अत्र्यांच्या लेखांचे संकलन ‘पत्रकार अत्रे’ (संपादिका शिरीष पै); ‘सिंहगर्जना’ (प्रकाशक ः परचुरे प्रकाशन) यातून झाले आहे; त्याबरोबरच अलीकडेच प्रकाशित झालेल्या बाबूराव कानडे यांच्या ‘काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र’ या पुस्तकातून अत्र्यांच्या त्या जहाल लेखणीचा प्रत्यय येऊ शकतो. त्यांचाच आधार घेऊन अत्र्यांची वाटचाल काँग्रेसचे पाठीराखे ते काँग्रेसचे प्रखर विरोधक, अशी कशी झाली याचा आढावा घेता येऊ शकतो. आचार्य अत्र्यांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या कामगिरीचा वेध घेणे औचित्याचे ठरेल.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेली स्तुती धबधब्याप्रमाणे असे आणि जेव्हा कोणावर टीका करायची असे, तेव्हा ते प्रपाताप्रमाणे त्यावर तुटून पडत असत. काँग्रेसला या दोन्हींचा अनुभव आला. याचे कारण स्वातंत्र्यपूर्व काळात अत्रे काँग्रेसचे समर्थक आणि प्रशंसक होते, तर त्यांनतर आणि मुख्यतः संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तर ते काँग्रेसचे टोकाचे विरोधक होते. स्तुती आणि टीका करताना अत्रेंच्या वाणीला आणि लेखणीला धार चढत असे. ज्याची प्रशंसा होई, तो त्याने भारावून जाई आणि ज्यावर अत्रे तुटून पडत असत, तो घायाळ झाल्याखेरीज राहत नसे. कोणतीही भीड न बाळगता किंवा व्यावहारिक लाभ-तोट्याचा विचार न करता अत्रे आपली वाणी आणि लेखणी आपल्या निर्धारित उद्दिष्टांसाठी खर्ची घालत असत. काँग्रेस, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, महाराष्टातील काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण हे अत्र्यांच्या या प्रहारांतून सुटले नाहीत. मुंबईसह महाराष्ट्र या मागणीस नेहरू जेव्हा खीळ घालू लागले आणि महाराष्ट्रातील काही नेत्यांनी नेहरूंच्या त्या भूमिकेस आपला पाठिंबा दिला तेव्हा, तर अत्र्यांनी या सगळ्यांना आपल्या धारदार लेखणीने लक्ष्य केले. त्यांच्या त्या कामगिरीचा मागोवा हा त्यांच्या लेखनातूनच घेता येऊ शकतो; त्यासाठी त्यापेक्षा अन्य कोणता दस्तावेज अधिक प्रभावी ठरू शकणार नाही.
बाबूराव कानडे त्यांच्या ‘काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र’ या पुस्तकात अशी माहिती देतात की, ’लंडनहून पदवीचे शिक्षण घेऊन आलेले अत्रे यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी त्यावेळचे काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष हरिभाऊ वाघोरे यांनी प्रयत्न केले आणि अत्र्यांनी त्यास होकार दिला. अत्र्यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोहळा पुण्यातील शनिवारवाड्याच्या पटांगणात झाला. त्यावेळी काँग्रेस नेते आणि पुण्यातील प्रस्थ असणारे काकासाहेब गाडगीळ यांना अत्र्यांचा काँग्रेस प्रवेश रुचला नव्हता. कालांतराने अत्र्यांनी काकासाहेबांवर टीकेचा भडिमार केला आणि त्या नापसंतीची एका अर्थाने सव्याज परतफेड केली. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अत्र्यांनी त्या संघटनेच्या कामास धडाक्याने सुरुवात केली. अत्र्यांच्या पुढाकाराने पुणे नगरपरिषदेत काँग्रेसचे ३५ नगरसेवक निवडून आले. आपल्या लेखणीतून त्यांनी काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार केला. काँग्रेसच्या विरोधकांवर अत्रे आक्रमकपणे टीका करीत होते.
‘नवयुग’ या आपल्या वृत्तपत्रातून अत्रे सामान्य वाचकांना काँग्रेसच्या ध्येय-धोरणांची ओळख करून देत होते. एका अर्थाने अत्रे काँग्रेसमय झाले होते. अर्थात, अत्र्यांचा तो पिंडच होता. जे करायचे त्यात स्वतःला झोकून द्यायचे; तन-मनपूर्वक ते काम करायचे आणि त्या कार्याशी विसंगत असणार्यांना आपल्या वाणीतून आणि लेखणीतून झोडून काढायचे, हा अत्र्यांचा स्थायीभाव. काँग्रेसच्या बाबतीत अत्र्यांचे तेच धोरण होते. काँग्रेसशी अत्र्यांचे संबंध देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच टिकले. याचे कारण स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसचे ध्येय स्वातंत्र्यप्राप्ती हेच होते आणि काँग्रेसच ते मिळवून देऊ शकेल, अशी खात्री अत्र्यांना वाटत असावी. तथापि, स्वातंत्र्याबरोबरच देशाची फाळणी होणार, हे दिसू लागल्यानंतर अत्र्यांचा काँग्रेसविषयी भ्रमनिरास झाला आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राला काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व ज्या अटीतटीने विरोध करीत होते, त्यामुळे तर अत्र्यांचे काँग्रेसबद्दलचे मत पूर्णतः पालटले.
ज्या काँग्रेसचा प्रचार अत्रे आपल्या वृत्तपत्रांतून हिरिरीने करीत होते, त्याच काँग्रेसला लाखोल्या वाहण्यास अत्र्यांनी संकोच केला नाही. याचे एक कारण हेही असावे की, अत्र्यांच्या लेखी व्यक्ती आणि पक्ष यापेक्षा तत्त्व आणि ध्येय यांना अधिक महत्त्व असावे. तत्त्वांशी आणि ध्येयांशी तडजोड करणार्यांशी आपली निष्ठा असू शकत नाही, या ध्येयनिष्ठेचा परिणाम म्हणून अत्र्यांनी काँग्रेसच्या समर्थनाची आपली भूमिका बदलून ती काँग्रेसवर तोफा डागण्याकडे वळली असावी. त्या काळात अत्र्यांच्या लेखणीत आणि वाणीत कसा ‘दारुगोळा’ भरलेला असे, याचा मागोवा त्यांच्या आणि त्यांच्या संबंधी लेखनामधूनच घेता येईल.
कानडे यांनी उल्लेख केला आहे, त्यानुसार फाळणीच्या विरोधात दर रविवारी असे सलग सहा महिने अत्रे शिवाजी पार्कच्या मैदानात भाषणे देत होते. काँग्रेस आणि अत्रे यांच्या दरम्यान दुरावा निर्माण होत असल्याचे ते द्योतक होते आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि अत्रे यांच्यात जणू वैरच निर्माण झाले आणि संयुक्त महाराष्टाच्या आंदोलनात, तर अत्र्यांच्या लक्ष्यस्थानी काँग्रेसच होती. अत्र्यांच्या लेखांचे संकलन असणार्या ‘सिंहगर्जना’ या पुस्तकाच्या निवेदनात प्रकाशक ग. पां. परचुरे यांनी म्हटले आहे की, ‘’संयुक्त महाराष्ट्राचा प्रचार करीत असता क्षणाक्षणाला आचार्य अत्रे यांचा जीव किती धोक्यात होता नि आर्थिक अडचणी अती निकरावर आल्यामुळे त्यांचे मन किती अस्थिर होते, हे मी जवळून पाहिले आहे. असे असताही केवळ महाराष्ट्रप्रेमाने प्राप्त कर्तव्य म्हणून पंडित नेहरू, मोरारजी देसाई, स. का. पाटील इत्यादी सर्व महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर भेदक टीकास्त्र सोडून काँग्रेसवाल्यांची काळी कारस्थाने अत्र्यांनी मराठी जनतेसमोर मांडली.” परचुरे यांनी केलेले हे वर्णन तेव्हाची स्थिती टिपणारे आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या घटनाक्रमाचा विस्ताराने नाही; पण धावता आढावा घेणे औचित्याचे ठरेल; कारण, तरच अत्र्यांची लेखणी इतकी भेदक आणि टोकदार का झाली होती, याची कल्पना येऊ शकेल.
संयुक्त महाराष्ट्राची पहिली घोषणा १९४६च्या बेळगावच्या साहित्य संमेलनात साहित्यिकांनी प्रथम केली. देशात भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने जोर धरला होता आणि त्याचे अध्ययन करण्यासाठी १९४७च्या अखेरीस ‘दार आयोग’ नेमण्यात आला. या आयोगाने भाषावार प्रांतरचनेच्या निकषाला चुकीचे ठरविले. मात्र, आयोगाच्या त्या निष्कर्षाने देशात प्रक्षोभ निर्माण झाला आणि त्याची दखल घेत नेहरू, सरदार पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांची समिती नेमण्यात आली. देशात त्या मागणीचा जोर वाढत होता. आंध्र प्रदेशात श्री रामल्लू यांनी केलेल्या उपोषणात त्यांची प्राणज्योत मालवली. परिणामतः जनक्षोभाची दखल घेत आंध्र प्रदेशाची निर्मिती होत असल्याची घोषणा करणे, केंद्र सरकारला भाग पडले. मात्र, त्यानंतरदेखील संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे सकारात्मकपणे पाहणे नेहरूंनी टाळले होते; एवढेच नव्हे तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे; ‘महाविदर्भ’ नावाची संकल्पना पुढे रेटत संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला छेद देणे, असले उद्योग करण्यात येत होते. राज्य पुनर्रचना आयोगाने संयुक्त महाराष्ट्र होऊच द्यायचा नाही, या इरेला पेटूनच युक्तिवाद अहवालात केला होता. त्यानंतर नेहरू आणि महाराष्ट्र असा संघर्ष अधिकच टोकदार झाला आणि तसतसा अत्र्यांनी काँग्रेसवर सुरू केलेला शाब्दिक हल्ला अधिकाधिक भेदक होऊ लागला.
१९५५च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईत संयुक्त महाराष्ट्रवाद्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १५ जण ठार झाले. १९५६च्या जानेवारी महिन्यात मुंबई केंद्रशासित करण्यात आल्याची घोषणा आकाशवाणीवरून करण्यात आली आणि त्यानंतर उग्र झालेल्या आंदोलनाला हिंसाचाराचे गालबोट लागले. पोलिसांच्या कारवाईत ७६ जण ठार झाले. अत्र्यांनी ‘सिंहगर्जना’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे : ‘’या काळात नेहरूंच्या संतापाचा पारा इतका वर गेला होता की, बुद्ध जयंतीसारख्या पवित्र प्रसंगी बुद्ध चरित्रावर भाषण करण्याऐवजी नेहरूंनी नाव न घेता संयुक्त महाराष्ट्रवाद्यांवरच यथेच्छ तोंडसुख घेतले. मुंबई केंद्रशासित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या वल्गना अनेक मराठी मंत्र्यांनी केल्या; प्रत्यक्षात राजीनामा दिला, तो एकट्या चिंतामणराव (सी.डी) देशमुख यांनी.” ‘मराठा’ या दैनिकातून अत्रे अक्षरशः आग ओकत होते. दि. २४ जून १९५६ रोजी लिहिलेल्या त्यांच्या लेखाचे शीर्षकच ‘देशमुख आणि दशमुख’ असे होते. त्या लेखात चिंतामणरावांच्या बाणेदारपणाचे कौतुक करतानाच महाराष्ट्र काँग्रेसला अत्र्यांनी झोडपून काढले आहे. त्यांच्या लेखातील नमुना म्हणून जरी पाहिला, तरी त्यातील जहालता लक्षात येईल.
अत्रे लिहितात- ‘’महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष मामा देवगिरीकर यांचे भाषण त्यांच्या अंतरंगासारखेच ओंगळ आणि बहिरंगासारखे भोंगळ होते.” नेहरूंऐवजी अन्य कोणी पंतप्रधान असता, तर संयुक्त महाराष्ट्र कधीच अस्तित्वात आला असता, असे लिहून अत्रे पुढे लिहितात- ’‘नेहरूंनी आता तो आपल्या आपल्या इभ्रतीचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे.” अन्य एका लेखात (१९४९) अत्रे लिहितात-’‘भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नाचा काँग्रेसने अगदी विचकाच करून टाकावयाचे ठरविले आहे, असे दिसते.” हैदराबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन १९५३ साली झाले. त्यावर अत्रे यांनी लिहिले होते- ‘’काँग्रेस हा काही आता आम जनतेचा पक्ष राहिलेला नाही. काँग्रेसचे लोकशाही स्वरूप आता नष्ट झाले आहे. नेहरू सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशी आज देशाची आणि काँग्रेसची स्थिती झाली आहे. नेहरू म्हणजे काँग्रेस आणि नेहरू म्हणजे सरकार आणि नेहरू म्हणजे राष्ट्र असा सारा देश नेहरूमय झाला आहे. नेहरूंच्या विरोधात उघडपणे मान वर करण्याचे कोणाही काँग्रेसवाल्याला धैर्य नाही. स्वार्थाच्या लोण्यावर टपून बसलेली सर्व लोभाची मांजरे.” काँग्रेसच्या धोरणांविषयी, कारभाराविषयी अत्र्यांच्या मनात असणारा संताप यातून दृग्गोचर होतो.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नेहरू १९५३ साली महाराष्ट्रात आले होते. तेव्हा त्यांच्या त्या सहा दिवसांच्या दौर्याची झाडाझडती घेणारा ’नेहरू आले कशाला?’ लेख अत्र्यांनी लिहिला. मुळात हा दौरा दुष्काळ पाहणीचा होता; मात्र तरीही त्यात नेहरूंचा सत्कार करण्यात आला. त्यावर चीड व्यक्त करताना अत्रे लिहितात- ‘’विभूतिपूजा ही भारतीय जनतेच्या रक्तामधूनच मुळी वाहते आहे. नेहरूंच्या या दौर्यात महाराष्ट्रीय जनतेने विभूतीपूजनाचा अतिरेक करून आपल्या बौद्धिक दुर्बलतेचे अत्यंत केविलवाणे प्रदर्शन केले.” अन्य एका लेखात (स्वतंत्र मुंबईचे कारस्थान) अत्र्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांवर कोरडे ओढलेले दिसतील. अत्रे लिहितात- ‘’महाराष्ट्राची जो बदनामी करतो, त्याला नेहरू सरकारात फार मोठा मान मिळतो. शिवछत्रपती आणि लोकमान्य टिळकांची विटंबना करणारा एक मातृद्रोही महाराष्ट्रीय आज जगामधील एका महान राष्ट्राचा भारतीय वकील होऊन बसला आहे.” नेहरूंवर अत्र्यांनी सातत्याने टीका केलेली आहे. “नेहरूंनी काश्मीरचे वाटोळे केले, गोव्याचे वाटोळे केले, आता मुंबई आणि महाराष्ट्राचे वाटोळे करण्याचे त्यांनी ठरविलेले दिसते.
(शुरु हुआ है जंग हमारा)” यावरुन अत्र्यांचा काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरच केवळ राग आहे, असे नाही तर काँग्रेसच्या प्रामाणिकपणाच्या अभावावर, काँग्रेसमधील तोंडपुजेपणावर संताप आहे, याचेच दर्शन घडते. चिंतामणराव देशमुख यांच्या राजीनाम्याची कहाणी कथन करतानाच संयुक्त महाराष्ट्रवाद्यांना बदनाम करण्याची सुरू असलेली मोहीमही अत्र्यांच्या टीकेचे लक्ष्य झाली होती. अत्रे लिहितात (चिंतामणी देशाचा कंठमणी): ’‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा ही काही माथेफिरू, दंगेखोर आणि दुराग्रही भाषाभिमान्यांनी चालविलेली एक अराष्ट्रीय स्वरूपाची हुल्लड आहे, असा काँग्रेसश्रेष्ठींनी आणि त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगणार्या काही पोटभरू महाराष्ट्रद्वेष्ट्या वृत्तपत्रांनी जो देशभर आणि जगभर प्रचार चालविला आहे, तो किती खोटा आणि खोडसाळ आहे, याचे प्रात्यक्षिक राजधानीत सर्व जगाला पाहायला मिळाले.” देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडील अर्थ खाते गोविंद वल्लभ पंत यांना देण्यात येईल अशी अटकळ होती; पण ते नेहरूंनी स्वतःकडेच ठेवले, त्यावरही अत्रेंनी झोड उठवत लिहिले- ‘’याला काय सत्तेचा लोभ समजावा की, शहाणपणाचा अभाव समजावा? आणि एवढे करून पुन्हा ब्रह्मदेशाच्या निवृत्त पंतप्रधान यु न्यू यांना ’मला पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन निवृत्त व्हावेसे वाटते,’ असे पत्र लिहिण्यास हे राजेश्री पुन्हा तयारच!”
प्रतापगडावर जवाहरलाल नेहरू आले तेव्हा त्यांच्या स्वागताच्या घोषणा देण्यात आल्या; मात्र अत्र्यांनी त्यावर टीका करीत म्हटले की, “समारंभ शिवगौरवाचा होता, याकडे पूर्ण दुर्लक्ष करून केवळ नेहरूंच्या नावाने आरोळ्या ठोकणे आणि शिवाजी महाराजांची उपेक्षा करणे, हे कसले लक्षण? ही केवळ स्वाभिमानशून्यता नव्हती काय?” नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला सतत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि त्यामुळे त्यांच्यावर अत्र्यांनी सातत्याने घणाघात केलाच; पण त्याबरोबरच एकूणच काँग्रेसची राजकीय संस्कृती हीदेखील कशी ढोंगबाजीने भरलेली आहे, यावर झोड उठविली. काँग्रेसमधील व्यक्तिस्तोमाला अत्र्यांनी लक्ष्य केले. याबाबतीत कडी केली, ती यशवंतराव चव्हाण यांनी. “महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत,” असे विधान त्यांनी केले आणि अत्र्यांच्या लेखणीला रसदच मिळवून दिली. “नेहरू कितीही मोठे असले, तरी त्यांची स्तुती करण्याची ही कोणती रित,” असा प्रश्न अत्र्यांनी उपस्थित केला. (फलटणचे तीन हरामखोर) त्याच लेखात अत्र्यांनी लिहिले- “एखाद्या राजाच्या दरबारातल्या खुशमस्कर्या सरदाराने किंवा थुंकीझेल्या भाटाने आपल्या राजाची जशी भरमसाठ स्तुती करावी, तसा यशवंतरावांनी नेहरूप्रशंसेचा अगदी अतिरेक करून सोडला आहे.” अत्र्यांच्या या काँग्रेसविरोधाला निवडणुकीत प्रचारातदेखील धार आली. काँग्रेसच्या उमेदवारांवर ते तुटून पडत असत आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उमेदवारांचा विजय निश्चित होई.
अत्र्यांनी काँग्रेसच्या विरोधात जी लेखणी चालविली, ती केवळ नेहरू किंवा यशवंतराव चव्हाण या व्यक्तींच्या विरोधातील होती, असे मानणे योग्य होणार नाही. कोणत्याही विचारधारेचे किंवा राजकीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व त्या-त्या वेळी कोणीतरी व्यक्तीच करीत असतात. टीकास्त्र हे त्या व्यक्तीवरील आहे, असे वरकरणी वाटले आणि काही अंशी ते बरोबरही असले, तरी टीका ही त्या व्यक्तींनी जोपासलेल्या आणि रुजवलेल्या राजकीय संस्कृतीवर, राजकीय धोरणांवर, वृत्ती आणि वर्तनाने उत्पन्न झालेल्या दोषांवर असते आणि अत्र्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ते त्याच भूमिकेतून हेही अमान्य करता येणार नाही. नेहरूंच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणार्या लेखांची मालिका अत्र्यांनी लिहिली. ती ‘मरणान्तानि वैराणी’ या उदात्त भूमिकेतून असणार; पण म्हणून नेहरूंच्या कार्यकाळात काँग्रेसवर अत्र्यांनी डागलेल्या तोफा, या काँग्रेसच्या पक्ष म्हणून झालेल्या नैतिक घसरणीवर होत्या, हेही विसरता येणार नाही. काँग्रेसचे आचार्य अत्र्यांनी काढलेले वाभाडे, हे अत्र्यांच्या कट्टर काँग्रेसविरोधी भूमिकेचे प्रत्यंतर देणारे ठरतात. त्यांच्या त्या टीकेतील संदर्भ आताच्या काँग्रेसलाही लागू होतील, हा या ’अत्रे प्रयोगा’तील विलक्षण भाग!
राहूल गोखले
९८२२८२८८१९