मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘देखणा नट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेकविध भूमिका उत्तम साकारल्या आहेत. सिनेक्षेत्रात असणार्या कलाकारांची एक इच्छा असते, ती म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची. वैभवची ती इच्छादेखील पूर्ण झाली. इतकेच नव्हे तर त्याच्या अभिनयासाठी शाबासकीची थापदेखील कमावली. असा हा वैभव आता ‘कमांडो’ वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानिमित्ताने अशा या हरहुन्नरी कलाकाराशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा...
तू एका वेगळ्या क्षेत्रात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहेस. त्याविषयी काय सांगशील?
’मेटलर्जिकल’ अर्थात ’धातुशास्त्र इंजिनिअरिंग’चं शिक्षण मी घेतलं. मुळात मला पुण्यामधील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधूनच शिक्षण घ्यायचं होतं आणि माझ्या अॅडमिशनच्यावेळी त्या कॉलेजमध्ये जी शाखा उपलब्ध होती, ती ’मेटलर्जिकल’ची होती. त्यामुळे मी त्या क्षेत्रात प्रवेश घेतला. मला इंजिनिअरिंग करायचं, हे माझं ठरल्यामुळे उपलब्ध असलेल्या क्षेत्रात मी इंजिनिअरिंग केलं.
एकीकडे इंजिनिअरिंगचं शिक्षण, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर तू बॅडमिंटनही खेळला आहेस. मग पुढे क्रीडा क्षेत्रातच करिअर करायचा विचार का नाही केलास?
खरं तर बॅडमिंटन आणि नाटक मी एकाच वेळी करत होतो. झालं असं की, मला एका क्षणासाठी बॅडमिंटनमध्ये करिअर करावं, असं वाटलं होतं. पण, त्यानंतर जेव्हा मी सामने हरायला लागलो, त्यानंतर मला असं जाणवायला लागलं की, जितक्या उत्साहाने मी रंगभूमीवर जाण्यासाठी किंवा नाटकांच्या तालमीसाठी जातो, तो उत्साह किंवा तितकाच आनंद मला बॅडमिंटन कोर्टवर जाताना होत नाही. त्यामुळे मी असं मानतो की, नेहमी त्या रस्त्यावर चाला, जिथे तुम्ही पडलात, अडखळलात तरी तुम्हाला उठून, त्याच रस्त्यावर चालायची पुन्हा इच्छा असली पाहिजे आणि तो रस्ता माझ्यासाठी रंगभूमीचा होता.
रंगभूमीनंतर मग अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला आणि काही काळानंतर तू मालिकांपासून दूर का झालास?
नागपूरमध्ये असतानाच माझा अभिनयाचा प्रवास खरं तर सुरू झाला होता. पण, ज्यावेळी मी पुण्यात इंजिनिअरिंगसाठी प्रवेश केला, त्यावेळी मला मार्गदर्शन करणार्या उत्तम व्यक्ती भेटल्या. त्यामुळे पुण्यातली ती चार वर्षं फार छान गेली. म्हणजे ते कॉलेज माझ्यासाठी अभिनयाची संस्था बनली. नाटकांशी निगडित फार मोठ्या कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच माझा अभिनय फुलत गेला आणि आता मालिकेचा मुद्दा, तर ’झी मराठी’ वाहिनीवर ’तुझं माझं जमेना’ ही मांजरेकरांची मालिका होती. आणि त्यावेळी मांजरेकरांनी मला सांगितलं की, १२० एपिसोडच करणार आहे आणि त्याच कारणामुळे अभिनेत्री रिमा लागू यांनीही होकार दिला होता. त्यामुळे इतक्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी न सोडता मी मालिका केली. पण, त्यानंतर माझा ‘कॉफी आणि बरचं काही’ या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. दुसरं एक की, मला सर्व माध्यमांसाठी समान आदर आहे. त्यामुळे कलाकार म्हणून माध्यमांनुसार मी आजवर अभिनय करत आलो आहे.
रंगभूमीवरील अभिनयाचा अनुभव गाठीशी असल्याने मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करताना हा अनुभव कसा कामी आला?
रंगभूमीवरील अनुभवाचा मला निश्चितच चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना प्रचंड फायदा झाला. ज्यावेळी कलाकार नाटकांमध्ये काम करतात, त्यावेळी ते एक परिपूर्ण अभिनेते किंवा नट म्हणून बाहेर पडतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, ‘थिएटर ते कॅमेरा’ असा प्रत्येक नटाचा एक वेगळा प्रवास असतो. काही तांत्रिक गोष्टी कलाकारांना समजून घ्याव्या लागतात, ज्यावेळी ते नाटकांकडून चित्रपटाकडे वळतात. नाटकांमधून माझ्या अभिनयाची सुरुवात झाल्यामुळे, पुन्हा रंगभूमीवर येण्याची ओढ तर आहेच आणि जर का नाटक केलं, तर त्याचे प्रयोग सातत्याने होणं गरजेचं आहे. कारण, तसं नाही झालं, तर निर्मात्याचं नुकसान होतं, बॅकस्टेज आर्टिस्टचं नुकसान होतं आणि जर का वेळेअभावी मी प्रयोगांच्या तारखा पूर्ण करू शकलो नाही, तर माझ्यामुळे इतक्या जणांना नुकसान होईल, याचा विचार करून तूर्तास हा विचार बाजूला ठेवला आहे. पण, जर का संधी आली एखादं नाटक करण्याची तर मी नक्की करेन. मला आठवतं की, माझी एक एकांकिका होती ‘खेळ मांडला’, तर त्यातील प्रमुख पात्राच्या अंगात भूतं शिरतात आणि त्यानंतर धमाल घडते, तर अशा वेगळ्या धाटणीचं नाटक मला करायला आवडेल.
महाविद्यालयात सादर केलेल्या एकांकिकेच्या काही खास आठवणी अजून लक्षात आहेत का?
माझी पहिली एकांकिका ‘फिरोदिया करंडक’ म्हणून पुण्यात स्पर्धा होती. त्यात ‘समेवर टाळी’ ही एकांकिका सादर केली होती. ज्यात मी पुण्यात सदाशिव पेठेत राहणार्या अभि परांजपेची भूमिका साकारली होती. मी नागपूरचा असल्यामुळे माझी भाषा वेगळी होती, मला पेठेतल्या अभिची भाषा अजिबात जमत नव्हती आणि त्यात मला ‘ळ’ बोलण्याची अडचण... अशा एकामागून एक अनेक अडचणी या एकांकिकेच्या वेळी येत होत्या. त्यामुळे एक कलाकार म्हणून माझा आत्मविश्वास खचला. पण, माझ्या वरिष्ठांनी मला मार्गदर्शन केले आणि त्यानंतर थेट चौथ्या वर्षी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि आमच्या एकांकिकेलाही सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिक मिळाले होते. तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता.
’बाजीराव मस्तानी’, ’मणिकर्णिका’ या हिंदीतील ऐतिहासिक चित्रपटांमध्येही तू भूमिका साकारल्या. तो अनुभव कसा होता? आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी तुझं खास कौतुकही केलं होतं. तो किस्सा काय होता?
हिंदी कलाकारांसोबत काम करतानाचा अनुभव फार सुखद होता आणि भन्साळी सरांसोबतचा किस्सा सांगायचा, तर माझा आणि रणवीर सिंगचा एक सीन होता. तो झाल्यानंतर भन्साळी सर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला मिठी मारत माझं कौतुक केलं. भन्साळी सर सहसा कुणाचे कौतुक करत नाहीत. पण, त्यादिवशी त्यांनी मला जी मिठी मारली, त्यात मी अभिनेता म्हणून किंचित अभिमानाने आणखी माझ्याच नजरेत उंचावलो.
तुला तेलुगू भाषाही बोलता येतं. ते नेमकं कसं?
आम्हा मित्रांचं असं ठरलं की, कोणती तरी वेगळी भाषा शिकायची. काही जणांनी फ्रेंच, जर्मन अशा परदेशी भाषा शिकण्यास सुरुवात केली. पण, मी म्हटलं की, मी भारतीय भाषाच शिकणार. त्यावेळी मी कामानिमित्त हैदराबादला गेलो होतो आणि तेथील लोकं माझ्याशी तेलुगू भाषेतच संवाद साधायचे. त्यांना बहुतेक मी तिथलाच वाटायचो, असे माझा मित्र मला गमतीत म्हणाला आणि मग मी डोक्यात ठेवून ती भाषा शिकलो.
’कमांडो’ या वेब सीरिजमधल्या तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील आणि या भूमिकेसाठी वर्दी अंगावर चढवल्यानंतर मनात काय भावना होत्या?
’कमांडो’ या वेब सीरिजमध्ये मी कमांडो क्षितिज मेहरा ही भूमिका साकारली असून, मी एक गुप्तहेर आहे, जो पाकिस्तानात जाऊन त्यांचा भारताविरोधातील कट उधळून टाकण्यासाठी तिथे गेला आहे. कमांडोची ही भूमिका साकारताना देश आणि सैनिकांबद्दलचा आदर अधिकच वाढला. कारण, आर्मीमधील सैनिक आपलं कुटुंब सोडून तिथे सीमेवर तैनात होऊन आपले रक्षण करत असतात. त्यामुळे त्यांनाही वैयक्तिक जीवन आहे, हे न विसरता आपणही भारताचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, या भावना माझ्या मनात नक्कीच आल्या.