लोकमान्य आणि हिंदुत्व

    12-Aug-2023
Total Views | 116
Article On Loakmanya Tilak And His Hindutva

भारतात राष्ट्रवादाची चर्चा करताना विवेकानंद -अरविंद-लोकमान्य आणि स्वा. सावरकर यांना वगळून राष्ट्रवादाची चर्चा पूर्ण होऊ शकणार नाही. या व्यक्तींच्या विचारांचा अभ्यास करायचे ठरले, तर त्यांतून हिंदुत्वही बाजूस काढता येणार नाही. येथील राष्ट्रवादातून हिंदुत्व वगळणे म्हणजे देहाच्या कुडीतून चैतन्यतत्त्व बाजूस करणे आहे.

१९व्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारताचे धार्मिक व सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी स्वामी विवेकानंदांना लोकमान्य टिळकांचे पूर्ण सहकार्य मिळाले. स्वामीजी म्हणजे योद्धा संन्यासी, तर लोकमान्य योद्धा गृहस्थाश्रमी होते. टिळक आणि विवेकानंद हे दोघे समकालीन होते. हिंदुत्वाच्या आधारावर भारत हे राष्ट्र एकसंध झाले आहे, ही धारणा दोघांना कार्यप्रवृत्त करीत होती. सनातनी रूढीमार्तंडांच्या पकडीतून आपले तत्त्वज्ञान व आपले आचरण मुक्त केल्यानेच भारताचा कायापालट होऊ शकतो, ही दोघांची भूमिका होती.

प्राचीन काळापासून भारत हे राष्ट्र आहे, अशी लोकमान्यांची स्वच्छ धारणा होती. वैदिक काळापासून ते उदय पावले, असे त्यांचे प्रतिपादन होते. ‘केसरी’च्या दि. १२ जानेवारी १९०४च्या अग्रलेखात टिळकांनी ’हिंदुत्व’ व ’हिंदू राष्ट्र’ या संकल्पनांचा उत्कट गौरव केला आहे. या अग्रलेखाचे शीर्षक आहे ’हिंदुत्व आणि सुधारणा.’ या अग्रलेखातून टिळक वाचकांना सांगतात- “आम्हीही स्त्री शिक्षण, बालविवाह, पोटशाखेतील अंतर्विवाह, समुद्रयात्रा या विषयांबाबत सामाजिक परिषदा योजणार्‍या सुधारकांशी पूर्ण सहमत आहोत. परंतु, हिंदुत्व कायम ठेवून या सर्व सुधारणा अमलात आणणे शक्य आहे, ही आमची धारणा आहे, तर सुधारक मंडळी अशा सुधारणा अमलात आणताना हिंदुत्व बुडविण्यासही तयार आहेत, हा आमच्यात व सुधारकांत फरक आहे.”

दि. ३ जानेवारी १९०६ या दिवशी लोकमान्यांनी बनारस येथे ’भारत धर्म महामंडळ्या’ मथळ्याचे भाषण दिले. त्या भाषणात ते म्हणतात की, ‘’वैदिक काळात भारत हे एक स्वयंपूर्ण राष्ट्र होते. त्यानंतरच्या काळात या सत्याचा आम्हास विसर पडला व आमची अधोगती सुरू झाली. वस्तुतः हिंदू बनारसचा असो की, मद्रासचा व मुंबईचा असो, इथून तिथून तो एकच असतो. हिंदूंमध्ये वेशभूषा, भोजनपद्धती यात भले भिन्नता असेल; पण भावविश्वामध्ये एकत्व आहे. गीता, रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांमधून सर्व हिंदूंवर समान संस्कार होतात. तेव्हा वेद, गीता, रामायण यांच्याविषयी हिंदूमात्रास जी निष्ठा वाटते, तिच्यातूनच आपला समान वारसा सिद्ध होतो.”

लोकमान्यांना प्रिय असलेला राष्ट्रवाद समाजातल्या सर्व घटकांच्या आणि विशेषतः तळागाळातल्या अन्यायग्रस्त जिवांच्या कल्याणाची काळजी करणारा होता, म्हणून तर पुण्यात प्लेगचा प्रादुर्भाव वाढला, तेव्हा तिथल्या वेश्यांच्या वस्त्यांमधूनही जुलूम- जबरदस्ती होऊ नये, त्या महिलांनाही सुरक्षा मिळावी, यासाठी टिळक धावून गेले. महाराष्ट्रातील अनेक जण १९०८ पूर्वीच्या टिळकांना परंपरावादी मानतात. पण, टिळकांनी कधीही संध्या, पूजाअर्चा यांच्या चौकटीत स्वतःला अडकवून घेतलेले नाही. किंबहुना, त्यांनी हिंदू धर्माच्या व्याख्येत स्वतःला कधीच बंदिस्त ठेवले नाही. लोकमान्य जुने आचारधर्म मानत नव्हते; पण ते पाळणार्‍यांबद्दल ते कायम आदर बाळगून असत. जुन्या संस्कारांमध्ये आणि आचारधर्मामध्ये कालानुरूप सुधारणा झाली पाहिजे, हे त्यांचे मत होते. (टिळकपर्व १९१४-१९२०, अरविंद गोखले, राजहंस प्रकाशन, मार्च २०२२, पृष्ठ २३)

धर्म राष्ट्रीय जीवनात चैतन्य निर्माण करतो व धर्माचे स्वरूप कर्मकांडात्मक राहू नये, असे ते म्हणत. हिंदू धर्मात शंकराचार्यांचे स्थान मोठे असून लोकमान्यांना त्यांचे महत्त्व माहित होते. शंकराचार्यांची पाद्यपूजा एका कुटुंबात न होता त्यांची सार्वजनिक पाद्यपूजा व्हावी, अशी सूचना टिळकांनी केली होती. यानिमित्ताने सामान्य लोकांशी शंकराचार्यांचा संवाद होईल व त्यामुळे हिंदू धर्मात काही सुधारणा घडवायच्या झाल्यास ते सुकर होईल, असा लोकमान्यांचा दृष्टिकोन होता.

टिळकांना हिंदूचे धर्ममूलक ऐक्य हे राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या संवर्धनार्थ वापरावयाचे होते आणि मुसलमानांना व इतर धर्मीयांना राजकीय समानहितत्त्वाच्या पायावर व ‘भारत ही मातृभूमी आहे,’ या भावनिक आधारावर नव्या राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घ्यावयाचे होते. हिंदुत्व व राष्ट्रीयत्व यांचे पूर्वापार संबंध कायम ठेवून भारतातील अन्य धर्मीयांना आधुनिक राष्ट्रवादाची दीक्षा द्यावयाची होती. (हिंदुत्व ः भारतीय राष्ट्रवादाचा मूलाधार, ब. ल. वष्ट, पृष्ठ २९, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, २०१७). राष्ट्रीयत्वाशी हिंदुत्वाचे असलेले भावबंधन तोडणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, राष्ट्रीयदृष्ट्या हिताचे नाही, हे स्पष्ट करून ते इशारा देतात, हिंदुत्व मोडल्याने राष्ट्रीयदृष्ट्या पुढे चांगले परिणाम होतील, असे कोणास वाटत असेल, तर तो निव्वळ भ्रम आहे. हिंदू समाजातील दोष दूर करून कालानुसार समाजव्यवस्था आणि धार्मिक आचार-विचार यात परिवर्तन घडवून आणण्यास टिळक तथाकथित सुधारकांइतकेच अनुकूल होते; पण हे परिवर्तन हिंदुत्वाचा अभिमान राखून केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

ते लिहितात की, ‘’कोणत्याही सुधारणेचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे विशिष्ट राष्ट्रीयत्त्वाचा अभिमान जागृत करणे, हा होय. तो अभिमान आम्ही कोणता धरावयाचा? अर्थात, हिंदुत्वाचा होय. आपल्याला ’पुढे जी ऊर्जितावस्था प्राप्त व्हावयाची आहे, ती ‘हिंदू राष्ट्र’ या नात्याने झाली पाहिजे, असे त्यांनी ठाम बजावले आहे.” (केसरी, दि. १२ जानेवारी १९०४) मुसलमान आणि ख्रिस्ती लोकांनी हिंदुस्थान ही आपली मातृभूमी मानून समान नागरी अधिकाराने राहावे, ज्याला त्याला आपापला धर्म पाळण्याची मुभा असावी, कोणीही आपला धर्म दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्न करू नये. यातून भारताचे धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्व विकसित होईल. उदार हिंदुत्वाच्या गाभ्यावर विकसित होणारी समावेशक राष्ट्र कल्पना हिंदू हे मूलतः सहिष्णू आणि परधर्माचा आदर करणारे आहेत, हे लक्षात घेऊन टिळक मांडत होते. मुसलमानांमध्ये उदार दृष्टी शिक्षणाने आणि संस्काराने कालांतराने येईल, अशी त्यांची अपेक्षा होती.

हिंदू धर्माची उदारता व सर्वसमावेशकता याचा त्यांना अभिमान होता. योगी अरविंदांच्या सनातन धर्माचा टिळकांवर प्रभाव होता. ख्रिस्ती धर्मातील चांगल्या मूल्यांबद्दल टिळकांना आदर होता. परंतु, मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या कारवायांबद्दल त्यांनी आपल्या लेखांद्वारे चिंतासुद्धा व्यक्त केली होती. इस्लामीकरण आणि ख्रिस्तीकरण यांच्याविरुद्ध ‘जागे व्हा किंवा मरा’ ही निर्वाणीची हाक प्रथम टिळकांनी दिली. ख्रिस्त्यांच्या धर्मप्रसारासंबंधाने हिंदूना इशारा देणार्‍या ‘जागे व्हा किंवा मरा’ या लेखात टिळकांनी धर्मरक्षण आणि धर्म पुनर्स्थापना म्हणजेच धर्माचे नूतनीकरण यासंबंधी विचार मांडले आहेत. उपाशी पोरे फितवून किंवा दुष्काळात धर्मप्रसार करून जे ख्रिस्तीकरण चालू झाले होते, त्याबद्दल त्यांनी कडक टीका केली होती आणि “मिशनर्‍यांप्रमाणे स्वार्थत्याग करून कळकळीने समाजाला पोटाशी धरण्यानेच खरी सुधारणा होणार आहे,” असे सांगितले होते. या लेखात शेवटी ते म्हणतात की, ’‘मिशनरी मंडळ्यांस ख्रिस्ती राष्ट्रातील खालच्या वर्गाच्या लोकांचे द्रव्यसाह्य असल्यामुळे व इंग्लंड देशाचा अमल पृथ्वीच्या बर्‍याच भागावर पसरला असल्यामुळे या धंदेवाल्या मिशनरी लोकांचा सुळसुळाट चोहोकडे बराच मातलेला आहे. उत्तरोत्तर मिशनरींचा प्रवेश खेडेगावातूनही होऊ लागला आहे. हिंदू धर्माच्या अंगी त्राण आहे, जीव आहे व मुसलमान लोकांच्या समशेरीच्या तडाख्यातूनही तो बचावला आहे, ही गोष्ट खरी आहे; पण आजचा जो प्रसंग त्यांज वर आला आहे, तो त्याहीपेक्षा भयंकर होय. आणि यावेळी जर हिंदू समाज आपले कर्तव्य ओळखणार नाही, तर मथळ्यावर लिहिलेल्या वाक्यात सांगितल्याप्रमाणे आमची स्थिति होईल, हे आम्ही सांगावयाला पाहिजे, असे नाही.” (केसरी, २६ फेब्रुवारी १९०१).

सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा एक मुख्य हेतू हिंदू समाजात जागृती करणे, हाही होता. त्यास १८९०-९४ या काळात घडलेल्या हिंदू-मुस्लीम दंग्यांची पार्श्वभूमी होती. गणेशोत्सव व शिवजयंती या उत्सवांच्या माध्यमातून टिळकांना स्वधर्माच्या अस्मितेची जागृती करावयाची होती व त्यातून समाजाचे सामूहिक मन तयार करून स्वातंत्र्य चळवळीसाठी त्याचे उपयोजन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. १८९४ मध्ये पुण्यात हिंदूंची पालखी निघाली होती. १८९३च्या दंग्यांची त्यास पृष्ठभूमी होती. त्यामुळे दंगासदृश परिस्थिती उद्भवली होती. दि. १० सप्टेंबर १८९५च्या ‘केसरी’च्या अग्रलेखात टिळकांनी मुसलमानांच्या मशिदीपुढे वाद्ये न वाजवून देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती व मुसलमानांची यासंदर्भातील भूमिका यथार्थ नसल्याचे नमूद केले होते. दि. १० सप्टेंबर १८९३ रोजी शनिवारवाड्यासमोर टिळकांनी हिंदूंची प्रचंड सभा आयोजित केली होती.

टिळक कट्टर धर्माभिमानी होते; पण धर्मद्वेष्टे नव्हते. त्यांनी हिंदू-मुस्लीम वादात हिंदूंची बाजू हिरिरीने मांडली; पण या प्रकारच्या कोणत्याही वादात दुसरीही काही बाजू असू शकते, याचे भान ते विसरले नाहीत. मुसलमान हा समाज या मातीतला आहे आणि त्यालाही हिंदूंइतकेच समान अधिकार आहेत, हेही त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. प्लेगच्या काळात मोहरमच्या ताबुतांच्या मिरवणुकांवर बंदी घातली जाताच, त्याविरोधात उभे राहणारे टिळकच होते. त्यांनी मोहरमच्या मिरवणुकीत स्वतः भाग घेऊन समाजाला आदर्श घालून दिला. त्यांची दृष्टी बर्‍याच इतिहासकारांनी दुर्लक्षित केली आहे. सामाजिक चालीरितीमध्ये इष्ट परिवर्तन व्हावे, हे मत जसे टिळकांचे होते, तसे मवाळ सुधारकांचेही होते; पण टिळक आणि सुधारक यांच्यामध्ये फरक हा की, टिळकांना सामाजिक सुधारणा धर्माच्या पायावर झालेला हव्या होत्या, तर सुधारकांचा धर्माशी काहीही संबंध नव्हता. किंबहुना, धर्म ही वस्तू हीन आणि त्याज्य मानण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. ‘हिंदुत्व आणि सुधारणा’ या अग्रलेखात (१२ जानेवारी १९०४) टिळकांनी हा विषय अनेक उदाहरणे देऊन मांडला आहे. मद्रासेत हिंदू सभा स्थापन करण्याचे प्रो. रंगाचार्य यांनी ठरविले आणि त्यासाठी बोलाविलेल्या सभेत अ‍ॅनी बेझंट यांचे व्याख्यान झाले. “हिंदुत्व शुद्ध राखणे, ही राष्ट्रीयत्वाच्या मार्गावरची महत्त्वाची पायरी आहे,” असे टिळकांचे मत होते.

“धार्मिक सुधारणा राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेतून झाल्या पाहिजेत व हिंदू आचारधर्मात परिस्थितीनुसार परिवर्तन झाले पाहिजे,” असे त्यांचे प्रतिपादन होते. लोकमान्यांनी १९०७ मध्ये बेळगावला एक व्याख्यान दिले. त्यांत ते म्हणतात की, ’‘जातीभेद, जातीद्वेष व जातीमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, याचेही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळाले पाहिजे. जातीभेद मोडण्याची आवश्यकता किती आहे, हे आमच्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे.” स्वा. सावरकरांनी हिंदुत्वाच्या केलेल्या व्यापक व्याख्येचा आधार लोकमान्यांच्या हिंदुत्वाविषयीच्या व्याख्येवरच आधारलेला होता. अरविंद गोखले यांनी ‘टिळकपर्व’ या पुस्तकात हिंदू समाजासाठी टिळकांचे काय महत्त्व आहे, ते अधोरेखित केले आहे. ते लिहितात, “अवतारकार्यामुळे मुमूर्ष हिंदू समाजाला कायमचे संजीवन मिळाले आहे. समाजाकडे पाठमोरा होईल, तो संन्यासी आणि समाजाची पर्वा न करता शब्दपांडित्यात तल्लीन होईल तो ज्ञानी, या वेडगळ कल्पनांच्या नादी लागून मोक्षामागे पळत सुटलेल्या आत्मवंचक हिंदू समाजाला अत्यंत बलवत्तर, अशी मात्रा हवीच होती. ती देण्याला टिळकांसारखा अधिकारी पुरूष मिळाला, हे हिंदू समाजाचे भाग्य होय. ही संजीवनी मिळाली असूनही तिची उपेक्षा करणारे लोक टिळकभक्त म्हणून समाजात मिरवत असतात, याहून अधिक दुर्भाग्य असूच शकणार नाही.(पृष्ठ १२५)”

रवींद्र साठे
(लेखक महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळचे सभापती आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.)
ravisathe६४@gmail.com

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121