मुंबईकरांनो 'बीच'वर फिरायला जात असाल तर सावधान!; 'बीएमसी'कडून अलर्ट जारी
20-Aug-2023
Total Views | 157
मुंबई : मुंबईकर वीकेंडला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जातात. मुंबईतील बीचवर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. आणि मुंबईत म्हटलं की, बीचवर फिरायला जाणं आलंच. पण तुम्ही जर बीचवर फिरायला जात असाल तर सावध राहा. कारण ऑक्टोबरपर्यंत मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धोका असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ब्ल्यू बटन जेलीफिश', 'स्टिंग रे' प्रजातींचा वावर अधिक दिसून येत असल्याने मुंबई महापालिकेने याबाबत नागरिकांना सावध केले आहे. एकंदरीत, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्यांना बीएमसीकडून अलर्ट देण्यात आला आहे.
मागच्या काही दिवसांपासून जुहू चौपाटीवर जेलीफिशची दहशत
मागील काही दिवसांपासून मुंबईच्या जुहू चौपाटीवर जेलीफिश आढळत असून आतापर्यंत सहा जणांना या जेलीफिश ने दंश केल्याची घटना घडली होती. त्यामुळे जुहू चौपाटीवर जाणाऱ्या मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून जुहू चौपाटीवर जेलीफिश पाहण्यास मिळत असून हे जेलीफिश बूट, पायाला चिकटत असल्यामुळे पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून पावसाळ्यात समुद्रावर कोणीही जाऊ नये, असेही आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते.