तलाठी परिक्षेसाठी ठाण्यातील दोन परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश
15-Aug-2023
Total Views | 54
ठाणे : महसूल विभागाच्या गट "क" संवर्गातील तलाठी भरती परीक्षा - २०२३ दि.१७ ऑगस्ट ते १४ स्प्टेंबर २०२३ पर्यंत १९ दिवस ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण ०२ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रात आयोजित करण्यात आली असून या परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अशी माहिती ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.
उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करणे, परिक्षेस व्यत्यय आणण्याची व गैरप्रकार करण्याची शक्यता आहे. परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी खेरीज करुन परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव करण्यास तसेच झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, ही दुकाने वा त्यांच्या सेवा बंद ठेवण्याबाबत व मोबाईल फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
विभागातील प्राधिकृत केलेले पोलीस अधिकारी, तसेच परीक्षा केंद्रावरील संबधित प्राधिकृत अधिकारी/ कर्मचारी, परीक्षेस बसलेले उमेदवार यांच्याखेरीज अन्य व्यक्तींना उपकेंद्रावर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यावर “महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ऍक्ट युनिर्व्हसिटी बोर्ड ऍन्ड अन्डर स्पेसिफाईड एक्झामिनेशन ॲक्ट १९८२ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ८ वाजेपर्यंत अंमलात राहतील, असे पोलीस उपायुक्त डॉ. परोपकारी यांनी सांगितले.