पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली पुणे-बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरु होत असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी दूर होणार असल्याचे बोलले जात आहे.
उडान योजनेच्या अंतर्गत पुण्याहून काही मोजक्या मार्गावर विमानसेवा सुरु करण्यात आली होती. परंतू, काही तांत्रिक कारण देऊन पुणे-बेळगाव विमानसेवा बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरु करण्यासाठी बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी नागरी हवाई मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु केला होता.
तसेच प्रवाशांकडूनही यासाठी सतत मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता ऑक्टोबरपासून पुण्याहून बेळगावसाठी इंडिगो व स्टार एयर या दोन कंपन्यांची विमानसेवा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सुरु करण्यात येत आहे.
अशी असेल पुणे-बेळगाव विमानसेवा
स्टार एयरची सेवा ही २९ ऑक्टोबरपासून सुरू होत असून ती दैनंदिन असेल. तर इंडिगोची सेवा आठवड्यातून केवळ तीन दिवस असेल. मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी इंडिगोची सेवा असेल.