भक्ताच्या ठिकाणची अतिलीनता

    02-Aug-2023   
Total Views |
Article On Vivek Bhakti And spirituality

अत्यंत आदरपूर्वक रामनाम घ्यावे, असे सांगून समर्थांनी मनाच्या श्लोकांचे पहिले शतक संपवले आहे. येथून पुढे मनाच्या श्लोकांच्या दुसर्‍या शतकात प्रवेश करताना भक्तांना येणार्‍या समस्या विचारात घेऊन स्वामी विवेकाचे महत्त्व सांगणार आहेत. सगुणभक्ती आणि सदाचरण या विषयांवर चर्चा करणार आहेत.

विवेकाचा वापर केला, तर अनेक गोष्टी सहजसाध्य होतात. समर्थ विचारात विवेकाला महत्त्वाचे स्थान आहे. दासबोधात समर्थांनी जागोजागी विवेकाचे महत्त्व सांगितले आहे. विवेकाचे महत्त्व सांगणारा दुसरा कोणीही तत्त्ववेत्ता समर्थांच्या समकालीनांत दिसत नाही. विवेक सांभाळणारा मनुष्य सहसा भोळसर भाबड्या आचरणाच्या आहारी जात नाही. तो भावनाप्रधान न होता परिस्थितीचे गांभीर्य ओळखतो. तथापि, त्याच्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा गर्व असत नाही. भक्तीबाबत तो जागरुक असतो. आपल्या भक्तीचे भांडवल करून तो स्वतःचे महत्त्व वाढवीत नाही. यासाठी माणसाने सर्व ठिकाणी विवेकाचा पुरस्कार केला, तर आयुष्यात समतोलपणा साधून जीवनमूल्ये, कला, विद्या, भक्ती, अध्यात्म इत्यादी ठिकाणी त्याला आदर्श निर्माण करता येतात. विवेक विचाराने भगवंताची सगुणभक्ती आणि भक्ताचे सदाचरण यांची सांगड घालणे कल्याणकारी आहे, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत-
अती लीनता सर्वभावें स्वभावें।
जना सज्जनालागिं संतोषवावें।
देहे कारणी सर्व लावीत जावें।
सगुणी अती आदरेंसी भजावें ॥१०२॥
भक्तिप्रकारातील भगवंताच्या सगुण मूर्तीची पूजा, आराधना करताना भक्ताचे आचरण कसे असले पाहिजे, हे समर्थ सांगत आहेत. भक्ताने आपल्या स्वभावात काही बदल घडवून आणून आपल्याला भक्तीला अनुकूल करून घ्यावे लागते- स्वामी विवेकाचे महत्त्व जाणतात. त्यामुळे मनाचे श्लोक वाचताना, समजून घेताना वाचकाला विवेकदृष्टी कायम ठेवावी लागते. मनाच्या श्लोकांच्या विवेकपूर्ण व विचारपूर्वक अध्ययनाने मनाच्या श्लोकांतील बारकावे उलगडता येतात. सगुण उपासनेत भक्त आणि भगवंत हे अर्थातच वेगळे असतात. भक्ताला भगवंतापर्यंत पोहोचण्याचे ध्येय गाठायचे असते. पण, ते सहज शक्य होत नाही. हा भक्तीत लीन होण्याचा आणि अभ्यासाचा भाग आहे.

वास्तविक पाहता, भगवंत हा भक्ताच्या अंतःकरणात साक्षीभावाने सतत अंगभूत असला तरी भक्ताला आपला वेगळेपणा सांभाळून मनोभावे परमेश्वराची भक्ती करावी लागते. अशावेळी भक्ताला काही गुण संपादन करावे लागतात, असा समर्थांचा अभिप्राय आहे. त्यापैकी महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे, भक्ताच्या ठिकाणी अतिलीनता असली पाहिजे. व्यवहारातही लीनता अर्थात नम्रता हे सुस्वभावीपणाचे लक्षण आहे. भक्ताच्या ठिकाणी तर नम्रभाव अत्यावश्यक आहे. समर्थ या ठिकाणी ही लीनता ’सर्वभावे स्वभावे’ असावी असे सांगतात. याचा अर्थ भक्ताच्या अंगी असलेली लीनता ही प्रेमभावाने आचरणात असलेली असावी. तो भक्ताचा स्वभाव धर्म असला पाहिजे.

भगवंत हा सर्व शक्तिमान, सर्व साक्षी असल्याने त्याच्या श्रेष्ठत्वाची कल्पना करायाला मानवी बुद्धी तोकडी पडते. भगवंताची तुलना दुसर्‍या कशाबरोबर करता येत नाही. साहजिकच त्यामानाने आपले जीवन, आपली शक्ती किती तुटपुंजी आहे, याची भक्ताला जाणीव होते व तो भगवंतापुढे अतिलीन होतो. हे स्वाभाविक म्हणावे लागते. परंतु, अतिलीनता हा भक्ताचा स्वभाव झाला पाहिजे. ही लीनता मनापासून असावी, त्यात कृत्रिमता नसावी. ओढूनताणून आणलेली लीनता, नम्रभावाचा देखावा निर्माण करेल. पण, परमेश्वर सर्वसाक्षी असल्याने तो भक्ताच्या मनातील भाव आणतो. माणूस कृत्रिम भावाने लोकांना फसवेल, पण तो स्वतःला फसवू शकत नाही. तसेच तो भगवंतालाही फसवू शकत नाही.

समर्थांनी भक्ताच्या संदर्भात ’अतिलीनता’ हा शब्द वापरल्याने त्यातील अर्थाची छटा नीट समजून घेतली पाहिजे. व्यवहारात कोणी अती नम्रभावाने वागू लागला की त्याविषयी शंका उत्पन्न होते. त्यात काही स्वार्थी हेतू किंवा दिखावा नाही ना, असे वाटू लागते- राजकारणी लोक नेहमी सर्वांना हात जोडून नमस्कार करीत असतात. परंतु, ते ’अती नम्र’ आहेत असे कुणी समजत नाही. असे समर्थ या श्लोकात ’अती लीनता’ भक्तासाठी आवश्यक आहे असे का सांगतात, याचा विचार केला पाहिजे. ही अकृत्रिम लीनता भक्ताच्या ठिकाणची देहबुद्धी किती प्रमाणात आहे, ते दाखवीत असते. देहबुद्धी घट्ट असेल, तर तो मनुष्य ‘मी देहच आहे’ असे समजत असतो. देहाचे लाड पुरवण्यात तो आनंद मानत असतो. त्यामुळे तो स्वार्थी असतो. देवाची भक्तीसुद्धा तो भौतिक गोष्टी मिळाव्यात यासाठी करीत असतो.

थोडक्यात, तो भगवंताला आपल्या देहसुख तृप्तीचे साधन समजू लागतो. माणसाची देहबुद्धी कमी झाल्याशिवाय त्याच्या अंगी हीनता, नम्रपणा येत नाही. स्वाभाविक नम्रता, लीनता ही देहबुद्धीची श्रेणी दाखविणारी दर्शकमोजमाप यंत्रणा (indicator) आहे, असे समजावे. जितकी देहबुद्धी कमी, तितकी लीनता जास्त. भगवंताकडे जाताना भक्ताच्या अंगी ’अती लीनता’ आहे, याचा अर्थ त्याची देहबुद्धी नाश पावलेली आहे. असा भक्त देवाला प्रिय असतो. देहबुद्धीतून निर्माण झालेले अहंभाव, गर्व, नाग, द्वेष असले विकार परमार्थाला बाधक असतात. भगवंताच्या सामर्थ्यापुढे कोणी स्वतःला श्रेष्ठ समजत असेल, तर त्याला मूर्ख किंवा पढतमूर्ख म्हणावे लागेल. यासाठी स्वामी भक्ताच्या ठिकाणी ’अतीहीनता’ असावी असा शब्दप्रयोग करतात. ही हीनता स्वभावतः म्हणजे सहजपणे आलेली असावी - लीनता आणि दीनता अर्थात दैन्यवाणेपणा यात फरक आहे. लीनतेत सामर्थ्य असते, प्रामाणिकपणा असतो. दीनतेत लाचारी असते, दीनवाणेपणा, असमर्थता असते. लीनतेचा स्वभाव असलेल्या भक्ताच्या ठिकाणी भौतिक वैभव, बल असते. पण, त्याचा त्याला गर्व नसतो.

वृक्ष फळभाराने वागतो तशी ही नम्रता असते. रामासमोर हात जोडून आज्ञेची वाट पाहणार्‍या हनुमंताची, नम्रता, ती ही लीनता असते. अशा भक्ताला पाहून सज्जनांना आनंद होतो. भक्ताने स्वाभाविक अशा लीनतेने सज्जनांना आनंद मिळवून द्यावा. तो आनंद भगवंताकडे पोचता होतो. आपण देशाला कष्ट देऊन सज्जनांच्या उपयोगी पडावे. समाजातील चांगली कामे करण्यासाठी आपण देहकष्ट करून हा देह कारणी लावावा. समर्थ साक्षेपाला म्हणजे सततोद्योगाला महत्त्वाचे स्थान देतात. आळसाचा त्यांना तिटकारा आहे, म्हणून सज्जनांसाठी, समाजहितासाठी देह झिजवावा. तसेच भगवंतासाठीही देह झिजवावा. भगवंताचे जे उत्सव असतील, त्यासाठी पडेल ते काम करून उत्सवास साहाय्य करावे. उत्सवात भगवंताची सगुण मूर्ती असते. निर्गुण परब्रह्माचे ते सगुण रूप असल्याने त्या रूपाची अत्यंत आदरपूर्वक भक्ती करावी. देवाच्या उत्सवात काम केल्याने आपला देहस्वार्थ कमी होऊ लागतो - निःस्वार्थ सेवेची सवय लागते. उत्सवासाठी जी संतसज्जन मंडळी जमलेली असतात, त्यांच्या सहवासात सेवाभावाने राहिल्यास संतसंगतीचा लाभ होतो. भगवंत समजण्यास संतसंगती उपयोगी पडते. समर्थ दासबोधात सांगतात की,

’ऐसी संतांची महिमा।
बोलिजे तितुकी उणी उपमा।
जयांचेनि मुख्य परमात्मा।
प्रगट होये॥
त्यासाठी सगुण भक्ती अंती आदरपूर्वक करावी, असे स्वामी सांगतात.

७७३८७७८३२२

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..