पुणे : आगामी काही वर्षातच आपल्या देशाच्या विकासाचा केंद्रबिंदु पुणे असणार आहे. पुण्याची ओळख रोजगार देणारे शहर अशी आहे. महाराष्ट्रामधील सर्वात वेगाने विकसीत होणारे पुणे शहर आहे. त्यामुळे या शहराला २४ तास पाणी, वीज आणि उत्तम रस्ते व इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. भविष्यात पुणे शहर ही ऑटोमोबाईलची मोठी बाजारपेठ बनणार आहे. भारत ऑटोमोबाईल निर्मितीमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या नंबरवर चीन आहे. दुसर्या क्रमांकावर अमेरिका आहे. चौथ्या क्रमांकावर जपान आहे. आपण आता जपानलाही मागे टाकले आहे. येत्या पाच वर्षात पहिल्या क्रमांकावर नेण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे पुण्याचे महत्व आणखी वाढणार असल्याचे प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी त्यांनी पुण्यातील प्रदुषण, वाहतूक कोंडी यावरही मार्मिक भाष्य केले. तसेच त्यावरील उपाय सुचवले.
पुणे शहरातील एनडीए चौक (चांदणी चौक) या राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास तसेच खेड व मंचर वळण रस्त्याचे बांधकाम (चौपदरीकरण) या कामांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, डॉ. सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील, माजी आमदार मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, भाजपा सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद तथा नाना भानगिरे, भारतीय राजमार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, पुण्यातील रस्त्यांची वाढीची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे पुण्याला आता हवेमधून चालणार्या बसची (डबल डेकर स्काय बस) आवश्यकता आहे. पुण्याचा विकास झाला पाहिजे. परंतु, आता पुणे वाढवू नका. पुण्यात गर्दी वाढवू नका. शहर प्रदूषणापासून मुक्त करा आणि नागरिकांना चांगली हवा द्या. पुण्यात खूप प्रदूषण असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच ४० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे डीपीआर झालेले आहेत. पुणे-बेंगलुरु प्रकल्प ४२ हजार कोटी रुपयांचा आहे. राज्य शासनाने भूसंपादन करुन दिले आणि ९ टक्के जीएसटी माफ केला, वाळू, अन्य साहित्यावरील रोयल्ट्री फ्री केली तर पुणे शहरातील सर्व ५० हजार कोटींचे पूल बांधून देण्यास तयार असल्याचे गडकरी म्हणाले.
इलेक्ट्रिक आणि इथेनॉल, हायड्रोजन, बायोडिजेल हे भविष्यकालीन इंधन आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्यातल्या ऑटोरिक्षांना फ्लेक्स इंजिनमध्ये कन्व्हर्ट करावे. नवीन ऑटो रिक्षाचे परमिट देताना ते १०० टक्के इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर चालणार्या वाहनांसाठीच द्यावेत. कचर्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. पुण्याला पेट्रोल डिझेल पासून जर मुक्त केलं तर ४० टक्के प्रदूषण कमी होईल. पाच वर्षांमध्ये सगळ्या बसेस इलेक्ट्रिकच्या होणार आहेत. कचर्याचा वापर करुन महामार्ग बांधावेत. प्रदुषित पाणी शुद्ध करुन उद्योगांना, रेल्वे गाड्या धुण्यासाठी आणि शेतकर्यांना दिल्यास पाण्याची बचत होईल. त्यामुळे नद्या देखील प्रदूषणापासून मुक्त होतील असे गडकरी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याला मोठे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. पुण्यामधून बेंगलोरला गेलेले उद्योग पुन्हा पुण्यात येऊ पहात आहेत. त्यांना उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले तर गुंतवणूक आणि नोकर्या देखील आणता येतील. पुणे हे मॅनुफॅक्चरींग हब आहे. दळवळण सोय आणि विमानतळ सोय आवश्यक आहे. विमानतळ विस्तार आणि नवीन विमानतळाची आवश्यकत त्यांनी नमूद केली. पुणे इलेक्ट्रॉनिक, हॉर्टीकल्चर क्लस्टरसाठी विमानतळ आवश्यक आहे. पुण्यात सर्क्युलर इकोनॉमी पार्कदेखील तयार केले जाणार आहे. पुणे मेट्रो मंजूर झाल्यानंतर अत्यंत गतीने काम झाले. इंटरचेंजमुळे प्रवासी संख्या वाढली आहे. वन कार्ड योजनेचा फायदा होईल. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमपीएमएला हे कार्ड लागू करावे अशा सूचना केल्या. सार्वजनिक वाहतुक सक्षम करण्यासाठी स्मार्ट सिस्टीम तयार करीत आहोत. कोंडी फोडण्यापरिता डबलडेकर उड्डाणपूल आणि उन्नत रस्ते तयार करण्यात येणार आहेत. मेट्रोचे वाढीव टप्पे तयार तयार करण्यात येणार आहेत. चांदणी चौकाच्या कामावेळी भूसंपादनाच्या निधीचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा नगरोत्थान योजना सुरु करुन स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासनाने पैसे देण्यास सुरुवात केली.
अजित पवार, या रस्त्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणांनी पाठपुरावा केला. नितीनजी गडकरी यांनी निधीची कमतरता भासू दिली नाही. राज्यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वास न्यायचे आहेत. पुण्याला जोडणार्या विविध रस्त्यांच्या विकास आणि उड्डाणपूलासाठी ४० हजार कोटी रुपये देण्याचे नितीन गडकरी यांनी मान्य केले आहे. त्याकरिता विविध एमओयू करण्यात येतील. पालखी मार्ग, अंतर्गत वर्तुळाकार मार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्विकारावी अशी विनंती गडकरी यांना केली. पुणे पिंपरी चिंचवड, पीएमआरडीएचा परिसर झपाट्याने विकसित होतो आहे. आयटी आणि ऑटो इंडस्ट्री वाढते आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. नवीन वर्तुळाकार महामार्गाचे काम होणार, त्याकरिता योग्य मोबदला दिला जाईल. आमचं पुणेकर म्हणून नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम असल्याचे ते म्हणाले.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मुंबई ते बेंगलुरु जाणार्या लोकांसाठी गेमचेंजर असलेला हा रस्ता आहे. या चौकाचे स्टार उजळले आहेत. देशभरात रस्ते, महामार्ग, पूल असे उभारणारे नितीन गडकरी हे विकास पुरुष आहेत. हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पुर्णत्वास गेला. मेट्रो प्रकल्पाचे नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. त्यानंतर चांदणी चौकाचे काम झाले. २०१४ पासून त्याच सरकारच्या काळात घोषणा-पायाभरणी-उद्घाटन असे सकारात्मक चित्र दिसते आहे.
डॉ. नीलम गोर्हे या कामामधून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा प्रकल्प आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रयत्न केले. केंद्र आणि राज्य सरकारचे पुण्यावर लक्ष आहे. नागपूरकर आणि पुणेकरांचे एक नवे नाते या रस्त्यामुळे निर्माण झाले आहे. भीमराव तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. चांदणी चौकातील सर्व मार्गिकांची एकूण लांबी १६.९८ किलोमीटर असून या प्रकल्पाकरिता ८६५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यासोबतच खेड-मंचर रस्त्याची एकूण लांबी १४ किलोमीटर असून त्याकरिता ४९५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर २२३५ कोटींचा एक डबल डेकर पूल, पुणे सोलापूर महामार्गासाठी ५००० कोटी रुपये, शिरूर ते नगर रस्त्यासाठी ११००० कोटींचा, तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या साडेसात हजार कोटींचा, नाशिक फाटा ते खेड हा ९००० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. पालखी मार्गाचे उर्वरीत कामही लवकरच डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे गडकरी यांनी सांगितले. चांदणी चौकातील पूलाच्या कामासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ग्रेव्हीलॉक्ड रेटेरिंग वॉलची पद्धतीचे पेटंट तंत्रज्ञान पहिल्यांदाच देशात वापरण्यात आले आहे. यासोबतच मलेशियामधून आणलेल्या नविन तंत्रज्ञानाचाही वापर यामध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्याचा वापर करावा. मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या सगळ्या आम्ही या ठिकाणी पूर्ण केल्याचे गडकरी म्हणाले.