पूर्वांचलची संदर्भांसहीत सचित्र भ्रमंती

    12-Aug-2023   
Total Views |
Book Review Related To Purvanchal

दि. १५ ऑगस्ट रोजी भारतवासीय ७६वा स्वातंत्र्य दिन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करतील. परंतु, स्वातंत्र्योत्तर भारतात दुर्देवाने पूर्वांचलचा प्रदेश कायमच दुर्लक्षित, उपेक्षित प्रदेश राहिला. २०१४ साली मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून आणि पूर्वांचलच्या राज्यांमध्येही ‘कमळ’ उमलल्यानंतर विकासगंगा या प्रदेशात प्रवाहित झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवाराशी संबंधित इतर संस्थांचे तर या भागातील कार्य विशेष उल्लेखनीय. नुकतेच मणिपूरच्या विषयावरुन विरोधकांनीही केंद्र सरकारविरोधात रान पेटवले. तेव्हा या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य पूर्वांचलमधील आठ राज्ये व तेथील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थिती या सर्वांची भारतीयांनाही ओळख व्हावी, या उद्देशाने छायाचित्रकार मोहन बने लिखित ‘स्वर्गीय सृष्टीसौंदर्याचे आपले पूर्वांचल’ या त्यांच्या प्रवासवर्णनपर देखण्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकाचा परिचय करुन देणारा हा लेख...

ईशान्य भारतातील आठ राज्ये, ज्यांना आपण ‘अष्टलक्ष्मी’ असेही म्हणतो, त्या अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, सिक्कीम आणि आसाम या राज्यांच्या सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक आणि आर्थिक जडणघडणीविषयीची स्थानिकांची धोरणे आणि मौखिक कथांचा आधार घेत मोहन बने यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’चे उपाध्यक्ष माजी खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रस्तावना लाभली आहे. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी ‘पूर्वांचल’ शब्दाविषयी भाष्य करीत आपले मनोगत व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाला ‘पूर्वांचल’ असे म्हटले जाते; मात्र मराठीने हा शब्द पूर्वोत्तर राज्यांसाठी म्हणून निवडला आहे, असेही ते म्हणतात. लेखक मोहन बने यांच्या छायाचित्रांविषयी भरभरून बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणतात की, “पुस्तकाच्या बहिरंगाइतकेच त्याचे अंतरंग खचितच सुंदर आहे.” हा अवघड प्रदेश भटकंतीच्या माध्यमातून मोहन बने यांनी अक्षरश: पालथा घातला. म्हणूनच त्यांच्या पुस्तकात त्या-त्या प्रांताचा धांडोळा तसेच वर्तमानाचे साक्षेपी चित्रणदेखील वाचायला मिळते. हे म्हटले तर कॉफी टेबल बुक होऊ शकले असते; परंतु त्यांनी तसे केलेले नाही.

पुस्तक लिहिण्यापूर्वी आपल्या दीर्घ मनोगतातून लेखकाने आपल्याला त्या प्रांताविषयी आकर्षण का वाटते, ते विशद केले आहे. केवळ काश्मीरविषयी प्रेम वाटणार्‍या तसेच पूर्वांचलकडे धडधडीत दुर्लक्ष करणार्‍या तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा त्यांनी जाहीर निषेधही केला आहे. तसेच मनोगतातून केवळ इतिहास आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केलेले नाही, तर भारतातील एकंदरच बदलणारी सामाजिक स्थित्यंतरे यातून स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आली आहेत. या ‘अष्टलक्ष्मी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आठ राज्यांपासून आपल्याला काय-काय मिळाले आणि आपण त्यांना काय दिले, याचा लेखाजोखाच त्यांनी मांडला आहे. पूर्वांचलला भारतीयांकडून न्याय मिळावा, यासाठी हे पुस्तक म्हणजे खारीचा वाट असल्याचे ते मनोगताच्या शेवटास सांगतात.

पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात केवळ शब्द नाहीत, तर त्यांना सोबत करणारी उत्कृष्ट छायाचित्रेदेखील लेखकाने खुबीने वापरली आहेत. पुस्तकाची सुरुवातच अरुणाचल प्रदेशापासून होते. आपल्या देशात सूर्यप्रकाश ज्या भागावर सर्वप्रथम पडतो, ते हे राज्य. या प्रकरणात भारतीय सैन्याचा ताल, तेथील राहणीमान, स्थानिकांच्या श्रद्धा, तेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अशा अनेक गोष्टींवर आपले विस्तृत मत लेखकाने मांडले आहे. तेथील धार्मिक मठ, लोक, त्यांचे रितीरिवाज, निसर्गसौंदर्य तसेच तेथील नैसर्गिक परिसंस्था यांचे उत्तम मूल्यमापन करून आपली निरीक्षणे लेखकाने नोंदवली आहेत. शेवटास सायकलिंग अनुभवांचे तसेच त्यातल्या गंमतीचे अनुभवही त्यांनी लिहिले आहेत. तेथील ढोला सादिया घाट पुलाने उपलब्ध झालेल्या सुखसोयींचाही उल्लेख समाजभान जपत त्यांनी केला आहे.

पुढील एका प्रकरणात नागभूमीचे अर्थात नागालॅण्डचे वर्णन केलेले आढळते. तेथील टोळीअंतर्गत संघर्ष, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागभूमीला दिलेली भेट, तेथील स्थानिक हॉर्नबिल उत्सव, खाद्यसंस्कृती, बॅटल ऑफ टेनिस कोर्ट येथील सुभाषबाबूंच्या आठवणी व दफनभूमी, स्थानिक संस्कृती शिल्पे व पाकिस्तानातून झालेले आक्रमण व त्यावरून झालेले धर्मांतर, अशा अनेक आयामांतून घेतलेला आढावा आहे. सोबतीला नयनरम्य छायाचित्रे आहेत. येथील हॉर्न बिल महोत्सवातील कित्येक सुंदर छायाचित्रे त्यांनी सोबत जोडली आहेत. दिमापूरहून कोहिमाला जाण्यासाठी वाटेत किसामा गाव लागतं. या गावात हा महोत्सव दरवर्षी रंगतो. सर्व स्त्रीपुरुष आपली पारंपरिक वेशभूषा परिधान करून उल्हासात या महोत्सवाचा आनंद लुटतात. लाल आणि काळ्या रंगातील त्यांची ती आकर्षक वेशभूषा. गाला भरून मण्यांच्या माळा, हस्तिदंत, चांदी, तांबे-पितळ, शंख शिंपल्यांचे पारंपरिक दागिने, सोबत मांड चोळणा त्यावर तीर कामठा (धनुष्य बाण) असतो. फार पूर्वी टोळ्यांतून फिरताना स्वसंरक्षणासाठी ज्या अवजारांचा वापर केला जाई, त्यांच्या प्रतिकृती आजही ते सोबत वागवतात.

मणिपूर प्रकरणाची सुरुवात सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या कर्तृत्वाबद्दल सांगून मोइरांग गावाचा इतिहास चितारुन लेखकाने केली आहे. या ठिकाणची नृत्ये, पारंपरिक वाद्ये, बाजार, अर्थार्जनाची माध्यमे, क्रीडा तसेच पर्यटनविषयी माहिती आपल्याला वाचायला मिळते. या भागात ३८ टक्के लोक ख्रिस्ती, तर दहा टक्के मुस्लीम वस्ती आहे; तसेच राज्याच्या निम्म्या भागाला म्यानमारची सीमा खेटून आहे. एकेकाळी ‘वी हेट इंडियन्स’ असं म्हणणार्‍या मणिपुरी जनतेने सुभाष बाबूंचा पुतळा स्फोटके वापरून उद्ध्वस्त केला होता. रा. स्व. संघ, वनवासी कल्याण आश्रम, विद्याभारती, सेवाभारती, अभाविप आणि प्रचारकांनी इथे पाय रोवून, इथल्या जनतेसाठी नि:स्वार्थ सेवाभावाने कार्य केले. त्यांना समजून घेऊन पुढची पावले उचलली. तेथील टोळ्यांतील संघर्ष लयास गेले.

मणिपूरच्या नामकरणाची कथा तेथील एका आख्यायिकेवरून समजते. राधा-कृष्णाची वेगळी गोष्ट या आख्यायिकेत सांगितली आहे. राधा-कृष्ण आणि इतर गोपिका रासलीला करताना त्यांचे नृत्य कुणीतरी लपून पाहते आहे, असे श्रीकृष्णाला वाटले. त्याने सर्व गोपिकांना दूर करून चोरून पाहणार्‍यास पुढे बोलावले. अहो आश्चर्यम, ते स्वतः भगवान महादेव होते. त्यांनी श्रीकृष्णाकडे नृत्य पाहण्याची विनंती केली; परंतु आपली रासलीला कुणी पाहावी, असे कृष्णास रुचेना. राधेने मध्यम मार्ग निवडत सुवर्णमध्य काढला. शंकर देवांनी पाठमोरे वळून केवळ पदन्यास आणि मिनिटाच्या आवाजावरून नृत्याचा आनंद घ्यावा. दोन्ही देवांना ही कल्पना पटली. पुढे तृप्त होऊन शंकर कैलासावर परतले आणि हे नृत्य पुन्हा पाहण्यासाठी एक जागा त्यांनी निवडली. बशीसारखा आकार असलेली ही भूमी त्यांना आवडली. तेथील पाणी वाफेने नष्ट करून मोत्यांच्या मण्यांच्या प्रकाशात ही रंगभूमी उजळून निघाली आणि म्हणूनच या जागेला ‘मणिपूर’ असे म्हणतात. अशी ही आख्यायिका.

त्रिपुराविषयी सांगताना तेथील समृद्ध संगीत परंपरा, लता मंगेशकर यांचा उल्लेख, महाविद्यालये, वस्तुसंग्रहालये तसेच तेथील व्याघ्र प्रकल्प आणि निसर्ग याविषयी उल्लेख करुन लेखक मेघालयकडे वळतात. मेघालय, मिझोराम आणि सिक्कीम यांच्याही निसर्गसौंदर्याचे तसेच तेथील गतकाळापासूनच्या आजपर्यंत परिस्थितीचे वर्णन करून आसाम प्रांताचे दीर्घ वर्णन लेखकाने केले आहे. तेजपूर-काझीरंगा या प्रांतांचे विशेष उल्लेख केलेले आढळतात; तसेच तेथील अनेक छायाचित्रेसुद्धा पुस्तकाच्या शेवटास दिली आहेत.

पुस्तकाची एकूणच मांडणी उत्तम आहे, दर्जासुद्धा छायाचित्रांच्या तोडीस तोड अगदी उत्कृष्टच. याला मजकुरासहित असलेले कॉफी टेबल पुस्तक म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पुस्तकाचे नाव : स्वर्गीय सृष्टीसौंदर्याचे आपले पूर्वांचल
लेखक : मोहन बने
प्रकाशक : गौरधन व्हिजन
पृष्ठसंख्या :१९०
मूल्य : ३००० रुपये

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.