ज्ञानलालसा आपल्याला जन्मजात असते. तिला खाद्य पुरवणं, दिशा देणं किंवा मार्गदर्शन करणं, हे आपल्या भवतालच्या समाजाचं कर्तव्य. आपल्या कुवतीप्रमाणे आपले पालक ते करत असतातच. परंतु, शिक्षणसंस्थेचा यात सिंहाचा वाटा असतो. आपली शिक्षण व्यवस्था ज्या मूल्यांवर आधारलेली आहे, त्यात कालानुरूप बदल होणे अपेक्षित होते. परंतु, ती फार किचकट आणि संथ प्रक्रिया असल्याकारणाने अनेक पर्यायी शिक्षणसंस्था तयार झाल्या.
प्लेगार्डन, किंडरगार्डन, सुट्टीतली शिबिरे, उन्हाळी शिबीर, अतिरिक्त शिकवणी वर्ग, अभ्यासक्रमेतर उपक्रम हे सर्व त्यातूनच पुढे आले. सरकार शाळांनीसुद्धा या सर्व उपक्रमांना प्रोत्साहन दिले. ‘ज्ञानप्रकाश फाऊंडेशन’ ही अशीच एक संस्था. ’ज्ञानवाटांच्या शोधात, ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील शाश्वत बदलासाठी’ हे तुलसी वत्सल यांचे ‘ज्ञानप्रकाश फाऊंडेशन’चा प्रवास सांगणारे पुस्तक. ‘ज्ञानप्रकाश फाऊंडेशन’चे संस्थापक दलजित मिरचंदानी यांच्या जीवनप्रवासासोबतच संस्थेचा प्रवास या पुस्तकातून मांडला आहे. विद्या कुलकर्णी यांनी सदर पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे.
हा प्रवास दलजित यांच्या मनात घडणार्या घडामोडींपासून सुरू होतो. कॉर्पोरेट क्षेत्रात दीर्घकाळ काम केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करावे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. जेव्हा १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली, तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब कोलकात्यात होते. दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात सर्वजण राहत असत. एक काका सोडल्यास कुणाचेच शिक्षण झाले नव्हते. अशिक्षित असल्याचे तोटे आणि शिक्षणाची गरज त्याचवेळी सर्वांना जाणवली. त्यांच्या आईवडिलांची भक्कम साथ होती. त्यांच्या तत्कालीन मार्गदर्शकांनी त्यांना अनेक सल्ले दिले. त्यातल्या सर्वच सल्ल्यांचा त्यांना उपयोग झाला. जेव्हा त्यांनी पहिली नोकरी केली होती, तेव्हा त्यांना त्या विषयातले काहीही ज्ञान नव्हते. त्यांचे वरिष्ठ त्यांना म्हणाले की, ’‘वर प्रभागात जाऊन या आणि स्वतःहून सर्व शिका.‘’ आज ४० वर्षांनी पुन्हा ‘ज्ञानप्रकाश’बाबत वरिष्ठांना सांगायला दलजित गेले आणि असलेले अज्ञान विनापडदा उघड केले. तेव्हा इतक्या वर्षांनीसुद्धा त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना हाच सल्ला दिला-‘स्वतःहून शिक!’
शून्यापासून सुरुवात झाली, तेव्हा विकासघरे सुरू केली. लहान-लहान मुले येऊन बसत. पाटी-पुस्तकविरहित शाळा, तेव्हा खडे, दगड, शेंगांची टरफले, अशा सहज उपलब्ध साधनांपासून गणिताला सुरुवात झाली. आपल्या ज्ञानाचा प्रसार झाल्यानेच त्याला नवे धुमारे फुटतात. योग्य प्रश्न कसे विचारायचे, आपल्या कल्पना इतरांना कशा समजावून सांगायच्या आणि आपले विचार त्यांना कसे पटवून द्यायचे, हे सर्व या वर्गात शिकवले जाऊ लागले. पहिली शाळा शिक्षकांच्या परवानगीने तसेच मुख्याध्यापकांच्या अधिपत्याखाली सुरू झाली. विद्यार्थी शाळेत एक तास पूर्वीच यायला तयार झाले. मुलांचे प्राथमिक शिक्षण किती मनोरंजक आहे, त्यावर त्यांचे संपूर्ण भविष्य आधारलेले असते. विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती आणि शिक्षकांचे प्रोत्साहन, या दोन गोष्टींमुळे मुलांचे प्रगतीचे मार्ग सुकर होतात.
संस्था प्रगती करू लागली तसे लक्षात आले की, विकास तर होतोय, पण संसाधनांच्या कमतरतेमुळे हे कार्य मोठ्या प्रमाणावर करता येणे अशक्य आहे. तेव्हा प्रत्येक शाळेतील शिक्षकांना पर्यवेक्षक करून त्यांच्यातूनच निवड प्रक्रिया करणे क्रमप्राप्त होते. यात शाळा व्यवस्थापन समितीची मदत घ्यायचे त्यांनी ठरवले. शाळांनी परवानगी दिली. पालक एकदिलाने तयार झाले आणि उपक्रम जलदगतीने सुरू झाले. खालावलेली शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळागळती ही दोन मोठी आव्हाने होती. परंतु, त्यांच्यावर मात करण्यास ‘ज्ञानप्रकाश’ तयार झाले आणि काहीच दिवसांतच योग्य परिणाम दिसू लागले. शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, मुले आणि शाळा समिती यापैकी कुणातच सुसंवाद नव्हता, तो यानिमित्ताने सुरू झाला.
एखादी संस्था सुरू करायची, त्यामार्फत एका मोठ्या आणि अशिक्षित समाजगटाला फायदा मिळवून द्यायचा आणि तेही कोणत्याही प्रकारचा पूर्वानुभव नसताना. ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. समाज कसा घडत जातो, हे जाणून घेण्यासाठी ‘ज्ञानप्रकाश’चा हा प्रवास वाचणे, नक्कीच उपयुक्त आहे.
पुस्तकाचे नाव : ज्ञानवाटांच्या शोधात
लेखकाचे नाव : तुलसी वत्सल
अनुवाद : विद्या कुलकर्णी
प्रकाशक : कोलंबस पब्लिशिंग अॅण्ड सर्व्हिसेस
मूल्य : २०० रुपये
मृगा वर्तक