भारताला स्वातंत्र्य मिळावं, यासाठी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतलेल्या अनेकांसोबतच मिळवलेलं स्वातंत्र्य अबाधित राहावं, स्वातंत्र्याचा अर्थ लोकांस समजावा, यासाठी झटणारीही अनेक थोर व्यक्तिमत्त्वे होती. या अनेकांपैकी एक म्हणजे लेखक, संपादक, शिक्षक आणि समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर. त्यांच्या विचारवाङ्मयाची ही चिकित्सा...
रामसेतू बांधण्याचे कार्य जेव्हा वानरसेना करत होती, तेव्हा ‘आम्ही काय मदत करू,’ असे खारुताई विचारायला आली आणि तेव्हापासून ‘खारीचा वाटा’ हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. स्वातंत्र्यचळवळीत भारतीयांचे योगदान पाहताना आपणही केवळ लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या काही थोर स्वातंत्र्यसेनानींची नावे प्रामुख्याने घेतो. परंतु, असे अनेक समाजघटक आहेत, ज्यांनी आडवाटेने आपापल्यापरीने कार्य करत स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. त्यात लेखक आहेत, साहित्यिक, कलाकार, शाहीर, शिक्षक, समाजसुधारक असे अनेक. यात दुर्लक्षित होऊ नये, असे एक नाव म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. त्यांची ढोबळमानाने ओळख ‘केसरी’चे संपादक, समाजसुधारक आणि टिळकांचे परम मित्र इतकीच आहे. आज त्यांच्या कार्यापेक्षा त्यांनी जो विचार मांडला, त्यावर चर्चा व्हायला हव्यात.
आगरकर समाजसुधारक, शिक्षक किंवा लेखक म्हणून नव्हे माणूस म्हणून आपल्याला माहितीयेत का? आगरकर अल्पायुषी ठरले, हे खरंतर तत्कालीन समाजाचे दुर्दैव. एखादं व्यक्तिमत्त्व आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतं, ते त्याच्या विचारातील वैविध्यामुळे. त्यांचे विचार अतिशय पुरोगामी आणि धर्मनिष्ठ होते. त्या काळात हिंदू समाजाला गतिमान समाजाचा भाग बनवण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली. त्या विचारांत नवकल्पनांची क्रांतीशी आणि सद्सद्विवेकबुद्धीशी घातलेली सांगड इतकी स्पष्ट आणि उजवी होती की, त्यानंतर कित्येक पिढ्या, कित्येक स्तरांवर तरुणांना आगरकरांच्या विचारांनी प्रभावित केले.
समाजसुधारणेबाबत त्यांचं एक तत्त्व होतं. समाज सुधारल्याशिवाय केलेली राजकीय चळवळ कुचकामी आहे, असे त्यांचे ठाम मत होते. आजच्या समाजाकडे पाहिल्यावरसुद्धा त्यांच्या विचारातील सत्यतेची प्रकर्षाने प्रचिती यावी. यातून पुढे त्यांनी समाजप्रबोधन आणि लोकशिक्षण असे दोन वेगवेगळे धागे समजावून दिले. समाज प्रबोधन करताना कोण्या एकाच विचारसरणीचा प्रभाव जनतेवर पडत असतो. तो लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशिक्षण व्हायला हवे. विचार करता येण्याइतके शिक्षण जनतेला मिळायला हवे. यातून त्यांनी पुढे शैक्षणिक चळवळ सुरू केली. केवळ विद्यार्थी घडवून उद्याची पिढी तयार होईल; मात्र आजच्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रीय लेखन सुरू केले. ‘केसरी’ व्यतिरिक्त इतर अनेक माध्यमांतून त्यांनी लेखन केले. ’केसरी’ त्यानंतर लोकमान्य टिळक पाहू लागले.
आगरकर आणि टिळकांचे वाद आणि त्या वादांच्या आडून असलेला त्यांचा एकमेकांप्रतीचा जिव्हाळासुद्धा सुपरिचित. पण, यामागचे कारण आपल्याला माहितीये का? भारत भूमीवरील कोणत्याच जीवाला गुलामीत राहावे लागू नये, यासाठी टिळकांची तळमळ होती. आगरकरांची भूमिका मात्र नेहमीच सामाजिक होती. मिळवलेलं स्वातंत्र्य आपल्या अशिक्षित, अर्धशिक्षित, जाती-धर्माच्या जोखडात अडकलेल्या जनतेला पेलवणार आहे का? उद्या आपल्या स्वतंत्र भारतातील नागरिक पारतंत्र्यातच जगू नये, यासाठी लोकशिक्षणाची धुरा त्यांनी हाती घेतली. ज्यांना ध्येय असतात आणि ध्येयांमागे तत्त्व असतात, त्यांची मते बदलणे कठीण मग अशा सुखलोलुप व्यक्तींच्या तत्त्वांचीच पुनर्बांधणी करण्याचा त्यांनी चंग बांधलेला त्यांच्या लिखाणातून दिसतो. आगरकर केवळ बुद्धिवादी नव्हते, बुद्धीने जगातील सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होत नाही. परंतु, नवे ज्ञान मिळवताना ते पचवायचे झाल्यास बुद्धीची नितांत आवश्यकता आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ’सत्यशोधनाची सतत धडपड हेच मानवी जीवनातील शाश्वत मूल्य आहे, हे त्यांच्या बुद्धिवादी भूमिकेचे अधिष्ठान होते,’ असे गणेश प्रधान त्यांनी संपादित केलेल्या आगरकरांच्या लेखसंग्रहाबाबतीत म्हणतात.
आपल्या भोवताली असणार्या व्यक्तींना आपल्याकडे असलेले वैचारिक दान देऊन जगाकडे डोळसपणे पाहायची दृष्टी आगरकरांच्या लेखणीने दिली. आज शेकडो वर्षांनंतरही ही दृष्टी देण्यामागची कारणे जाणून घेणे गरजेचे वाटते. आगरकरांनी केवळ स्वातंत्र्य आणि समाजसुधारणेचा ध्यास घेतला नव्हता, तर त्यांना सामाजिक सुख अभिप्रेत होते. माणूस समाजप्रिय प्राणी आहे, असे आपण म्हणतो. तो स्वतःच्या स्वार्थासाठी व प्रगतीसाठी सामाजिक नात्यांमध्ये स्वतःला जखडून घेतो. या नात्यांचा त्यांच्यावर जसा योग्य परिणाम होतो, तसा अयोग्यावरही होऊ शकतो आणि म्हणूनच स्थितिप्रिय किंवा रुढीप्रिय राहण्यापेक्षा गतिमान जीवनाचा ध्यास घ्यावा, हे त्यांच्या लेखनातील सार आहे, असे मला वाटते. एखाद्या व्यक्तीचे सुख समाजसापेक्षच असते, त्यावर समाजाचे हितही अवलंबून असते. त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ यात समतोल असायला हवा. तो कसा साधावा, या क्लिष्ट प्रश्नाचे उत्तर अंधुकपणे का होईना, आगरकर वाचताना ध्यानी येत राहते.
स्त्रियांवर होणार्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला, त्यामुळे त्यांची तत्कालीन समाजाकडून निर्भत्सना झाली, अगदी स्त्रियांकडूनही झाली. परंतु, ही गरज आहे, केवळ क्रांती नाही, हे पुढील सामाजिक स्थरांवर संवेदनशील समाजाला पटू लागले. आगरकरांना मृत्यूपश्चात काळ स्वीकारत गेला तो असा! त्यांचे पूर्वायुष्य अगदी हलाखीत गेले. परंतु, आपल्या बुद्धीवर सामर्थ्य मिळवत असतानाही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यापेक्षा समाजाचा विचारच त्यांनी केला. ही विरक्ती की, समाजप्रतीची आपुलकी? त्यांच्या अशा अनेक न उलगडलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या अजूनही शोधात राहावं, अशा अनेक खाचा खोचा त्यांच्या अभिव्यक्त होण्यात आहेत.
त्यांच्या लेखनातून त्यांनी भारताच्या आर्थिक परिस्थितीवर वेळोवेळी भाष्य केले आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारल्यास काही अधिकार प्राप्त होतात. शेवटी सत्ता ही वित्ताची गुलाम असतेच. भारतात पूर्वी स्वतंत्र संस्थाने होती, तेव्हा खेडी स्वयंपूर्ण होती. सर्व प्रकारचे आर्थिक चलनवलन त्या गावातून होत असे. आगरकर म्हणतात की, “हिंदुस्थानची राज्यसूत्रें खुद्द राणीसाहेबांनी हाती घेतल्यापासून इथले वित्त कृष्णपक्षातील चंद्राप्रमाणे क्षयास लागले असता व थोड्याच दिवसांत हिंदुस्थान देश कंगालतेच्या निबिड अंधकारात गडप होऊन जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली.” पुढे ते म्हणतात की, ‘’दारिद्य्र निरसन करण्याच्या कामातसुद्धा आम्हाला सरकारची मदत घ्यावी लागते की काय! सत्ता आणि वित्तंच परस्पर संबंध इथेही अधोरेखित होतो.” ब्रिटिशांच्या लुटमारीवर भाष्य करताना ते म्हणतात की, ’‘संग्रामरूप आगंतुक कारणाने युरोप खंडात ९७ वर्षांत जेवढी माणसे मेली, ती या देशात केवळ आठ वर्षांत तापाने मेली.” कराबाबत ते म्हणतात की, ’‘आजमितीस हजाराहून कमी उत्पन्न असल्याससुद्धा कर भरावा लागतो. हाच मुळी अन्याय आहे. तो कमी करणे सोडून वाढवण्याच्या उद्योगास सरकार लागेल, तर प्रजावात्सल्याची कमल म्हणावी.” इथे आगरकरांच्या काहीशा रटाळ आणि धीम्या भाषेवरून त्यांची मानसिकता किती नकारात्मक आहे, असे भासू शकेल. परंतु, भारतीय अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप लोकांच्या निदर्शनास आणणे, त्यांना अतिशय गरजेचे वाटत होते. लोकशिक्षण म्हणतात, ते हेच!
आपल्या बुद्धीस पटणारा प्रत्येक निर्णय आपण घ्यावा, जुनं ते सोनं म्हणून तेच कुरवाळत बसू नये, त्यातून जे घेण्यासारखे आहे, तेवढे स्वीकारून आजच्या समाजाचा अभ्यासपूर्ण विचार करून आपली तत्त्वे पुन्हा-पुन्हा तपासून पाहावीत, हे त्यांचे विचार आजही अमलात आणावे असे आहेत. त्यांचे विचार केवळ स्वानुभवांवर आधारलेले नव्हते, तर ते प्रयोगनिष्ठ होते. त्यांनी सामाजिक व्यवस्थेवर टीकात्मक लिखाण केले. परंतु, त्यातून स्पष्ट होणार्या त्यांच्या नाराजीला उपहासाची किनार केव्हाच नव्हती. त्यांची टीका सात्विक होती आणि म्हणून ती मला श्रेष्ठ वाटते. त्यांच्या टीकेपेक्षा टीका करण्याच्या पद्धतीची भुरळ मला जास्त पडते. त्यांचे लिखाण वेगळे होते, मोकळे होते, त्यात टिळकांच्या लेखणीतला भारदस्तपणा नव्हता की, सावरकरांच्या शब्दासारखे लालित्य नव्हते. परंतु, त्यात स्पष्टता होती. अंधारात प्रकाश निर्माण करण्याची शक्ती होती.
त्यांनी समाजसुधारणेचे कार्य हातात घेण्यापूर्वी समाजातील मूलतत्त्वांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांचे अफाट वाचन, त्यातून काढलेली टिपणे, ही मूल्ये आपल्या व्यवस्थेशी ताडून पाहिल्यानंतर नोंदवलेली निरीक्षणे महत्त्वपूर्ण ठरावी. या निरीक्षणे आणि वास्तवाचे दर्शन त्यांचा विचार प्रगल्भ करण्यास मदत करत. विचारांची तात्त्विक बैठक अशाप्रकारे स्पष्ट झाली की, मगच ते समाजासमोर अभिमुख होत. केवळ सामाजिक, आर्थिक बाबी दुरुस्त केल्यास समाज स्थावर होणार नाही, तर लोकांमधले परस्परसंबंध सुधारायला हवेत, असा त्यांचा आग्रह असे. सामाजिक सुधारणा हवी असल्यास समाजाच्या विचारात नीती आणि मूल्यांचे रोपण करायला हवे, हे खरेच. परंतु, इतरांसारखा कायदा करून हे शक्य नाही, तर जोवर लोकांना ही बाब पटत नाही, तोवर समाजसुधारणा शक्य नाही, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी स्वतःवर प्रेम करायला लोकांना शिकवले. परंतु, आत्मसंतुष्ट वृत्तीवर मात्र टीका केली आहे. सतत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला, ते सर्वांना देतात. ’इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार!’ या त्यांच्या उद्गारातून त्यांचा मनस्वी आणि तत्त्वनिष्ठ स्वभाव दिसून येतो.
त्यांचा ऐहिक वाद आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास केव्हातरी कारणीभूत होतो. परंतु, त्यांचा ऐहिक दृष्टिकोन केव्हाच भोगवादी नव्हता, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. आपल्या इच्छा, कामना, वासना यांची माणसाला केव्हाच लाज वाटू नये. उलट, त्यांचा विचार करूनच समाजस्वास्थ्याचा विचार आपण करायला हवा, तरच समाजाला स्थैर्य येईल. माणसाला मिळालेल्या नैसर्गिक देणगीचा असा अव्हेर करून माणूस केव्हाच सुखी होऊ शकणार नाही, तो नेहमीच असंतुष्ट राहील. जगातील सर्वच सुंदर गोष्टींचा रसिकतेने आस्वाद माणसाला घेता यायला हवा. त्यातूनच त्यांची निखळता जपली जाते. ही निखळ वृत्ती समाजासाठी अत्यंत मौल्यवान आहे. सर्व शारीरिक भौतिक आणि ऐहिक सुखांपेक्षा मानसिक सुख श्रेष्ठ, असे ते म्हणतात. तेव्हा त्यांच्या मऊ मनाची आपल्याला कल्पना करता येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी मांडलेला विचार आजही स्वीकारार्ह आहे. यावरूनच ते विचार किती वास्तवदर्शी होते, ते लक्षात येते. त्यांचा विचार राजकीय नव्हता, तर मानवतावादी होता. परंतु, हाच विचार समाजाला विचारसक्षम करणारा होता, हे मात्र नक्की!
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.