’चे जाळे मोठ्या प्रमाणात पसरते आहे. इसिस’चे अनेक मोड्यूल उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. पण, सगळ्यात धोकादायक आहे सामान्य जनतेचा दहशतवादी संघटनांनी केलेला गैरवापर. आपण कुणासाठी ‘वापरले’ जात आहोत का, याविषयी सजगता बाळगणे गरजेचे ठरते. दहशतवादाचा अभ्यास करताना दिसून येते की, जास्त संवेदनशील असणारे युवक सहजपणे दहशतवादी संघटनेच्या प्रचाराला बळी पडू शकतात. जे जीवन भरभरून जगायचे, तेच ‘मजहब’च्या नावाखाली उधळून लावतात.
रुपाली कुळकर्णी-भुसारी
(लेखिका एकता मासिकाच्या कार्यकारी संपादक आहेत.)