भाजयुमो देणार युवराजांना जोर का धक्का : तेजिंदरसिंह तिवाना

    12-Aug-2023
Total Views | 41
Interview With BJP Yuva Morcha TejinderSingh Tiwana

मुंबई (ओंकार देशमुख) :
राज्यातील स्थानिक स्वराज्या संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतही महापालिकेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष प्रचाराच्या दिशेने कामाला लागण्याच्या तयारीत असून त्यातच विद्यापीठ सिनेट निवडणुकांचे पडघमदेखील वाजायला सुरुवात झाली आहे. सिनेट निवडणुकांची घोषणा झाल्यापासून युवा मतदारांना सर्वपक्षीयांकडून गोंजारण्यात येत आहे. यात सिनेटसह येत्या महापालिका निवडणुकांमध्ये युवराज आदित्य ठाकरेंना जोर का धक्का देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांनी जाहीर केले आहे. सिनेट निवडणुकांसह युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
 
नवमतदारांना पक्षाशी जोडण्याचा संकल्प नेमका काय आहे ?

मुंबईतील १०० कॉलेजेसमध्ये जाऊन भाजपच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून नवमतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी आम्ही एक नवीन अभियान सुरू केले आहे. नवमतदारांची नोंदणी करून त्यांना पक्षासोबत आणण्यासाठी ’नमो अगेन’ मोहीम सुरू करण्यात आली असून याद्वारे १८ ते २० वर्ष वयोगटातील युवकांना सामील करून घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मुंबईतील युवक मोठ्या प्रमाणात मतदान नोंदणीपासून वंचित असून त्यांना मतदान प्रक्रियेत आणण्यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. युवकांचा राजकारणासह देशातील विविध घटकांवर आणि विषयांवर पडणारा परिणाम नोंदणीय असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेल्या नवभारताच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी युवकांचा सहभाग आवश्यक असून या युवकांना सामील करून घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत युवा मोर्चाने नेमकं काय योगदान दिल आहे ?

जेव्हा मुंबईत सुशांतसिंह राजपूतचे प्रकरण घडले. तेव्हा, संशयाची सुई मुंबईतील युवराजांवर गेली आणि त्यातून मुंबईत अमली पदार्थांशी संबंधित घटना कशा घडतायत याबाबत चर्चा सुरू झाल्या. तेव्हा मुंबईला अमली पदार्थातून मुक्त करण्यासाठी ’ड्रग्ज फ्री मुंबई’ या अभियानाला भाजप युवा मोर्चाच्यावतीने सुरुवात करण्यात आली. इतकेच नाही, तर अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या अनेक गुन्हेगारांना कायद्याच्या स्वाधीन करण्याचे कामही मुंबई भाजप युवा मोर्चाने केले आहे. आम्हाला जी काही माहिती मिळेल ती पोलिसांना देऊन या माफियांना पोलिसांच्या कारवाईच्या कचाट्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
 
तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपतर्फे कुठल्या गोष्टी करण्यात आल्या ?

युवा मोर्चाच्या माध्यमातून ‘रोजगार ऑन व्हील’ या अभियानाच्या माध्यमातून युवकांना नोकर्‍यांची माहिती देण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मुंबईच्या विविध भागांमध्ये हे अभियान राबविण्यात येत असून युवकांना माहिती देण्यासोबतच आमच्याशी संलग्न असलेल्या मोठ्या कंपन्यांशी युवकांना जोडण्याचे कामदेखील युवा मोर्चा करत आहे. कायमच मेळाव्यांमध्ये येणार्‍या सर्व युवकांना नोकरी मिळतेच असे होत नाही. त्यामुळे मेळाव्याला येण्याचा खर्च आणि या सगळ्या गोष्टींपासून भुर्दंडापासून युवकांना वाचवून थेट रोजगार त्यांच्या द्वारी ही संकल्पना कौशल्य विकास विभाग आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून आम्ही राबवित आहोत.
 
सिनेटच्या अनुषंगाने ठाकरेंची पुढील पिढी आदित्य आणि अमित एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपची सिनेट निवडणुकीसाठी रणनीती काय असेल?

मुंबईतील युवक हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि फडणवीस-शिंदेंच्या कामावर पूर्णपणे विश्वास आहे. उबाठा गटाचे आदित्य ठाकरे जे स्वतःला युवा नेते म्हणवून घेतात त्यांना स्वतःच्यामतदारसंघातील लोकांचे प्रश्न अद्याप सोडवता आलेले नाहीत. त्यांचा लोकांशी तुटलेला संपर्क आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना आलेलं अपयश याची पुरेपूर कल्पना मुंबईकरांना आलेली आहे. त्यामुळे येत्या सिनेट निवडणुकीत राजा महाराजांची औलाद स्वतःच्या घरात बसून राजेशाही थाटात बसून कुणाशीही संवाद न साधता युवकांच्या प्रश्नांवर बोलत असतील, तर त्यांना मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. ही मंडळी येत्या निवडणुकीत तोंडावर पडणार असून त्यांना एकही जागा मिळणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे युवक जागृत झाला असून, येत्या सिनेट निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्चित आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121