ईशनिंदेपेक्षा घातक मानवीनिंदा

    18-Aug-2023   
Total Views |
Mob Vandalises Churches in Pakistan's Jaranwala

त्यांचा झुंड येतोय. ते आपल्याला मारून टाकतील. आपला गळा कापतील. सगळ्यांनी पळा...” जीवाच्या आकांताने पाकिस्तानातील जारनवालामधील सिस्टर नाएला भट्टी कंठ फाटेस्तोवर ओरडत होती. त्यांच्यासोबतच्या ख्रिश्चन बांधवांनीही घरातून नेसत्या कपड्यांनिशी, मुलाबाळांना कडेवर घेत कसाबसा घरातून पळ काढला...कोणी रिक्षा पकडून पसार झाले, तर कोणाला त्यांच्या मुस्लीम शेजार्‍यांनी घरात आश्रय दिला. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानंतर दोन दिवसांनी, दि. १६ ऑगस्ट रोजी दोन ख्रिश्चनांनी केलेल्या कथित ईशनिंदेच्या आरोपावरून मुस्लीम धर्मांध ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत रस्त्यावर उतरले. जारनवाला आणि फैजलाबादमधील कित्येक चर्चवर हल्ला चढवण्यात आला.

चर्चमध्ये घुसून तोडफोड तर केली गेलीच; शिवाय चर्चमधील क्रॉसलाही पायदळी तुडवण्यात आले. चर्चच्या छतावर चढून ‘अल्ला हू अकबर’चे नारे देत संपूर्ण चर्चच धर्मांधांनी आगीच्या भक्ष्यस्थानी दिले. एक-दोन नाही, तर अशाचप्रकारे पाच चर्च धर्मांधांनी जमीनदोस्त केली. एवढ्यावरच समाधान मानतील, ते धर्मांध कसले. चर्चनंतर या पाशवी मानसिकतेच्या धर्मांधांनी आपला मोर्चा ख्रिश्चनांच्या वस्त्यांकडे वळवला. घरांमध्ये घुसून अमानवी मारझोड करण्यापासून ते सामानसुमानाची लूटमार करण्यात आली. ख्रिश्चनांच्या घरांनाही आगी लावून विजयाचा अघोरी आनंद या धर्मांधांनी साजरा केला आणि हे एवढे सगळे कांड घडताना पोलीस, प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेत, हा तमाशा संपेपर्यंत, ख्रिश्चनांचे रक्त सांडेपर्यंत फक्त वाट बघितली...
 
ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये ९०च्या दशकात काश्मिरी पंडितांना पलायनाला प्रवृत्त करण्यासाठी ‘रलिव, गलिव, चलिव’च्या मशिदींवरील भोंग्यांवरून घोषणा देण्यात आल्या, त्याच धर्तीवर मुल्ला-मौलवींनी दि. १६ ऑगस्टलाही अशीच विखारी घोषणाबाजी केली. ‘मुसलमानांनो, ते आपल्या कुराणाचा, अल्लाचा अपमान करीत आहेत आणि घरी बसून तुमच्या घशाखाली घास उतरूच कसा शकतो?’ असे म्हणत काफिरांविरोधात माथेफिरू धर्मांधांची पिसाळलेली फौज रस्त्यावर उतरली. ज्या ज्या काही ख्रिश्चनांच्या खुणा-घरे, दुकाने, चर्चेस दिसतील, ते ते सगळे ध्वस्त करीत ही धर्मांधांची टोळी मोकाट हाहाकार माजवित होती. एक अख्खा दिवस हे भयनाट्य सुरूच होते आणि पाकिस्तानातील उरलेसुरले ख्रिश्चन जीव मुठीत घेऊन उद्याचा सूर्योदय आपण पाहू शकू की नाही, याच विवंचनेत येशूची करुणा भाकत होते...

पाकिस्तानात हे असले प्रकार अजिबात नवीन नाहीतच म्हणा! यापूर्वीही कथित ईशनिंदेच्या आरोपांवरून कायदा धर्मांधांनी हातात घेऊन संबंधितांना जीवानीशी संपवल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. खरं तर पाकिस्तानमधील ईशनिंदेचा कायदाही तितकाच कडक. परंतु, कायद्याच्या माध्यमातून न्यायाची प्रतीक्षा करण्याऐवजी धर्मांधांकडूनच कायदा हातात घेऊन ईशनिंदा करणार्‍यांची निर्घृण हत्या केली जाते. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे, २०२३ मध्ये ईशनिंदा करणार्‍यांपैकी जवळपास ८५ टक्के हे इतर पंथीय मुस्लीम, नऊ टक्के अहमदी आणि ४.४ टक्के ख्रिश्चन असल्याचे आकडेवारी सांगते.

खरं तर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची वर्षागणिक लोकसंख्या घटण्यामागे या अशा धार्मिक, वांशिक दंगली सर्वार्थाने जबाबदार आहेत. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ दोन टक्के हिंदू आणि १.१४ टक्के ख्रिश्चन. त्यातही बहुसंख्य ख्रिश्चन हे गरीब, मागास असून सफाई कामगार, मैला कामगार अशी कामे खास त्यांच्याचसाठी राखीव असतात. त्यातही यंदा ज्या ख्रिश्चन व्यक्तीवर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला, तो अशिक्षित असल्याचे समजते, तरीही संबंधित ख्रिश्चन व्यक्ती आणि त्याच्या मित्रावर ’एफआयआर’ दाखल करून अटकही करण्यात आली. परंतु, हे एवढेच निमित्तमात्र ठरले आणि युरोपातील कुराण जाळण्याच्या घटनांचा राग हा असा चर्च आणि ख्रिश्चनांची घरं जाळून व्यक्त झाला.

त्यात पाकिस्तानमध्ये सध्या काळजीवाहू सरकार कार्यरत असून, प्रशासन, पोलीस आणि लष्करावर कोणाचे नियंत्रण नाही. अशा परिस्थितीत ईशनिंदेच्या कथित आरोपांखाली धर्मांधांकडून पेटवलेल्या वांशिक दंगली या सर्वस्वी निंदनीयच. तेव्हा, ‘तुम्ही आमचे कुराण जाळले, आम्ही तुमचे चर्च, घरदार जाळू’ अशी ही हिंसक मानवीनिंदा ईशनिंदेपेक्षा केव्हाही घातकच!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची