‘जंगल वाचवा’ संदेश देणारा वनसंरक्षक

    17-Aug-2023
Total Views | 128
Ravindra Falak


निसर्गाचे बालपणापासून आकर्षण असलेल्या रवींद्र फालक यांनी या कार्यात रमताना माणसाला जंगल, प्राणीसृष्टी वाचविण्याचा संदेश दिला. त्यांच्या या जीवसृष्टी संवर्धनाच्या कामाचा आढावा घेणारा हा लेख...

लहानपणापासूनच मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात जन्मलेल्या रवींद्र यांना निसर्गातील जीवसृष्टीचे कुतूहल वाटू लागले. त्यानंतर वडिलांच्या नोकरीमुळे भुसावळ येथे आलेल्या रवींद्र यांना निसर्ग सान्निध्याची जणू पर्वणीच लाभली. प्राथमिक शिक्षण घेऊन जळगावला आलेल्या रवींद्र यांना ही जीवसृष्टी खुणावत होती. काहीही माहिती नसताना ते साप पकडून शाळेत आणायचे. छोटे कीटक, पक्षी, प्राणी यांबद्दल कुतूहल असलेल्या रवींद्र यांनी मेहरून तलाव पोहून तेथील साप पकडण्यासही मागेपुढे बघितले नाही. नंतरच्या शिक्षणासाठी ते पुन्हा मुंबईत परतले. मात्र, ही आवड त्यांनी कायम जोपासली. १९८२ मध्ये त्यांनी ’नेचर क्लब’मध्ये सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू केले. ‘नेचर ट्रीप’मध्ये ते सहभागी होत होते. सृष्टीतील प्रत्येक जीव वाचविला, निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहील, असे त्यांचे प्रत्येकाला आवर्जून सांगणे आहे.

सध्या रवींद्र फालक उद्योजक म्हणून आपला व्यवसाय सांभाळतात. मात्र, गेल्या ३० वर्षांपासून वन्यजीव अभ्यासक म्हणून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात वने आणि वन्यजीव संरक्षण कार्यात सक्रिय सहभागी आहेत. सद्यःस्थितीत ’वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्थे’चे आणि ‘लघुउद्योग भारती, जळगाव’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, जळगाव जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आहेत. तसेच, ’मुक्ताई भवानी व्याघ्र संचार मार्ग संचालन समिती’, ’धुळे वनवृत्त वनविभाग, महाराष्ट्र’ या समितीचे सदस्य आहेत आणि व्याघ्र कॉरिडोरवर अभ्यास करत आहेत. राज्य शासनाने रवींद्र फालक यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना जळगाव जिल्ह्याचे ’मानद वन्यजीव रक्षक’ ही मोठी जबाबदारी दिली असून, ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी फालक सतत प्रयत्नशील असतात.
 
‘वन्यजीव संरक्षण संस्थे‘च्या माध्यमातून ‘उत्तर महाराष्ट्र शून्य सर्पदंश अभियान‘ राबविताना आतापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांद्वारे चार लाख लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यात आली आहे, हे अभियान अद्याप सुरू आहे. ‘मानव वन्यजीव संघर्ष बचाव आणि उपाययोजना’ हा विषय घेऊन सातपुड्यातील दुर्गम भागासह, प्रत्येक वनक्षेत्रास लागून असलेल्या गावागावात जनजागृती कार्य सुरू आहे. ‘लोकसहभागातून वनसंवर्धन’ हा मुख्य उद्देश असल्याने जास्तीत जास्त गावकर्‍यांना सोबत जोडता यावे, यासाठी ते दुर्गम भागात आरोग्य शिबीर, चटई वाटप, कपडे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, असे उपक्रम राबवत असतात.

रवींद्र फालक सर्पमित्रदेखील आहेत. गेल्या ३० वर्षांत त्यांनी दहा हजारांपेक्षा जास्त सापांचा जीव वाचवला असून, पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने जखमी सर्प, वन्यजीव, पक्षांवर उपचार करून त्यांना वनविभागाच्या निगराणीत निसर्गात मुक्त करत असतात. पट्टीचे पोहणारे असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रशिक्षित जीवरक्षक स्वयंसेवक म्हणून ते सेवा देत असतात. ‘एमआयडीसी’मध्ये विविध ठिकाणी खुल्या भूखंडांवर जवळपास सहा एकर जागेवर वृक्षारोपण व एका खुल्या भूखंडावर मियावाकी जंगल उभारले आहे. आता ते जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ‘बीडीओं’ना आमंत्रित करून आपापल्या तालुक्यात मियावाकी जंगल निर्माण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करत असतात. प्लास्टिक उद्योगात असल्याने प्लास्टिकचे उपयोग आणि दुष्परिणाम याबद्दल सखोल माहिती असल्याने टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्याचा आपल्या उद्योगात वापर करण्यावर त्यांचा भर आहे.

२०१५ मध्ये मेळघाटातील सिपना शोध यात्रेदरम्यान नदीच्या उगमापासून तापीला मिळेपर्यंत पायदळ यात्रा केली आहे. त्याच प्रेरणेने प्रेरित होऊन जिल्ह्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुक्ताई भवानी अभयारण्य, यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यातील दुर्गम भागात करत असलेल्या जनजागृतीमुळे जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे लोकसहभागातून वनसंवर्धन कार्यास बळकटी आली आहे. रवींद्र फालक यांच्या प्रयत्नातून मुक्ताई भवानी अभयारण्य क्षेत्रातील गाभा क्षेत्रातील डोलार खेडा आणि वायला या गावातील शेतकरी आपली जमीन देण्यास विस्थापित होण्यास तयार झाले आहेत.
 
‘लघु उद्योग भारती’चे अध्यक्ष असल्याने जळगाव औद्योगिक वसाहतीत रवींद्र फालक यांच्या पुढाकाराने मियावाकी जंगल निर्माण केले आहे. सहा हजार झाडांचे रोपण करून सर्व झाडे जगवली आहेत. त्याचबरोबर जळगाव वनविभागाच्या परवानगीने एरंडोल वनक्षेत्रातील हनुमान खोरे भागात ३० लाख लीटर साठवण क्षमतेचे बंधारे लोकसहभागातून तयार केले आहेत. याच भागात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जळगावातील उद्योजक बांधवांच्या सहकार्याने मियावाकी जंगल आणि फुलपाखरू उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जळगाव ,धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांत फालक सरांच्या माध्यमातून ४०० पर्यावरण कार्यकर्ते जोडले गेले आहेत. भविष्यात सातपुड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर करण्यासाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी निवासी पर्यावरण संस्कार केंद्र उभारून त्यात ‘अरण्य वाचवा’सारखे उपक्रम राबविण्याचा रवींद्र फालक यांचा मानस आहे. भविष्यातदेखील या कार्यात सक्रिय राहण्याचा त्यांचा निर्धार असून, शेतात वापरात असलेल्या कीटकनाशकाविरोधात लढा ते देत आहेत, यामुळे देशात कर्करोग रुग्णसंख्या वाढत आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या विधायक कार्यास दै.’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
 
-अतुल तांदळीकर

(अधिक माहितीसाठी संपर्क: ९४२३१८५८३८)


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121