मुंबई : एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने मेट्रो मार्ग ५ च्या ठाणे-भिवंडी दरम्यान प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोच्या सर्व पूर्वनिर्मित घटकांची उभारणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. धामणकर नाका मेट्रो स्थानकावरील शेवटच्या प्लॅटफॉर्म स्तरावरील एल बीमच्या उभारणीसह या मार्गिकेच्या सर्व सहा स्थानकांसाठीच्या संपूर्ण घटकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.मेट्रो मार्ग ५ हा मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा ठाणे - भिवंडी - कल्याण दरम्यान २४.९ किमीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे. त्यापैकी एमएमआरडीएमार्फत ठाणे ते भिवंडी दरम्यान ११.८८ किमी लांबीचे बांधकाम करण्यात येत आहे. मेट्रो मार्ग ५ चा पहिला टप्पा ठाण्यातील कापूरबावडी येथून सुरू होऊन नैऋत्य ते ईशान्य दिशेकडे जाते आणि धामणकर नाका, भिवंडी येथे संपतो. बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका ही मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्यातील सहा स्थानके आहेत.
धामणकर नाका मेट्रो स्थानकाच्या एल बीम उभारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेनच्या सुरक्षित हालचालींसाठी समस्या येत होती, ज्यासाठी त्या भागातील पुनर्वसन अनिवार्य होते. या भागातील पुनर्वसन हे २ टप्प्यांत करण्यात आले. ज्यानुसार स्थानकाच्या उजव्या बाजूचे नंतर डाव्या बाजूचे अशी बांधकामे पाडून नागरिकांचे पुनर्वसन करून हे काम क्रिया यशस्वीपणे पार पाडले.
मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांसाठीच्या पुर्वनिर्मित घटकांची उभारणी यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हा टप्पा मेट्रो मार्गिकेच्या पूर्णत्वासाठी महत्त्वाचा आहे. या नंतर आता फ्लोअरिंग, फॉल-सीलिंग, दर्शनी भाग यासारखी प्रमुख वास्तुशिल्प कामे तसेच स्थानकाच्या छताचे, पटऱ्यांचे आणि सिस्टीमची कामे सुरू करण्यात येतील. या मार्गिकेचे आता ७८.८१ टक्के प्रगती पूर्ण झाली आहे. एमएमआरडीएची टीम सर्व प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.