शालेय जीवनात पुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्षात मोठ्या पडद्यावर अनुभवण्याचे अहोभाग्य आजच्या पिढीला लाभले ते केवळ ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करणार्या दिग्दर्शक-निर्मात्यांमुळेच! शिवरायांचा सामर्थ्यशाली इतिहास जगासमोर चित्रपट स्वरुपात यावा आणि एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ भागांची ऐतिहासिक मालिकाच प्रेक्षकांसमोर मांडावी, असा विचार करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांची ‘शिवराज अष्टका’ची अशी ही अभूतपूर्व संकल्पना. आत्तापर्यंत शिवाष्टकातील चार चित्रपट प्रदर्शित झाले असून पाचवं पुष्प असलेला ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाची समीक्षा करणारा हा लेख...
मुघलांच्या राक्षसी राजवटीतून आपले राज्य मुक्त करावे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी, हे जिजाऊंचे स्वप्न शिवरायांनी साकार केले. आपल्या मातेची इच्छा पूर्ण करण्याचा विडा उचलून शूरवीर मावळ्यांच्या साथीने शिवबांनी स्वराज्य स्थापनेच्या मोहिमा फत्ते केल्या. एक-एक गड-किल्ले काबीज करताना, भौगोलिकदृष्ट्या आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात हवाच, या जिजाऊंच्या आदेशानुसार कोंढाणा काबीज करण्यासाठी शिवराय शिलेदारांसह सरसावले. हीच कोंढाण्याची संघर्षकथा, विजयगाथा ‘सुभेदार’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ असं सांगून जिजाऊंचा शब्द अजिबात खाली पडू न देणार्या, कोंढाण्याला जिजाऊंची पावले लागावी म्हणून हाताची ढाल करुन लढलेल्या सुभेदार तानाजी मालुसरेंची अशी ही सुपरिचित शौर्यगाथा. परंतु, तानाजींनी ती झुंज कशी लढवली असेल, किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्यांनी आखलेल्या योजना कशा पूर्णत्वास आणल्या असतील, या सर्व घटना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटात यशस्वीरित्या मांडल्या आहेत.
आत्तापर्यंत आपण अनेक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मुघलांच्या दरबारात काय घडते किंवा त्यांचा दरबार कसा असतो, हे पाहिले आहेच. पण, पहिल्यांदाच शिवराय आणि जिजाऊ रयतेची मदत, न्यायदान कसे करतात, हे चित्रपटाच्या पूर्वार्धात पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट मध्यांतरापूर्वी काहीसा संथही वाटू शकतो. कारण, कोंढाण्याच्या लढाईची सुरुवात कशी झाली, या ऐतिहासिक घटनेपर्यंत पोहोचण्यापूर्वी अन्य घटनांची पार्श्वभूमी काहीशी लांबल्यासारखी वाटते. मध्यांतरानंतर मात्र कोंढाणा काबीज करण्यासाठी तान्हाजी बेल भंडारा कोणत्या परिस्थितीत उधळतात, ती मोहीम फत्ते करत उदयभानाच्या ताब्यातून कोंढाणा जिजाऊंच्या पायाशी वाहतात, हे सगळे शौर्यचित्र पाहून अंगावर काटा उभा राहतो. उदयभान आणि तान्हाजी यांच्यातील लढाईत तलवारीचे वार तान्हाजी आपल्या बलदंड शरीरावर, ज्या पद्धतीने झेलतात, ते क्षणभर पाहून प्रेक्षकांनाही नक्कीच वेदना जाणवतील. चित्रपटातील ती लढाई पाहतानाच जर का आपण इतके भारावून जाणार असू, तर प्रत्यक्षात त्या लढाईमधील संघर्ष किती टिपेचा असेल, याचा याचा विचार करुनच मन धस्स होते.
शिवराय आणि तान्हाजींच्या मैत्रीचा चित्रपट
‘सुभेदार’ चित्रपटाचे कथानक केवळ कोंढाणा किल्ला कसा स्वराज्यात समाविष्ट करून घेतला, इथपर्यंतच मर्यादित न ठेवता, शिवराय आणि तान्हाजी यांच्या मैत्रीची किनारही या चित्रपटात उलगडत जाते. अस्वलाशी लढणार्या तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याने छत्रपती शिवाजीमहाराजांना भुरळ पडते आणि शेलार मामांमुळे शिवरायांना जीवश्चकंठश्च मित्र म्हणून तान्हाजी भेटतात. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये महाराजांना लढाईत सुभेदारापेक्षा एका मित्राला गमावण्याची किती भीती आहे, हेदेखील अतिशय संवेदनशीलतेने चित्रीत करण्यात आले आहे.
कलाकारांची अभिनयावर घट्ट पकड
दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टका’त दोन कलाकार हे कायमस्वरुपी या मालिकेशी जोडले गेले आहेत. ते म्हणजे जिजाऊंच्या भूमिकेतील अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि शिवरायांच्या भूमिकेतील अभिनेता चिन्मय मांडलेकर. सतत तीच व्यक्तिरेखा साकारणे हेदेखील खरं तर एक मोठं आव्हान. पण, आता पुन्हा नव्याने, पण तितक्याच प्रभावीपणे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर सादर करण्याचे शिवधनुष्य या कलाकारांना पेलावे लागते. मात्र, दोन्ही कलाकारांनी अगदी लिलया आपापल्या भूमिकांना यशोचित न्याय दिला आहे. तसेच अभिनेते अजय पुरकर यांनी साकारलेल्या सुभेदार तान्हाजी मालुसरेंची भूमिकाही तितकीच विलक्षण आणि संस्मरणीय. इतका मोठा किल्ला, ताकदवान उदयभानाच्या हातून मिळवणारा बलशाली, धिप्पाड, शूरवीर, साहसी, चपळ सुभेदार कसा असेल, याचे उत्तम सादरीकरण अजय पुरकर यांनी आपल्या अभिनयातून केले आहे.
याशिवाय शेलार मामांच्या भूमिकेतील अभिनेते समीर धर्माधिकारी, तान्हाजींच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्मिता शेवाळे, तान्हाजीच्या धाकट्या बंधूची सूर्याजीची भूमिका करणारा अभिनेता अभिजित श्वेतचंद्र आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रंगोळे, याशिवाय अभिनेत्री अलका कुबल यांची विशेष भूमिकाही लक्षवेधी ठरावी. इतकंच नव्हे, तर वयाची नव्वदी ओलांडलेले ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनीही तरुण कलाकारांना लाजवेल, असा कसदार अभिनय केला आहे. याव्यतिरिक्त उदयभानाची भूमिका साकारणारा अभिनेता दिग्विजय रोहिदास यानेही आपली भूमिका उत्तम वठवली आहे. आस्ताद काळे आणि मृण्यमयी देशपांडे, विराजय कुलकर्णी यांच्याही भूमिका छोटेखानी असल्या तरी तितक्याच महत्त्वाच्या. सरतेशेवटी या जहाजाचे कॅप्टन दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनीही ‘सुभेदार’ चित्रपटात बर्हिजी नाईकांची भूमिकाही तितकीच उल्लेखनीय. एकूणच सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयातून शिवरायांच्या आणि तान्हाजींच्या मैत्रीला, जिजाऊंच्या स्वराज्याप्रती असलेल्या स्वप्नाला योग्य तो न्याय दिला आहे.
तसेच, चित्रपटात मालुसरे कुटुंबाची पिढ्या दर पिढ्या सुरू असलेल्या रिती, महाराष्ट्राच्या मातीतले संगीत यांच्या शृंगारांनी ‘सुभेदार’ चित्रपट अधिक सजला आहे. दिग्दर्शकाचे इथे विशेष कौतुक यासाठी करावेसे वाटते. कारण, चित्रपटात बर्याच ठिकाणी तान्हाजी विनोद करताना दिसतात, अगदी लढाईत झुंज देत असताना देखील. त्यामुळे अशाप्रसंगी तसे घडले असेल का किंवा घडू शकत होते का, याचा विचार करुन त्यात कुठेही अल्लडपणा वाटणार नाही, याची पुरेपूर खबरदारी दिग्दर्शकांनी घेतलेली दिसते. त्यामुळे ‘शिवाष्टका’तील ‘सुभेदार’ हे पाचवे पुष्पदेखील इतिहासात आपले नाव कोरणार, यात तीळमात्र शंका नाही.