मग पश्चिमी देशांनी पवित्रा बदलला.एकीकडे या देशांशी गोडगोड बोलायचं. त्यांच्याशी मोठेमोठे करार करायचे, कंत्राटं करायची, यांचं तेल शक्य तितक्या किफायतशीर किमतीत स्वतःच्या पदरात पाडून घ्यायचं. हे करतानाच यांच्या शिया-सुन्नी, अरब-बिगर अरब अशी भांडणं पेटवून द्यायची, असे राजकारण सुरू झालं आणि आजही ते यशस्वीपणे चालूच आहे.
एक आहे सुनील आणि एक आहे ज्ञानदा. दोघंही पहिली ते दहावी एकाच वर्गात होते. ज्ञानदा नक्कीच हुशार होती. पण, सुनील ’जिनियस’ होता. कोणतेही विशेष प्रयत्न न करता, तो आरामात वर्गात पहिला यायचा. दहावीच्या परीक्षेच्या महिनाभर आधी वर्गातली सगळी टपोरी पोरंसुद्धा नाईलाजाने अभ्यासाला लागलेली असताना, हा प्राणी कॅरम आणि टेबल टेनिस खेळण्यात मग्न असायचा आणि तरीसुद्धा तो शाळेत सर्वाधिक टक्केवारी मिळवून पहिला आला. मित्र आणि शिक्षक त्याला म्हणाले, ’‘थोडी मेहनत केली असतीस, तर बोर्डात आला असतास.” यावर हा म्हणाला, “मला पुढे काय करायचंय ते नक्की आहे. त्यासाठी एवढे टक्के पुरेसे आहेत.” त्याचा हा जन्मजात प्रचंड आत्मविश्वास फक्त अभ्यासापुरताच होता, असे नव्हे. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, कॅरम आणि टेबल टेनिस अशा सर्व स्पर्धा तो आरामात ‘एफर्टलेस’ मारायचा.
ज्ञानदा खूप परिश्रम करायची. अभ्यास आणि विविध स्पर्धांची तयारी करण्यासाठी ती शाळेत लवकर येऊन, उशिरापर्यंत थांबून, वेगवेगळ्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्यायची. यात काहीच गैर नाही. माणसाने महत्वाकांक्षी जरूर असावं. पण, त्यात कुणाला तरी खाली पाडून, कुणावर तरी मात करून, आपण यशस्वी व्हावं, अशी ईर्ष्या असू नये.परिणाम इतकाच व्हायचा की, आपण इतके परिश्रम करूनही वर्गातं दुसरीच आणि सुनील काहीही परिश्रम न करतादेखील पहिला, म्हणून ज्ञानदा मनोमन खट्टू व्हायची. मग ती सतत सुनीलला ’साईडट्रॅक’ करायला बघायची. शिक्षकांचं लक्ष आपल्यावरच राहावं, म्हणून मोठ्या हुशारीच्या शंका-कुशंका विचारायची.
आज सुनील आणि ज्ञानदा दोघंही आपापल्या जीवनात यशस्वी आहेत. पण, माजी विद्यार्थ्यांच्या गाठी-भेटीत गप्पा मारताना ज्ञानदा कायम, माझा नवरा, माझी मुलं, माझं सामाजिक कार्य हे सगळं कसं ग्रेट आहे; म्हणजेच पर्यायाने मी कशी श्रेष्ठ आहे, हे इतरांच्या मनावर ठसवण्यात मग्न असते, तर सुनील स्वतःविषयी किंवा स्वतःच्या बायको-मुलांविषयी चकार शब्द न काढता, इतर नानाविध विषयांवर गप्पा मारत असतो. प्रत्यक्षात तो स्वतःची बायको आणि याची मुलं त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात अव्वल क्रमांकावर आहेत. आत्मविश्वासातून येणारे सहजपण आणि आत्मस्तुतीतून येणारं कंटाळवाणेपण मित्रांना एकाच बैठकीत अनुभवायला मिळतं.
असो. तर पश्चिमी विचारवंतांचं मन साधारण त्या ज्ञानदासारखं आहे. प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर पश्चिमी देशांनी जग जिंकलं. हे उद्योग साधारण १४व्या शतकात सुरू झाले आणि १९व्या शतकात पूर्ण झाले. पश्चिमी देशांनी म्हणजे मुख्यतः युरोप खंडातील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगाल या पश्चिम युरोपीय देशांनी, स्वतःच्या युरोपीय भूभागासह आशिया आणि आफ्रिका या ज्ञान खंडांमधील मोठमोठे भूभाग जिंकून आपल्या साम्राज्यांना जोडले. हे करताना यांना दोन नवी आतापर्यंत अज्ञात असलेली खंडे सापडली. तिथल्या मूळ निवासींची सरसहा कत्तल उडवून किंवा यांना बाटवून युरोपीय सर्वांनी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांना युरोपचाच विस्तारित भाग बनवून सोडलं आहे.
का, कोण जाणे; पण युरोपच्या मनात आशियाविषयी प्रचंड ईर्ष्या आहे. आकस आहे. त्यामुळे युरोपीय विचारवंत जेव्हा असा विचार करू लागले की, यांना आपण जग जिंकलंय, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आपल्याच पंथाचे आहेत, युरोप तर आपलाच आहे. राजकीय भांडणं कितीही टोकाची असली तरी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या तीनही खंडांची संस्कृती किंवा सभ्यता एकच आहे. मग आता आमच्या या पश्चिमी सभ्यतेला आव्हान कुणाचं असू शकते? आफ्रिकेबद्दल चिंता करण्याचं कारण नाही. तिथले मागास टोळीवाले देश एकमेकांमध्ये लढण्यात मग्न आहेत. राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी कोणत्याच बाबतीत ते आपल्याला आव्हान ठरू शकत नाहीत. मग भावी काळात आपल्या पश्चिमी ख्रिश्चन धर्मसत्ता आणि राजसत्तेला आव्हान कोण देऊ शकेल?
तर तो पौर्वात्य आशिया खंडच देऊ शकेल. आता आशिया खंडात कोणकोणते राज्यकीय-धार्मिक-सामाजिक प्रबळ गट आहेत? तर ज्यू, बौद्ध, हिंदू आणि मुसलमान हे ते गट आहेत. यापैकी ज्यू हा गट संख्येच्या दृष्टीने फारच छोटा आहे. खेरीज आज खुद्द इस्रायल आणि युरोप-अमेरिकेन जे शक्तिमान ज्यू आहेत, ते स्वतःला आशियाई पौर्वात्य न मानता युरोपीय पाश्चिमात्यच मानतात. म्हणजेच आज युरोपला आव्हान देण्याच्या मानसिकतेत ते नाहीत. हिंदू हेच खरं आव्हान आहे. पण, हे हिंदू लोक इतके अस्मिताविहीन झालेत, आम्हा गोर्या लोकांच्या गुलामगिरीत मनाने इतके रुतून पडलेत की, ते काय आम्हाला कपाळ आव्हान देणार? उद्या आम्ही जाहीर केलं की, सगळे हिंदू लोक हे ’काळे’ नसून ’गोरे’ आहेत. म्हणजेच ’रेसिडेंट नॉन इंडियन्स’ आहेत, तर हे लोक खुशाल याला मान्यता देतील. स्वतःचा रंग, देश, धर्म, संस्कृती यांच्याबद्दल प्रचंड न्यूनगंड बाळगणारे आणि युरोप-अमेरिकेबद्दल अनिवार लालसा मनात असणारे हे हिंदू काय आम्हाला आव्हान देणार?
बौद्धांचं काय? आग्नेय आशियातले अनेक देश, जपान आणि प्रचंड लोकसंख्या असणारा चीन हे बौद्ध आहेत. ते धार्मिक नव्हे, पण राजकीय आव्हान ठरू शकतात. तेव्हा यांना चुचकारून घ्या. कधी गरम, तर कधी नरम अशी प्रसंग पाहून भूमिका घेऊन उघड संघर्ष टाळायचा. आतून सेवा, शिक्षण, वैद्यकीय साहाय्य वगैरे बहाणे करून पोखरत राहा. त्यासाठी आपले पाद्री आहेतच. मग आता राहिले मुसलमान. सध्या तरी तेच खरं आव्हान आहे. यांच्याबद्दल अधिकाधिक अभ्यास करा. त्यांची मर्मस्थानं शोधा. त्यावर आघात करा. यांच्यामध्ये शिया-सुन्नी, अरब-तुर्क-इराणी-अफगाणी असे भेद आहेत ना? छान! ते भेद वाढवा. कलागती लावा. भांडणं लावा. लढाया होऊ द्या. युद्ध पेटू द्या. आपापसात लढून मरू द्या, लेकाच्यांना!
इसवी सन ५७० या वर्षी महंमद पैगंबर यांचा जन्म मक्का शहरात म्हणजे तत्कालीन अरबस्थान किंवा आजच्या सौदी अरेबियात झाला. इसवी सन ६१३ मध्ये यांनी आपल्या ’इस्लाम’ या नव्या संप्रदायाचा प्रचार करायला सुरुवात केली. तलवारीच्या जोरावर अरबी द्विपकल्पाचा बराच मोठा भाग इस्लामच्या अमलाखाली आणून इसवी सन ६३२ मध्ये महंमद पैगंबर मरण पावले. त्यांना मुलगा नव्हता. यामुळे त्यांच्या वारसदारावरून प्रचंड संघर्ष झाला. पैगंबरांचे नातू-मुलीचे मुलगे-हसन आणि हुसेन हेसुद्धा या यादवी युद्धात बळी पडले. तिथपासूनच इस्लाममध्ये पहिली फूट पडली. हसन-हुसेन यांना मानणारा पंथ हा स्वतःला ’शिया’ म्हणवू लागला, त्यांच्या प्रमुखाला ’इमाम’ म्हणू लागले, तर त्यांचा पराभव करून सत्तेवर आलेला पंथ स्वतःला ‘सुन्नी’ म्हणवू लागला. त्याच्या प्रमुखाला ’खलिफा’ म्हणू लागले.
दुफळी होऊनसुद्धा इस्लामच्या सैन्याने पुढच्या १५०-२०० वर्षांत पूर्वेला इराणपर्यंत धडक मारली आणि भूमध्य समुद्राच्या दक्षिण तीरावरचे इजिप्तपासून मोरोक्कोपर्यंतचे सगळे देश जिंकून युरोपवर धडक मारली. यांच्या धडकेसमोर स्पेनने लोळण घेतली. कट्टर कॅथलिक स्पेन साफ बाटला. युरोप खडबडून उठला. स्पेनमधून पुढे फ्रान्समध्ये घुसलेल्या इस्लामी सैन्याचा निर्णायक पराभव टूर्स इथल्या रणमैदानावर फ्रेंच ख्रिश्चन सेनापती चार्ल्स मार्टेल याने केला. इसवी सन ७३२ या वर्षी झालेल्या या लढाईला ’बॅटल ऑफ टूर्स’ असंच नाव आहे. मुसलमानांचे युरोपातलं आक्रमण थांबलं. पण, पूर्वेकडे त्यांनी इराणला बाटवलं. मध्य आशियातल्या सुन्नींना बाटवलं. तिथून ते चीनच्या विशाल अशा टँग साम्राज्यावर तुटून पडले. इसवी सन ७५१ मध्ये यांनी तलास इथल्या लढाईत टँग सम्राटाचा पराभव केला. मात्र, मग ते चीनमध्ये न घुसता दक्षिणेकडे वळून अफगाणिस्तानात घुसले.
पुढच्या काही शतकांमध्ये युरोप-आफ्रिका-आशिया या तीन खंडांमध्ये इस्लामची तीन फारच विशाल साम्राज्य निर्माण झाली. आशिया, आफ्रिका आणि थोडासा युरोप मिळून कॉन्स्टान्टिनोपल उर्फ इस्तंबूलचं ऑटोमन साम्राज्य. हे सुन्नी पंथीय होतं. इराण आणि मध्य आशियाचा काही भाग यांवर नाब्रिझ या राजधानीतून अंमल गाजवणारं सफाविद साम्राज्य, हे शिया पंथीय होतं आणि संपूर्ण भारतीय द्विपकल्यावर अंमल गाजवणारे मुघल साम्राज्य हे सुन्नी पंथीय होतं. मार्शल गुडविन सिम्स हॉजसन नावाच्या पश्चिमी पंडिताने इस्लामचा म्हणजे या तीन साम्राज्यांचा बारकाईने अभ्यास केला.
त्याला असं आढळलं की, मुसलमानांना चीनकडून बंदुकीची दारू-गन पावडर बनवणं आणि तिचा उपयोग करून तोफखाना सज्ज करणं, या विद्या मिळाल्या. अल्पावधीत मुसलमानांनी म्हणजे अरबांनी नव्हे, तर तुर्कांनी तोफखान्याचं युद्धतंत्र विकसित करून शत्रूचा पाडाव केला आणि ही तीन साम्राज्यं उभारली. म्हणून हॉजसन त्यांना म्हणतो-गन पावडर एम्पायर्स. पण, १४व्या शतकानंतर युरोपीय देशांनी गन पावडरचा अधिक प्रभावी वापर करणार्या तोफा आणि बंदुका शोधून काढून मुसलमानांची ही तीनही साम्राज्यं संपवली. १७२४ साली ऑटोमन तुर्क आणि रशियन झारांनी इराणचं सफाविद साम्राज्य आपापसात वाटून घेतलं. मुघल साम्राज्य मराठ्यांनी संपवतच आणलं होतं. १८५७ साली इंग्रजांनी मराठ्यांसकट दिल्लीची मुघल बादशाही संपवली. १९१८ साली ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका या दोस्त राष्ट्रांनी जर्मनीसह त्याचा दोस्त तुर्कस्तान याचा पहिल्या महायुद्धात पराभव करून ऑटोमन साम्राज्य संपवलं.
पण, त्याआधी एक गंमत घडली होती. प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने ऑटो मोबाईल इंजिनचा शोध लावला होता. या इंजिनाला इंधन म्हणून तेलाची गरज होती. हे तेल ऑटोमन साम्राज्यातल्या अरेबियन द्विपकल्पाच्या भूमीत, इराणमध्ये आणि मध्य आशियाच्या तुर्कवंशीय लोकांच्या भूमीत भरपूर होतं, हे सगळे देश मुसलमान होते, आहेत. त्यामुळे साम्राज्ये नष्ट होऊनही मुसलमान देश व्यापारीदृष्ट्या तेजीत आले. मग पश्चिमी देशांनी पवित्रा बदलला.एकीकडे या देशांशी गोडगोड बोलायचं. त्यांच्याशी मोठेमोठे करार करायचे, कंत्राटं करायची, यांचं तेल शक्य तितक्या किफायतशीर किमतीत स्वतःच्या पदरात पाडून घ्यायचं. हे करतानाच यांच्या शिया-सुन्नी, अरब-बिगर अरब अशी भांडणं पेटवून द्यायची, असे राजकारण सुरू झालं आणि आजही ते यशस्वीपणे चालूच आहे.
टोबी मथिएसेन हा स्वीस प्राध्यापक इंग्लंडच्या ब्रिस्टॉल विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवतो. त्याचं ’द खलिफ अॅण्ड द इमाम ः द मेकिंग ऑफ सुन्नीझम आणि शियाझम’ हे ताजं पुस्तक इस्लाममधल्या मूळ फुटीची भाणि त्या फुटीचं भगदाड होण्यासाठी पश्चिमेने केलेल्या भरघोस प्रयत्नांची कहाणी मांडते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.