काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सायंकाळी दिल्ली लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये एकमताने दिल्लीच्या सातही जागा लढविण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्येच काय; पण केजरीवाल यांच्यासोबत देशभरात कोठेही सहकार्य करू नये, असा आग्रहही अनेक नेत्यांनी राहुल गांधी आणि खर्गे यांच्याकडे धरल्याचे समजते.
भाजपविरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या प्रारंभी बैठकांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल हे अतिशय उत्साही होते. अर्थात, त्यांचा हा उत्साह केवळ दिल्ली सेवा विधेयकापुरताच होता. त्यामुळे पाटणा येथे झालेली पहिली बैठक आणि बंगळुरू येथे झालेली दुसरी बैठक यामध्ये केजरीवाल सहभागी झाले. त्या बैठकांमध्ये केजरीवाल यांनी भाजपविरोधी आघाडीपेक्षा दिल्ली सेवा विधेयकावर सर्व विरोधी पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, हा आग्रह धरला होता. त्यामुळे पाटणा आणि बंगळुरू अशा दोन्ही बैठकांमध्ये केजरीवाल हे नाराज होऊन निघून गेले होते. कारण, केजरीवाल यांचा हा आग्रह कोणत्याच पक्षाला रूचलेला नव्हता. काँग्रेसने तर ही आघाडी राज्यस्तरीय पक्षांसाठी नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, तरीदेखील केजरीवाल यांनी काँग्रेसने या विधेयकासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा, असा आग्रह सोडला नव्हता.
अर्थात, असे करण्यामागे केजरीवाल यांचे दोन हेतू होते. पहिला हेतू म्हणजे विरोधी पक्षांना एकत्र करून विधेयकास नामंजूर करवून घेणे. मात्र, तसे करणे अजिबात सोपे नसल्याची केजरीवाल यांनाही जाणीव होती. कारण, भाजपने अतिशय सुयोग्य ’फ्लोअर मॅनेजमेंट’ अगोदरच करून ठेवले होते. त्यामुळे दुसरा हेतू साध्य करण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न होता. तो हेतू म्हणजे दिल्ली सेवा विधेयकाच्या नावाखाली ‘इंडिया’ आघाडीच्या केंद्रस्थानी येणे. केजरीवाल यांचा तो हेतू काँग्रेसने व्यवस्थित ओळखला होता. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केजरीवाल यांना ठोस आश्वासन देण्यास टाळाटाळ करत होते, तर माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा विधेयक मंजूर होऊन त्यास राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये आप विरुद्ध काँग्रेस या संघर्षाला पुन्हा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत होणार्या ‘इंडिया’ बैठकीमध्ये केजरीवाल सहभागी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची काँग्रेसची घोषणा.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सायंकाळी दिल्ली लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये एकमताने दिल्लीच्या सातही जागा लढविण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्येच काय; पण केजरीवाल यांच्यासोबत देशभरात कोठेही सहकार्य करू नये, असा आग्रहही अनेक नेत्यांनी राहुल गांधी आणि खर्गे यांच्याकडे धरल्याचे समजते. बैठकीनंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले की, ‘’दिल्लीतील सात जागा काँग्रेसच लढवणार आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत केजरीवाल यांनी काँग्रेसलाच लक्ष्य केले आहे. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाने काँग्रेसच्याच मतांना सुरूंग लावण्याचे काम सातत्याने केले आहे. सध्या तर त्यांच्या पक्षाचे दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. एवढेच नव्हे तर लवकरच कदाचित मुख्यमंत्र्यांनाही तेथेच जावे लागू शकते.” त्यामुळे असे असताना दिल्लीतील सातही जागांची काँग्रेस पक्षातील जनाधार असलेल्या नेत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरल्याचे लांबा यांनी सांगितले आहे.
लांबा यांच्यानंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनीदेखील केजरीवाल आणि ‘आप’वर टीका केली. ते म्हणाले की, ‘’आम आदमी पक्ष म्हणजे मूर्खांची फौज आहे. ते दिवसभर खोटे बोलतात आणि ब्लॅकमेलिंग करून जगतात. त्यांची हीच कार्यशैली असून, अशा लोकांसोबत काँग्रेस पक्ष आघाडी करू शकत नाही. त्याचप्रमाणे कोणताही राजकीय पक्ष हा निवडणुकीसाठी सर्वच जागांसाठी तयारी करत असतो. त्यामुळे आघाडीच्या करण्याच्या नावाखाली आम्ही केवळ नवी दिल्ली मतदारसंघासाठी तयारी केली आणि जागावाटपामध्ये चांदनी चौक मतदारसंघ आमच्या वाट्याला आला, तर ते चालणार नाही. त्यामुळे ‘आप’सारख्या मूर्ख लोकांसोबत काँग्रेसला आघाडी करण्याची गरज नाही. फसवणूक हीच त्यांची आणि त्यांच्या पक्षाची ओळख आहे. फसवणुकीतच व्यस्त असल्याने केजरीवाल यांना सर्व जगच त्यांना फसवते आहे, असे वाटते. हे लोक एवढे मूर्ख आहेत की, मोटारीचे टायर फुटले तरीही गोळीबार झाल्याचा कांगावा करतात.” दीक्षित केवळ एवढेच बोलून थांबले नाही, तर त्यांनी अलका लांबा यांचेही समर्थन केले.
लांबा आणि दीक्षित यांच्या लागोपाठच्या हल्ल्यानंतर ‘आप’कडूनदेखील ‘इंडिया’ आघाडीची आता गरज राहिली नसल्याचा पलटवार करण्यात आला आहे. ‘इंडिया’ आघाडीत राहायचे की नाही, मुंबईतील बैठकीत सहभागी व्हायचे की नाही, हा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते लवकरच घेतील. मात्र, अशाप्रकारे मतभेद होणे, ही तर सुरुवात आहे. कारण, ‘इंडिया’ आघाडीमधील प्रत्येक पक्ष आपले अस्तित्व कायम ठेवण्यावर ठाम आहे. ज्याप्रमाणे आणीबाणीनंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केवळ जनता पक्षाच्या नावाखाली निवडणूक लढवून यश मिळवले होते, तसे आता शक्य नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प. बंगालच्या मुख्यमंत्री आपल्या राज्यात अन्य कोणत्याही पक्षाला प्रवेश करू देणार नाही, त्याचप्रमाणे तामिळनाडूतदेखील द्रमुक अन्य कोणास सहकार्य करणार नाही. त्याचवेळी या सर्व पक्षांवर कुरघोडी करण्याची संधी काँग्रेस सोडणार नाही. त्यामुळे केजरीवाल यांनी ‘इंडिया’ आघाडीमध्ये विरोधाचा दुसरा सूर आळवण्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधाचा पहिला सूर डाव्या पक्षांनी यापूर्वीच प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे सांगून आळवला आहेच.
दुसरीकडे मध्य प्रदेशात होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. कर्नाटकमध्ये मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसच्या उत्साहात वाढ झाली आहे, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशातही ‘५० टक्के कमिशनवाली सरकार’ असाच प्रचार करण्यास काँग्रेसने प्रारंभ केला आहे. मध्य प्रदेशात प्रचारात राहुल गांधी अद्याप तरी सक्रिय झालेले नाहीत. मात्र, प्रियांका गांधी-वाड्रा या कमलनाथ यांच्या साथीने प्रचारात उतरल्या आहेत. उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रियांका यांना राजकारणात नव्याने लाँच करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात तर प्रियांका यांना सपशेल अपयश आले होते, त्यामुळे मध्य प्रदेशात यश मिळते की, राहुल गांधींप्रमाणेच पुन्हा नव्याने लाँच व्हावे लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसने यावेळी हिंदुत्वाची कास धरल्याचे भासवण्यास प्रारंभ केला आहे. कारण, पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी काँग्रेसचे ‘सॉफ्ट हिंदुत्व’ असल्याची भाषा बोलण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघात सध्या प्रसिद्धीच्या झोतात असणार्या बागेश्वर धाम सरकार यांच्या कथावाचनाचाही कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचप्रमाणे भस्म वगैरे लावून आणि गळ्यात रुद्राक्षमाळा घालून उज्जैन येथे महाकालेश्वराचे दर्शन घेतल्याचेही फोटो कमलनाथ यांनी व्हायरल केले आहेत. त्याचवेळी दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांचे हिंदुत्वाचे धोरण काँग्रेससाठी योग्य नसल्याचे सांगितले आहे. अर्थात, सध्या राजकीय गरज असल्याने काँग्रेस नेतृत्वाने कमलनाथ यांना हिंदुत्ववादी भूमिका मांडण्यास परवानगी दिल्याचे दिसते. अर्थात, कमलनाथ यांची ही भूमिका राहुल गांधी यांच्या एखाद्या आचरट विधानाने कशी वाया जाते, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.