नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्य दिनाला पश्चिम लंडनमधील साउथॉलमध्ये दोन जणांवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुरप्रीत सिंग (२५) असे आरोपीचे नाव असून तो भारतीय नागरिक आहे. आरोपीला उक्सब्रिज मजिस्ट्रेट कोर्ट न्यायालयात हजर करण्यात आले.या प्रकरणी आणखी एका २० वर्षीय व्यक्तिला लंडन पोलीसांना अटक केली आहे. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.त्याचवेळी आरोपी गुरप्रीतची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बेलमोंट रोड इल्फोर्ड येथील गुरप्रीत सिंगवर गंभीर शारीरिक इजा पोहचवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, मारहाण, , धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये साऊथॉलमधील काही लोक हातात तिरंगा फडकावत लाऊडस्पीकरवर 'जय हो' गाणे वाजवत असल्याचे दिसत आहे. दुसर्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती हातात झेंडा घेऊन रेल्वे स्टेशनच्या दिशेने कूच करताना आणि 'जय श्री राम' आणि 'हिंदुस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहे. तिथे एक गुरुद्वारा दिसतो, ज्यावर खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवालेचा फोटो चिकटवला दिसतो.
दरम्यान, खलिस्तानी झेंडा घेऊन ४-५ खलिस्तानी समर्थक हातात तिरंगा घेऊन लोकांसमोर येतात आणि त्यांच्याशी हाणामारी करतात. यानंतर परिस्थिती अनियंत्रित होते. यादरम्यान काही लोक एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. 'Southalls Finest' नावाच्या हँडलने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भारतीयांनी हा कार्यक्रम साउथॉलमधील ब्रॉडवेवर १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनी आयोजित केला होता. यादरम्यान एका व्यक्तीने तेथे तैनात असलेल्या पोलिसांना काही लोकांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगितले. तेथे ३० वर्षांचे दोन पुरुष चाकूने घायाळ झालेल्या अवस्थेत आढळले. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी आरोपी गुरप्रीत सिंग आणि अन्य एका व्यक्तीला घटनास्थळावरून अटक केली. यादरम्यान एका महिला अधिकाऱ्याच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, अधिकाऱ्याला रुग्णालयात उपचाराची गरज नव्हती. मेट्रोपॉलिटन पोलिस सेवेच्या प्रवक्त्याने सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.या घटनेबद्दल बोलताना, ईलिंगमधील मेट्रोपॉलिटन पोलिसांचे अधीक्षक सीन लिंच म्हणाले: “आम्ही लोकांना आवाहन करतो की पुनरावृत्ती करणे किंवा अटकळ घालणे टाळावे. सुदैवाने जखमींपैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि मृत्यू झाला नाही."