'स्कॅम २००३- द तेलगी स्टोरी' या देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवणाऱ्या वेब मालिकेत मराठी कलाकारांची मांदियाळी
23-Aug-2023
Total Views |
मुंबई : ‘स्कॅम-१९९२’ या वेब मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आता पुन्हा एकदा देशाला हादरवून टाकणाऱ्या २००३ सालच्या घोटाळ्यावर आधारित वेब मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेअर मार्केटच्या जगतात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताची गोष्ट 'स्कॅम १९९२' या वेब सीरिजमध्ये हंसल मेहता यांनी दाखवली होती. यानंतर २००३ साली झालेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे अवघा देश हादरुन गेला होता. याच घोटाळ्यावर आधारित 'स्कॅम २००३- द तेलगी स्टोरी' ही वेब मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.'अब्दुल करीम तेलगी' जो स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मास्टरमाईंड होता, त्याच्या स्कॅमवर आधारीत ही वेब मालिका आहे. १ सप्टेंबर रोजी सोनी लिव अॅपवर ही वेब मालिका प्रदर्शित होणार आहे.
अब्दुल करीम तेलगीच्या भारतातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची सत्य घटना, ज्याने देशाला धक्का दिला. सध्या अनेक मराठी कलाकार हिंदी चित्रपटांत आणि वेब मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसत आहेत. नुकतीच रवी जाधव दिग्दर्शित 'ताली' हा वेब मालिका प्रदर्शित झाली याच अभिनेता सुव्रत जोशी, अभिनेत्री हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर यांनी अप्रतिम काम केले. यानंतर आता देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यावर आधारित वेब मालिकेत पुन्हा एकदा मराठी कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचे विनोदवीर भरत जाधव देखील या वेब मालिकेत वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर मास्टरमाइंड अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार दिसणार असून ते एक रंगभूमीवर मुरलेले अभिनेते आहेत. दरम्यान, गगन यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'सोनचिरिया' आणि 'अ सुटेबल बॉय' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तसेच, 'स्कॅम २००३ - द तेलगी स्टोरी' ही वेबसिरीजचे हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शन केले आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचे कथानक पत्रकार आणि वृत्तनिवेदक संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आले आहे.