स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ चिंतामण आमडेकर

    15-Aug-2023
Total Views | 240
Article On FreedomFighter Raghunath Chintaman Amdekar

स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ चिंतामण आमडेकर... कोवळ्या वयात इंग्रजांनी त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हा काय? तर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आजच्या भागात या वीराची शौर्यगाथा...
 
१५ वर्षांचे कोवळे वय, आता कुठे विचारांना वळण लागण्याचे वय, आता कुठे जरा मोठा झालास तू, हे ऐकू येणार असे वय, आता कुठे जबाबदारीची जाणीव होण्याचे वय, आताच्या काळात आपण असेच म्हटले असते. पण, त्यांच्यासाठी १८ वर्षं म्हणजे कर्तृत्वाचे वय आणि त्याच वयात हातात बेड्या पडल्या. आपली शिक्षा भोगून आल्यावरसुद्धा आपल्या देशकार्यात कुठलाही बदल न करता, उलटपक्षी ते अजून जोमाने सुरू ठेवण्यात आले, परिणाम स्वाभाविकच आहे, परत एकदा जेल यात्रा. पण, हरकत काय आहे, आपल्याला मातृभूमीचे स्वातंत्र्य हवे आहे, त्यामुळे हे तर आलेच, कष्ट कितीही होवो, मार्ग बदलायचा नाही, हेच तर सांगत आहे. स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ चिंतामण आमडेकर यांचे चरित्र.

अर्पित कर दो तन मन धन
मांग रहा बलिदान वतन
अगर देश के काम ना आए तो जीवन बेकार
तो जीवन बेकार साथियों
तो जीवन बेकार
हो जाओ तैयार
साथियों हो जाओ तैयार
हो साथियों हो जाओ तैयार॥
या जाणीव जागृतीने सदैव मातृभूसाठी कार्यरत असणार्‍या रघुनाथ आमडेकर यांचा जन्म नाशिक जवळील जुन्नरचा. रघुनाथ यांचे नाशिकमधील शाळेत पाचवी हायस्कूलपर्यंतचे शिक्षण झाले. नाशिक म्हणजे सावरकर बंधू आणि सावरकर बंधू म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीर तळहातावर घेतलेले बंधू.

देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ, अर्थात अमर्याद देशप्रेम आणि देशसेवा अर्थात मातृभूमीला पारतंत्र्यातून सोडविण्याची प्रतिज्ञा हे समीकरण म्हणजे सावरकर बंधूच, तर याच ऋणानुबंधातून रघुनाथ आमडेकर गुप्त संघटनेचे सभासद झाले. त्यांनी देशकार्यात स्वतःला झोकून दिले. गुप्त पत्रात वापरायची खुणांची सांकेतिक भाषा शिकले, नुसतेच शिकले नव्हे, तर त्यात तरबेज झाले. हे सगळे का? तर इंग्रजांच्या पारतंत्र्यामध्ये त्यांच्याशी लढायचे, तर सर्व ताकदीनिशी म्हणून. या लढ्यासाठी आणि सशस्त्र क्रांतीसाठी पहिली तरतूद करायची ती शस्त्रास्त्रांची. शस्त्र खरेदी करण्यासाठी पैसा उभा करणे, हे सगळ्यात मोठे काम होते. त्यासाठी सोने चोरायचे ठरले आणि ती जबाबदारी स्वातंत्र्य सेनानी आमडेकर यांनी घेतली आणि पारसुद्धा पाडली.

त्यातूनच नाशिक वधात त्यांचा संबंध जोडला गेला आणि त्यांना चौकशीअंती सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. शारीरिक छळ, मानसिक खच्चीकरण या सगळ्यांनी ते घाबरण्यातले नव्हते. त्यांनी आपल्या जबानीत कोणाचाही नामोल्लेख केला नाही. ’मौनं सर्वार्थ साधनम्’, हा जणू क्रांतिकारकांचा मूल मंत्र ठरला आणि तो त्यांनी स्वातंत्र्य मिळेपर्यंत पाळला. आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ त्यांनी सोलापुरात काढला. दुःख हेच की, त्यांच्याविषयी यापेक्षा जास्त माहिती उपलब्ध नाही. तरीही आपल्या स्मरणात त्यांना कायम ठेऊन आपण त्यांना आदरांजली वाहूच शकतो. त्यांना आणि त्यांच्या कार्याला कोटी कोटी नमन.

सोनाली तेलंग
९८८११३२३९३
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121