ग्रामकल्याणकारी सरपंच

    27-Aug-2023   
Total Views | 56
Article On Sarpanch Sonali Mestry

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन करून, त्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही व्हावा. या एकमेव उद्देशाने पूर्वानुभव नसताना राजकीय वर्तुळात पाय रोवून उभे राहण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणार्‍या सरपंच सोनाली मेस्त्री यांच्याविषयी...

कोकणात ज्यांचा जन्म झाला, ते पूर्वजन्मीचे पुण्यवानच म्हटले पाहिजेत. भल्याभल्यांना भुरळ घालणारा समुद्रकिनारा, सपाट मोकळे सडे, हे पुरे की विविध रंगी विविध गंधांची फुलं, रंगीबेरंगी सतत किलबिलाट करणारे पक्षी, केवढ्यातरी प्रकारची फुलपाखरं आणि रंगीतछंगीत कीटक तर पाहायलाच नकोत इतके! इतका समृद्ध आणि चित्रासारखा सुंदर प्रदेश असेल तर इथे जन्मलेल्या प्रत्येकाच्या स्वभावात नाना कळा नसतील, तरच नवल! ही निसर्गाची सर्जनशीलता इथल्या माणसांच्या मनात झिरपते आणि म्हणूनच कोकणातली माणसं हुशार. सोनाली मेस्त्री यांचा जन्म कोकणातलाच. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर इतरांसारखं पुण्या-मुंबईला न पळता गावातच राहण्याचा निर्णयही त्यांचाच.

कशेळी हे तसं ओळखीचं गाव. महाराष्ट्रातल्या काही मोजक्या सूर्यमंदिरांपैकी एक असलेलं पुरातन कनकादित्य सूर्यमंदिर इथे आहे. या मंदिरामागे एक आख्यायिका आहे. ८०० वर्षांपूर्वी उत्तरेकडे मुसलमानी आक्रमणे सुरु झाली, तेव्हा प्रभास पट्टण येथील एका सूर्यमंदिरातील पुजार्‍याला मूर्तिभंजकांकडून नुकसान होईल, अशी भीती वाटली. तेव्हा मंदिरातील १२ सूर्यमूर्तींपैकी काही मूर्ती दक्षिणेकडे जाणार्‍या व्यापार्‍याच्या जहाजात टाकल्या. समुद्रमार्गाने हे जहाज दक्षिणेकडे जात असताना कशेळीजवळ त्याने त्यातील एक मूर्ती देवघळी समुद्राजवळ निसर्गनिर्मित ४० फूट खोल गुहेत दडवली. त्यानंतर काही काळाने कंक किंवा कनका नामक भाविकाला स्वप्नात दृष्टांत देऊन देवाने मंदिर बांधण्याविषयी सूचवले. तेव्हा ही मूर्ती काढून कशेळीत आणून स्थापन केली.

परंतु, मूर्तीकडे पाहता तिची घडवणूक पूर्णपणे दाक्षिणात्य धाटणीची आहे. तेव्हा मूर्तीविषयी काही तर्क लावला जाऊ शकत नाही. या कशेळीत सोनाली यांचं बालपण गेलं. शालेय शिक्षणसुद्धा येथील जिल्हा परिषद शाळेतच झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मात्र त्या पुढे रत्नागिरीत होत्या. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून ‘प्राणिशास्त्र’ विषयात ‘मास्टर्स’ करून सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर आठ महिने उदयपूर, राजस्थान येथे राहून ‘नेट-सेट’ परीक्षेची तयारी केली. परीक्षेत सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन ‘जेआरएफ’ शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर ज्या महाविद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले, त्याच महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या.

हा सोनाली यांचा शैक्षणिक प्रवास. यात कशेळी ते रत्नागिरी असा जाऊन- येऊन कित्येक किलोमीटरचा रोजचा प्रवास, अभ्यास आणि अनेक इतर अडचणी होत्या. परंतु, त्यावर मात करीत त्यांनी काही संशोधनपर प्रबंध लिहिले. फुलपाखरांचा अभ्यास केला. या कालावधीत आपल्या गावाची जैवविविधता नोंदवही असावी, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. दरम्यान, गावातील परिस्थिती पाहता उत्तम शिक्षित सरपंच गावाला हवा, यासाठी काही ग्रामस्थांनीच सोनाली यांना विचारणा केली. ग्रामसंस्कृती टिकवायची तर राजकीय संस्कृतीची पुनःबांधणी करणे गरजेचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले व विचारांती त्यांनी निवडणुकीसाठी उभे राहायचे ठरवले. कोणताही पूर्वानुभव किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना एका स्त्रीने गावाच्या सरपंचपदी येऊन सत्ता प्रस्थापित करावी, हे न रुचणारे काही जण होतेच. परंतु, बहुतांश गाव सोनाली यांच्या पाठीशी कणखरपणे उभा ठाकला. आज सोनाली यांना पदभार स्वीकारून अडीच वर्षे झाली.

हा प्रवासही सोपा नव्हता. सोनाली यांनी पदत्याग करावा, यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गावाला त्यांच्याविरुद्ध बिथरवण्याचे प्रयत्नसुद्धा झाले. त्यापैकीच एक म्हणजे ‘बारसू प्रकल्प’ जेव्हा कोकणात जोर धरू लागला, तेव्हा आजूबाजूच्या गावातून ग्रामसंमतीचे ठराव मागवण्यात आले. यावेळी पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासक म्हणून वैयक्तिक तसेच सरपंच म्हणून गावाचा विचार करणारा निर्णय, त्यांना घ्यायचा होता. जेव्हा आपण एका मोठ्या समूहासाठी कार्य करतो, एका समूहाचे प्रतिनिधित्व करतो, तेव्हा त्या समूहसंख्येच्या मतांची तसेच त्यांच्या आयुष्यावर होणार्‍या परिणामांची जबाबदारी, त्या व्यक्तीला घ्यायची असते. अशावेळी सारासार विचार करून निर्णय घेणेच योग्य. तेव्हा तो निर्णय त्यांनी आपले अधिकार वापरून घेतला.

‘बारसू रिफायनरी प्रकल्पा’चा पर्यावरणावर होणारा परिणाम पाहता त्यांच्यातल्या अभ्यासकाचा प्रकल्पास संपूर्ण विरोध होता. मात्र, प्रकल्प जर सरकारी असेल आणि लोककल्याणकारी असेल, तर तो कोणत्याही परिस्थितीत होणारच, तेव्हा त्यानिमित्ताने उत्पन्न होणार्‍या रोजगाराच्या संधींना आपल्या गावकर्‍यांनी मुकू नये. केवळ शेती, बागायती आणि लघुउद्योगांवर चरितार्थ रेटणार्‍या गावकर्‍यांना आणि दररोज छोट्या नोकरीसाठीसुद्धा रत्नागिरीचा प्रवास करणार्‍यांना जवळच तयार होणार्‍या रोजगाराच्या संधीचा लाभ व्हावा, या विचाराने त्यांनी आपल्या सहमतीचे पत्र तयार करवून घेतले. परंतु, ते पाठवण्यापूर्वीच गावात ‘व्हायरल’ करून सरपंचांनी आपल्या गावाचा सौदा मांडला आहे, अशा अफवा पसरवल्या गेल्या.

हे असे काही किस्से वगळता संपूर्ण कशेळी गाव सरपंचांच्या पाठीशी ठाम उभा आहे. सोनाली यांनाही आपल्या गावाविषयी कौतुक आहे. मंदिराचे नूतनीकरण, किनार्‍याजवळ सूर्यास्त पॉईंट असे अनेक उपक्रम करून पर्यटनाला चालना देण्यासाठी, त्या प्रयत्नशील असतात. कदाचित पुढील काळात चिरेखाणी सुरू होऊ शकतील. तेव्हा काय यासाठीही त्या तयार आहेत. मुख्य म्हणजे गावाची राजकीय, पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक, संस्कृती माहिती त्यांना ज्ञात आहे. गावाच्या आणि गावकर्‍यांच्या जमेच्या बाजू तसेच गावासमोर पुढील काळात येणारी आव्हाने यांची त्यांना पुरेपूर कल्पना आहे. विद्यादानाचे महत्त्वाचे कार्य करीत, कशेळी ते रत्नागिरी हा रोजचा मोठा प्रवास करीत सुट्ट्या सांभाळून सरपंचपदाची जबाबदारी लीलया पेलणार्‍या कनकादित्याच्या आशीर्वादाने शक्तीचेच रूप असलेल्या सोनाली मेस्त्री यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ दुरुस्ती विधेयकानंतर काँग्रेससह

वक्फ दुरुस्ती विधेयकानंतर काँग्रेससह 'या' पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान

Waqf Amendment Bill आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली आहे. त्यानंतर आता कायद्याची निर्मीती होणार असून लवकरच कायदा सुरू होणार आहे. मात्र, आता या कायद्याला काहींनी विरोध दर्शवला आहे. काही विरोधकांनी निषेध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेत विधेयकाला आव्हान दिले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते फयाज अहमद आणि खासदार मनोज झा यांनी सर्वोच्च न्यायालयात वक्फ विधेयकाविरोधात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वक्फ विधेयकामुळे मलमत्तांच्या व्यवस्थापानांवर मोठा परिणाम होईल असे बोलले जात आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121