प्लास्टिक नेमकं या जगात कसं आलं ते आपण मागील भागात पाहिलं. प्लास्टिकच्या वापरानुसार त्याचे वेगवेगळे प्रकारही असतात. त्याबद्दल माहिती देणारा आजचा हा लेख...
घरात चौफेर नजर टाका आणि सांगा, कोणत्या गोष्टी प्लास्टिकपासून बनलेल्या नाहीत? दैनंदिन वापरातल्या कित्येक गोष्टी प्लास्टिकच्याच आहेत. अगदी सकाळी उठल्यापासून टूथब्रशपासून सुरू होणारी प्लास्टिकची संगती, दुधाच्या पिशव्या, भाजीची आवरणे, बिस्किट, चिवड्याची पाकिटे येथपासून ते घरातील दूरदर्शन संच, संगणक, मोटारगाडी, रेफ्रीजेरेटर, अलीकडची खिडक्या-दारे, सगळ्याच गोष्टी प्लास्टिकच्या! आयुष्य सुटसुटीत होण्यासाठी आणि सर्व व्यवहारात सुलभता येण्यासाठी आपण प्राधान्याने प्लास्टिकचा वापर करू लागलो. या विविध प्रकारांचे प्लास्टिक निरनिराळ्या गुणधर्माचे असते. त्यात ठरावीक गुणधर्म असलेल्या संयुगांचा वापर केला जातो. यात सात लोकप्रिय प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे: अॅक्रीलिक किंवा पॉलीमिथाईल मिथाक्रायलेट (PMM), पॉलीकार्बोनेट (PC), पॉलीइथलीन (PE), पॉलीप्रोपायलीन (PP), पॉलीइथलीन टेरेफाथलेट (PETE or PET), पॉलीविनाईल क्लोराईड (PVC),अक्रायलोनायट्रईल- ब्यूटाडीएनस्टीरीन (BS)
अॅक्रीलिक किंवा पॉलीमिथाईल मिथाक्रायलेट (Acrylic/ Polymethyl methacrylate, PMM)
काचेच्याऐवजी या प्लास्टिकचा जास्त वापर होऊ लागला. कारण हे पारदर्शक, कमी वजनाचे आणि न फुटणारेअशा गुणधर्माचे असते. त्याचा उपयोग प्रकाशीय साधनांत जास्त होतो. याच्या शीट्स पत्र्यासारख्या वापरता येतात.त्यापासून प्लेक्सीग्लास आणि आरसे पण करता येतात. यांना रंग प्रदान करता येतो. चरे पडत नाहीत, अतिनील किरणांना असणारा प्रतिरोध, बुलेट-प्रूफ, अशा अनेक गुणधर्मांमुळे अॅक्रीलिक लोकप्रिय होते. अॅक्रीलिक हे आघात झाला असता काचेपेक्षा 17 पट अधिक प्रतिकार करू शकते.
पॉलीकार्बोनेट (Polycarbonate, PC)
हे पॉलीकार्बोनेट टणक, स्थिर, पारदर्शक आणि काचेपेक्षा 250 पट बलवान असल्याने त्याला ‘इंजिनिअरिंग प्लास्टिक’ असेही नाव आहे. याच्या शीट्स लवचिकतेमुळे सहज हव्या त्या आकाराच्या बनवता येतात. त्यावर उष्णतेचा फार परिणाम होत नाही. हरितगृहाची रचना करताना यांचा वापर होतो. डीव्हीडी, गॉगल, अशा अनेक वस्तू त्यापासून बनवता येतात.
पॉलीइथलीन (PE)
पृथ्वीवरचे सर्वांत उपलब्ध प्लास्टिक म्हणजे पॉलीइथलीन. यांच्यापासून विविध घनतेच्या वस्तू बनवतात. घनतेच्या प्रमाणात चार प्रकारचे पॉलीइथलीन म्हणजे कमी LDPE, मध्यम MDPE, उच्च HDPE, आणि अत्युच्च UHMWPE. कमी घनतेच्या पॉलीइथलीनपासून कॅरी बॅग्स, खाण्याचे डब्बे, फेकण्याजोगे पॅकिंग असे तयार केले जाते, तर मध्यम घनतेच्या प्लास्टिकपासून गॅस पाईप वगैरे बनते. प्लास्टिक बाटल्या, गटाराचे पाईप, बोटी, खुर्च्या अशासाठी उच्च घनतेचे पॉलीइथलीन वापरतात, तर त्याहीपेक्षा घन असलेल्या पॉलीइथलीनचा वापर मिलिटरी सामान, कृत्रिम सांधे, घसरगाड्या अशा वस्तू बनवताना वापरतात.
पॉलीप्रोपेलीन(Polypropylene, PP)
जगभरात दुसर्या क्रमांकावर वापर होणारे पॉलीप्रोपेलीन हे थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे. त्याचा अनेक ठिकाणी वापर होतो. पॉलीइथलीनपेक्षा हे सक्षम आहे तरीही जास्त लवचिक असते.त्याच्या टिकाऊ, लवचिक, उष्णतारोधी, आम्लरोधी, स्वस्त, अशा गुणधर्मामुळे प्रयोगशाळेतील उपकरणे, स्वयंचलीत यंत्रातील भाग, वैद्यकीय उपकरणे आणि अन्न ठेवण्यासाठी वापरले जाणारे डबे या वस्तू त्यापासून तयार करतात.
पॉलीइथलीन टेरेफाथलेट (Polyethylene Terephthalate, PETE or PET)
थर्मोप्लास्टिक रेझिन म्हणून वापरण्यात येणारे हे चौथ्या क्रमांकावरचे प्लास्टिक, पेट म्हणून पण ओळखले जाते. सेंद्रिय पदार्थाशी याची प्रक्रिया होत नसल्याने आणि पुन:चक्रीकरण साध्य होत असल्याने याचा खूप वापर होतो. तुटू, मोडू शकत नाही आणि वजन-धारण क्षमता चांगली असल्याने याच्यापासून धागेही बनवले जातात.
पॉलीविनाईल क्लोराईड (Polyvinyl chloride, PVC)
तिसर्या क्रमांकाचे हे प्लास्टिक ‘पीव्हीसी’ या नावाने लोकप्रिय आहे. कडक आणि तरीही लवचिक असल्याने यांच्यापासून शीट्स बनवल्या जातात. बांधकाम सामान, दरवाजे, खिडक्या, किओस्क, प्रदर्शनीय वस्तू, अशांची घडण पॉलीविनाईल क्लोराईडपासून केली जाते. शिवाय प्लास्टिसायझर पदार्थ मिसळून अधिक मऊसर उत्पादन करून त्याचा वापर प्लंबिंग सामानात, इलेक्ट्रिक केबल्स आणि वैद्यकीय नलिकांमध्ये केला जातो. कपड्यांच्या तंतुमध्येही पीव्हीसी मिसळतात.
अक्रायलोनायट्रईल-ब्यूटाडीएनस्टीरीन crylonitrile-Butadiene-Styrene (BS)
स्टीरीन, अक्रायलोनायट्रईल अशा रासायनिक पदार्थांवर ब्यूटाडीएन याच्या सान्निध्यात प्रक्रिया करून अतिशय बलवान आणि तरी लवचिक, चकचकीत आणि आघात सहन करणरे प्लास्टिक बनवले जाते त्याला ‘बीएस’ म्हणतात. याचा वापर रीफ्रीजेरेशन उद्योगात, मुलांच्या खेळण्यात, सामानाच्या मोठ्या बॅगेमध्ये, हेल्मेटसमध्ये केला जातो.(क्रमश:)
डॉ. नंदिनी देशमुख