मुंबई : स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून ८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’ कंपनीचा सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घोटाळ्यावरून सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या मित्र-परिवाराची ही कंपनी असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
कोविड काळातील लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली पालिकेकडून ८.१० कोटी रुपये मिळाले. त्यातील ४ कोटी बोगस कंपन्यांना ट्रान्स्फर केले असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी बोगस कंपन्या आणि नेत्यांच्या नावावर हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला.