मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात सवतासुभा घेत बंडखोरी केली. पण बंड करून आठ दिवस होताच अख्खा गटाला सोबत घेत काकांची एकदा नव्हे तर दोनदा भेटही घेतली. जाहीरपणे घेतलेल्या या भेटींमुळे पवार काका पुतण्यात काही तरी सुरु असल्याच्या चर्चा अपेक्षेप्रमाणे सुरु झाल्या होत्या. त्यातच परवा पुण्यात अजित दादा आणि शरद पवारांमध्ये झालेल्या त्या कथित 'गुप्त' भेटीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होऊ शकते. काका पुतण्याच्या भेटीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गट सावध झाला असून त्यांनी या भेटीगाठींवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांतील संदिग्ध हालचाली महाविकास आघाडीच्या मुळावर उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादीच्या पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि दादा गटाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या गेल्या महिनाभरात एकूण चार वेळा भेटी झाल्या. जुलै महिन्यात बंडखोरी होऊन आठवडा होण्यापूर्वी आणि विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना दादा गट यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन पवारांना भेटून आला. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दादांनी सहकुटुंब सिल्व्हर ओकवर हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यानंतरही अजित दादा आणि शरद पवारांची विमानतळावर भेट झाल्याची माहिती आली होती. या पार्श्वभूमीवर परवा कोरेगांव पार्कमधील अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर झालेली शरद पवार-अजित पवार-जयंत पाटलांची भेट राजकारणासोबतच महाविकास आघाडीसाठीही तितकीच महत्त्वाची बनली आहे.
काका पुतण्याच्या भेटींवरून काँग्रेस - ठाकरे गटात अस्वस्थता
पुण्यातील या भेटीमुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. नुकतीच नाना पटोले आणि उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही कथित गुप्त बैठकीवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. खासदार संजय राऊत यांनीही 'सामना'तून थेट शरद पवारांवर निशाणा साधत भीष्म पितामहांकडून अशी अपेक्षा नाही असे म्हणत तोफ डागली होती. दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गटाने राष्ट्रवादीतील या संदिग्ध घडामोडींवरून वेगळी रणनीती आखण्याची तयारी दर्शवली असून शरद पवार गटाला वगळून निवडणुका लढवण्याची तयारी केल्याचे ठाकरे गटातील एका नेत्याने म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काका पुतण्याच्या बैठका महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.