विवेकाचे महत्त्व

    23-Aug-2023   
Total Views | 125
Article On Importance Of Human conscience

विवेकाचे महत्त्व जाणणारा समर्थांसारखा तत्त्ववेत्ता संत क्वचितच आढळून येतो. दासबोधात व मनाच्या श्लोकांत समर्थांनी जागोजाग विवेकाचे महत्त्व सांगितले आहे. सर्व समाजाला विवेकाची शिकवण देऊन समर्थांनी त्याद्वारा लोकांना व्यवहारात आणि परमार्थसाधनेत शहाणे केले आहे.
 
प्रपंचात किंवा परमार्थात नुसते विचारांचे अथवा कल्पनांचे जाळे विणून चालत नाही. त्यातील चांगले विचार व कल्पना शोधून काढून त्या प्रत्यक्ष आचरणात आणाव्या लागतात. नुसत्या फुशारक्या बढाया, घमेंड या क्रियांनी माणसाचा ’स्व’ काही काळ सुखावला गेला तरी अंतिमतः हे वर्तन माणसाला अधोगतीकडे नेणारे ठरते. कारण, आपले आचरण अहंकारी आणि सत्याला धरून नाही, ही बोचणी अंतःकरणात कुठेतरी खोलवर त्रास देत असते. या दुराचाराची सच्च्या मनाला लाज वाटते. विवेकाने वैराग्याने सैराट धावणार्‍या मनाला आवरता आले नाही, तर अशा स्वैर कल्पना करणार्‍याला रामकृपा होणार नाही, असे स्वामींनी मागील श्लोक क्र. १०४ मध्ये सांगितले आहे.

स्वैर कल्पनांच्या मागे धावण्याची मनाला सवय लागली आणि मन त्यातच रममाण होऊ लागले, तर कुठलीही गोष्ट त्या मनाला धडपणे करता येत नाही. अशावेळी अंतर्मन त्याला सांगत असते की, हे आता आपण थांबवले पाहिजे. आपले मन आता आवरले पाहिजे. पण, निर्ढावलेले मन कल्पनाविलासात धीट बनते आणि आपल्या सदिच्छेचे तेथे काही चालत नाही. हे सैराट मन प्रपंचातील संसारताप वाढवीत असते. अशा अस्थिर मनाला परमार्थातही काही रस वाटत नाही. परमार्थ किंवा ईश्वर हे सारे थोतांड आहे, असे त्या मनाला वाटू लागते. यावर काही उपाय आहे का? समर्थांनी या समस्या आणून त्यावर उपाय पुढील श्लोकात सांगितला आहे-

विवेकें किया आपुली पालटावी।
अती आदरें शुध क्रिया धरावी।
जनीं बोलण्यासारिखें चाल बापा ।
मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५॥
विवेकाचे महत्त्व जाणणारा समर्थांसारखा तत्त्ववेत्ता संत क्वचितच आढळून येतो. दासबोधात व मनाच्या श्लोकांत समर्थांनी जागोजाग विवेकाचे महत्त्व सांगितले आहे. सर्व समाजाला विवेकाची शिकवण देऊन समर्थांनी त्याद्वारा लोकांना व्यवहारात आणि परमार्थसाधनेत शहाणे केले आहे.

समर्थांच्या मते, विवेकाच्या पुरस्काराने, आपल्या क्रियेत पालट करता येतो. त्यातूनच कला विद्या व शाखांचा उदय होतो आणि त्यातील प्रगती साधता येते. विवेकाने कल्याणकारी आनंदमय जीवनध्येये तयार होतात. विवेकाने सामाजिक मूल्ये अनुकूल होऊ लागतात, असा समाज रामराज्य कल्पना धारण करण्यास योग्य होतो. समर्थांइतका विवेकाचा पुरस्कार करणारा दुसरा तत्ववेत्ता संत जगात नाही असे म्हटल्यास त्यात वावगे नाही. जगातील तत्त्ववेत्यांचा विचार करता युरोपातील नेदरलॅण्डचा तत्त्ववेत्ता बेनेडिक्ट स्पिनोझा याने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात विवेकाचा पुरस्कार केल्याचे दिसून येते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा तत्त्ववेत्ता स्पिनोझा समर्थांचा समकालीन होता. विवेकाला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगात काही चांगले असते, काही वाईट असते. अशावेळी सारासार बुद्धीने चांगल्याची निवड करून त्याचा स्वीकार करणे आणि वाईटाच्या नादी न लागता त्याचा जाणीवपूर्वक त्याग करणे याला ‘विवेक’ म्हणता येते. तथापि समर्थांनी ‘विवेक’ या विषयावर आणखी सूक्ष्म विचार केला आहे. त्यांच्या मते दोन चांगल्या दिसणार्‍या गोष्टी समोर आल्या, तर पूर्ण विचारांती त्यातील अधिक चांगले व हिताचे आहे याचा शोध घेऊन त्याचा स्वीकार करणे हा समर्थांच विवेक होय.

प्रस्तुत मनाच्या श्लोकात स्वामींनी विवेकाच्या साहाय्याने क्रिया पालटता येते, असे सांगितले आहे. माणसाच्या समोर सद्क्रिया व असत्क्रिया हे दोन्ही पर्याय खुले असतात. त्यापैकी कशाचा अवलंब आपण करतो, यावर सदाचरण अथवा दुराचरण ठरत असते. स्वार्थी, अहंकारी, द्वेष, मत्सर करणारी माणसे फारसा विचार न करता असत्क्रियेचा अवलंब करतात, त्यातून त्यांचा अहंभाव पोसला जातो. परिणामस्वरूप ते दुराचार करू लागतात. भ्रष्ट आचाराचे त्यांना काही वाटेनासे होते. अशारितीने ही असत्क्रिया व्यक्तीच्या आणि समाजाच्या हिताची नसते. अशावेळी सारासार विचाराची जाणीव देणार्‍या विवेकाचा वापर केला, तर असत्क्रिया पालटून सद्क्रियेचा स्वीकार करता येतो. शुद्धक्रियेच्या अवलंबनाने मन सदाचाराला प्रवृत्त होते. यासाठी आदरपूर्वक शुद्धक्रिया जाणीवपूर्वक धरून ठेवावी.

कारण ती आपल्या नव्हे, तर एकंदर समाजाच्या दृष्टीने हिताची आहे. पूर्वीच्या सवयीमुळे मनाला असत्क्रियेचा मोह झाला तरी सारासार विवेक बुद्धीने त्याला बाजूला सारता येते. यालाच स्वामी ’विवेके क्रिया आपुली पालटावी’ असे जगातील बाह्य गोष्टीकडे धावण्याचा इंद्रियांचा स्वभाव असतो.आपल्याला न दिसणारे मन इंद्रियांच्या बहिर्मुखी सवयीला ताब्यात ठेवण्यास अयशस्वी ठरते. तथापि विवेकाच्या साहाय्याने जर मन आवरता आले, तर इंद्रियांची बालविषयांकडील धाव कमी करता येते. विवेकाचे महत्त्व जाणणारा समर्थांसारखा दुसरा संत नाही. त्यामुळे विवेकात अज्ञात मनाची क्रिया पालटण्याचे सामर्थ्य आहे. मन ज्ञानानुकूल करता येते. ज्ञानाचे सामर्थ्य अफाट आहे. ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. ज्ञानाने प्रपंचातील व अध्यात्मातील असाध्य वाटणार्‍या गोष्टी सहजपणे साधता येतात, असा संतांचा अनुभव आहे.

विवेक व वैराग्याने सतत धावणार्‍या मनाला आवरता येते, असा भगवद्गीतेचा अभिप्राय आहे. मनाला सावरण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी निदान बोलण्यासारखी वर्तणूक ठेवावी. एवढे पथ्य पाळले तरी माणसाचे आचरण सुधारते. यासाठी तुकाराम महाराजही ’बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले’ असे म्हणतात. बोलणे एक आणि वागणे भलतेच असेल, तर मनाला चुचकारून समजवावे लागते. समर्थांनी मनाच्या श्लोकांत मनाला ’मना सज्जना’ असे संबोधून पाहिले. पण, मनाचा स्वभाव स्वामींना माहीत आहे. म्हणून या श्लोकात स्वामी सांगत आहेत की, ’बोलण्यासारिखे चाल बापा’ येथे ’चाल बापा’ असे मैत्रीपूर्ण उद्गार काढून स्वामींनी मनाला समजावले आहे. उगीच कल्पना करीत संसारताप वाढवण्यापेक्षा बोलण्याप्रमाणे वागल्याने अनेक समस्या कमी होऊन संसारनाथ वाचवता येईल. मनाला शिस्त लावल्याशिवाय माणसाला प्रगती करता येणार नाही. साध्या दैनिक दिनक्रमातूनही मनाला शिस्त लावता येते व विवेकाने मन आवरता येते. हा विचार समर्थांनी पुढील श्लोकात सांगितला आहे, तो पुढील लेखात पाहू. (क्रमश:)

७७३८७७८३२२

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..
अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात अजून एका वाघाटीचा मृत्यू;

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात अजून एका वाघाटीचा मृत्यू; 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्रा'तील मृत्यूचे सत्र सुरूच

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन प्रकल्पा'तील अजून एका वाघाटीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे (rusty spotted cat kitten died). पिल्लू अवस्थेतील या वाघाटीचा अस्थिभंग झाला होता. या मृत्युमुळे राष्ट्रीय उद्यानातील वाघाटीच्या पिल्लांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून आता केंद्रात केवळ तीन वाघाटी शिल्लक राहिल्या आहेत (rusty spotted cat kitten died). त्यामुळे प्रशासन वाघाटी प्रजनन केंद्रातील उपचार पद्धतींविषयी गंभीर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (rusty spotted cat kitten..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121