मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका विषयक वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक चर्चा करीत विविध विषयांवर संवाद साधला.
दरम्यान, वार्तालाप कार्यक्रमानंतर लोढा यांनी महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात पत्रकारांना देण्यात येत असलेल्या विविध सोयी सुविधांची देखील माहिती घेतली. तसेच, पालिका प्रशासनाद्वारे पत्रकारांना देण्यात येत असलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर महानगरपालिकेत वार्तांकन करतानांचा पत्रकारांचा अनुभव देखील मंत्री मंगलप्रभात लोढांनी जाणून घेतला.
वार्तालाप कार्यक्रमाच्या सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिका वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या वतीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री लोढा यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या भेटीवेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासमवेत माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाठ, कमलेश यादव आणि विविध मान्यवर व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.